sharad ponkhse

‘मी आणि नथुराम’ या पहिल्या वहिल्या पुस्तकाच्या विक्रमी यशानंतर डिजिटलवर पदार्पण करणारे शरद पोंक्षे पुन्हा एकदा मालिका विश्वाकडे वळले आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर ४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत शरद पोंक्षे पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात भेटणार आहेत. हे रूप आणि त्यांनी काढलेली रांगोळी नेमकी कशी आहे ते त्यांनी ‘नवराष्ट्र’शी विशेष बातचित करताना सांगितलं.

  ‘आभाळमाया’, ‘दामिनी’, ‘वादळवाट’, ‘अग्निहोत्र’, ‘उंच माझा झोका’, ‘असे हे कन्यादान’ यांसारख्या बऱ्याच गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेले शरद पोंक्षे ‘ठिपक्यांची रांगोळी’ असं काहीसं अनोखं शीर्षक असलेल्या मालिकेत दिसणार आहेत. पुन्हा मालिकेत काम करण्याबाबत ते म्हणाले की, आजची परिस्थिती फार वेगळी आहे. नाट्यगृहं आणि सिनेमागृहं बंद आहेत. फक्त मालिका विश्वच सुरू आहे. त्यामुळं दोन वर्ष घरी बसलेल्या कलाकार आणि तंत्रज्ञांनी करायचं काय ? हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. त्यामुळं चांगला विषय आणि व्यक्तिरेखा असलेल्या मालिकेचा शोध सुरू होता. लकिली माझ्याकडं ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेची ऑफर आली.

  ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका एकत्र कुटुंबपद्धतीवर आधारीत आहे. कोणताही ड्रामा नसणं हे मालिकेचं वैशिष्ट्य आहे. टिपिकल मालिकांसारखा नायक-खलनायक यात नाही. त्यामुळं इतर मालिकांसारखा ड्रामाही इथं नाही. कानिटकरांच्या पंधरा माणसांच्या एकत्र कुटुंबाची ही कहाणी आहे. अत्यंत साधेपणा हे या मालिकेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. झगमगाट नाही, कपड्यांपासून लुकपर्यंत सारं काही साधं, भडक म्युझिकही यात नाही. या कुटुंबाचं एक वडीलोपर्जित घर आहे. या घरात तीन भाऊ, एक बहिण, सर्वांच्या बायका आणि त्यांची मुलं एकत्र नांदत आहेत. विशेष म्हणजे सर्वांचं एकमेकांवर प्रेम आहे, जिव्हाळा आहे. यात कोणीही खलनायक नाही. अतिशय साधी, सरळ, सोपी, बघणाऱ्या प्रत्येकाला आपलीशी वाटावी अशी ही मालिका आहे. सर्वांना आपल्या कुटुंबातील व्यक्तींचं प्रतिबिंब यात दिसेल. तुमच्या-माझ्या घरात रोज काही नाट्यमय घडत नाही, तसंच या घरातीलही वातावरण आहे. कुटुंबातील सर्व सदस्य मायेच्या धाग्यानं एकमेकांशी बांधलेले असणं हेच या मालिकेचं मर्मस्थान आहे.

  कुटुंबप्रमुखाच्या व्यक्तिरेखेत
  यात मी कुटुंबाचा प्रमुख असलेल्या थोरल्या भावाची म्हणजेच विनायकची व्यक्तिरेखा साकारत आहे. संपूर्ण कुटुंबाचा डोलारा सांभाळणारं हे कॅरेक्टर आहे. अत्यंत सकल पद्धतीनं, लाईव्ह, खराखुरा, कुठेही अभिनय न करणारा असा हा आहे. संपूर्ण कुटुंबाला यानं एकत्र बांधून ठेवलेलं आहे. या कुटुंबातील एकाही भावाला, एकाही सुनेला वेगळं रहावं किंवा स्वतंत्र संसार करावा असं वाटत नाही. याचा अर्थ प्रत्येकजण याच कुटुंबाचा कसा होईल असा प्रयत्न करणारा आहे. सर्वजण जी कमाई करतात, ती याच्या हातात आणून देतात. हा काटकसर करणारा आहे. याला गंमतीनं सर्वजण कंजूषही म्हणतात, पण कंजूषपणा आणि काटकसरपणा यात जमीन-आसमानाचा फरक असल्याचं तो त्यांना समजावतो. काटकसरपणा म्हणजेच सेव्हींग हे पटवून देतो. पैसेच संकटांमध्ये उपयोगी पडत असल्यानं काटकसर करायला हवी असं त्याला वाटतंय.

  आज हे सर्व हरवलंय
  या कटुंबात इतकी माणसं आहेत की कोण कोणाचं मूल हे समजत नाही इतके ते एकमेकांमध्ये मिसळून गेले आहेत. तीन वडील, तीन आया, तीन आज्या, मोठी आई, धाकटी आई अशी नाती असल्यानं त्यांचे खरे आई-वडील कोण आहेत हे कित्येकदा कळेनासं होतं. आज हे सर्व हरवलं आहे. आज आपण एकत्र जेवत नाही. सर्व आपल्या सवडीनुसार जेवतात. या घरात मात्र रात्री सर्वजण एकत्र गप्पा मारतात. माजघरात एका रांगेत गाद्या घालतात. दिवसभरात काय घडलं हे सांगतात. उद्या काय करणार याची चर्चा करतात. आपल्याकडं भरपूर माणसं असल्यानं शेजाऱ्यांची गरज नाही, पण त्या जोडीला पैसाही असेल तर कोणत्याही संकटावर मात करू शकतो असं विनायकचं मत आहे. त्यावर वाह्यात पैसे खर्च करणं त्याला पसंत नसतं.

  दादांचा आधार सर्वांना
  विनायक सरकारी नोकर असून नुकताच निवृत्त झाला आहे. याला पेन्शन सुरू आहे. घरी राहून छानपैकी कुटुंबावर लक्ष ठेवणं, कुटुंबप्रमुख म्हणून महिन्याची कामं करणं, सर्व बिलं भरणं, घरात काय गरजेचं आहे ते पहाणं असं याचं रिटायर्ड लाईफ सुरू आहे. याची फिलॅासॅाफी, बोलणं, वागणं खूप लाघवी आहे. प्रत्येकाला जीव लावणारा आहे. हा एक सच्चा माणूस असल्यानं कुटुंबातील सर्वजण याचं ऐकतात. त्याचा सच्चेपणा वागण्यातून, बोलण्यातून, स्पर्शातून जाणवतो. आत-बाहेर वेगळं असा नाही. दादा हा घरातील सर्वांनाच आधार वाटतो. दादा आपल्याला अडचणीतून सोडवणार यावर सर्वांचा विश्वास आहे. हा आपली मतं न लादता सांगण्याची उत्तम कला याच्याकडं आहे. तो असं पटवून सांगतो की त्याच्या शब्दाबाहेर कोणी जात नाही.

  ठिपक्यांमधली रेषा…
  रांगोळी काढताना आपण प्रथम ठिपके काढतो. त्या ठिपक्यांना जोडणारी एक रेषा असते. ती रेषा म्हणजे विनायक आहे. कुटुंबातील १५ लोकं ठिपके आहेत. या ठिपक्यांना त्यानं एकत्र जोडलं आहे. फक्त जोडलं नसून, मधेमध्ये छान रंगही भरले आहेत. सुप्रिया पाठारे, सारीका नवाथे, मंगेश कदम, नंदू गाडगीळ, राजन ताम्हाणे, राधिका हर्षे ही सिनीयर टीम या मालिकेत आहे. यांच्यासोबत बऱ्याचदा काम केलं आहे. या सर्वांची मुलं आणि सूनांच्या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार नवीन आहेत. यातील बऱ्याच जणांसोबत फर्स्ट टाईम काम करतोय. सर्व आम्हाला खूप आदरानं वागवतात. सीन करतानाही काही सुचवलं तर लगेच अंमलात आणतात. सल्ला घेतात. सर्वजण छान कलाकार असून, संस्कारीही आहेत.

  डिजिटलवरही पदार्पण
  प्लॅनेट मराठीवर प्रसारीत झालेल्या ‘बाप बिप बाप’ ही माझी पहिली वेब सिरीज प्रसारीत झाली आहे. डिजिटलवर काम करण्याचा हा पहिला वहिला अनुभव काहीसा अनोखा होता. बाप आणि मुलगा या दोन पिढ्यांच्यामध्ये कॅाम्प्युटर आहे. टेक्नॅालॅाजी, स्मार्ट फोन आहे. एका पिढीला वाटतंय की स्मार्ट फोनची काही गरज नाही, तर दुसऱ्या पिढीसाठी स्मार्ट फोनशिवाय जगणंच अशक्य आहे. त्याची ही गोष्ट आहे. अखेरीस वडील कसे टेक्निकली अपडेट होतात, त्यांचे विचार कसे बदलतात हे यात दाखवलं आहे. ज्या टेक्नॅालॅाजीचा ते तिरस्कार करत असतात ती कशी आत्मसात करतात हे विनोदी अंगानं मांडलं आहे.

  ‘नथुराम’ला विक्रमी प्रतिसाद
  ‘मी आणि नथुराम’ या पहिल्या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या प्रकाशनपूर्व संपल्या. लॅाकडाऊनच्या काळातही तूफान प्रतिसाद लाभला. अडीचशे पानांच्या या पुस्तकात छान रंगीत फोटो, दर्जेदार कागद आणि छपाई केल्यानं किंमत साडे चारशे रुपये झाली. लॅाकडाऊनमध्ये पुस्तकालयं बंद असताना लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि दिलेल्या नंबरवर ऑनलाईन पैसे भरले. शब्दामृत प्रकाशनच्या पार्थ बाविस्करनं महाराष्ट्र आणि भारतच नव्हे, तर इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्सपर्यंत पसरलेल्या चाहत्यांपर्यंत पुस्तक पोहोचवलं. त्यामुळं प्रकाशनपूर्व तीन आणि नंतर पाच अशा एकूण आठ आवृत्त्या संपल्या. पुस्तक लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न असून, लोकांना खूप आवडला. एका पेक्षा एक उत्तम प्रतिक्रिया आल्या आहेत.