दक्षिणात्य सिनेसृष्टीही मराठीच्या प्रेमात, शशांक उदापूरकरचा मराठी ‘प्रवास’ आता दक्षिणेकडे!

शशांकनं 'नवराष्ट्र'ला दिलेल्या एक्सक्लुझीव्ह माहितीनुसार 'प्रवास' या चित्रपटाचा रिमेक आता तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये बनणार आहे. यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी सुरू असल्याचंही शशांकनं सांगितलं आहे.

  आज जगभरातील सिनेप्रेमींसोबतच कलाकार-तंत्रज्ञांनाही मराठी चित्रपट मोहिनी घालत आहेत. जागतिक पातळीवर तर मराठी सिनेमांचं कौतुक होतच आहे, पण त्याबरोबर भारतातील प्रादेषिक भाषांमधील आघाडीवर असलेली दक्षिणात्य सिनेसृष्टीही मराठीच्या प्रेमात असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. याच कारणामुळं देश-विदेशातील सिने महोत्सवांसोबतच पुरस्कार सोहळ्यांमध्येही नावाजला गेलेल्या अभिनेता-दिग्दर्शक शशांक उदापूरकरच्या ‘प्रवास’ या मराठी चित्रपटाला दक्षिणेकडून बोलावणं आलं आहे. शशांकनं ‘नवराष्ट्र’ला दिलेल्या एक्सक्लुझीव्ह माहितीनुसार ‘प्रवास’ या चित्रपटाचा रिमेक आता तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये बनणार आहे. यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी सुरू असल्याचंही शशांकनं सांगितलं आहे.

  मागच्या महिन्यातच ‘प्रवास’ या चित्रपटानं सातव्या राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे दोन पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सामील झालेल्या बऱ्याच चित्रपटांमध्ये ‘प्रवास’ला पुरस्कार मिळणं हे मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्याप्रमाणं आहे. याखेरीज इफ्फी २०२०साठीही या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. या आणि अशा बऱ्याच कारणांमुळं निर्माते ओम छांगाणी आणि दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांच्या ‘प्रवास’चा डंका थेट दक्षिणात्य सिनेसृष्टीतही वाजू लागला आहे. ‘प्रवास’वर दक्षिणेकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दक्षिणेकडून आलेल्या प्रतिक्रियांबाबत शशांक म्हणाला की, इफ्फीमध्ये ‘प्रवास’ दाखवला गेल्याचा खूप मोठा फायदा सिनेमाला झाला. मी मध्यंतरी हैदराबादला गेलो होतो. तिथे ‘प्रवास’ला खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहिलं. साऊथमधून काही कलाकारांचे मला फोन आले की, हा सिनेमा आम्हाला आमच्या भाषेत करायचा आहे. त्यानंतर माझ्या डोक्यात साऊथमध्ये या चित्रपटाचा रिमेक बनवण्याचं चक्र सुरू झालं. कन्नडमधील प्रसिद्ध अभिनेत्री वेदिकानं मला फोन करून ‘प्रवास’ हा एक सुंदर चित्रपट असल्याचं सांगितलं. कन्नडमधील अभिनेते साईकुमार यांनी कन्नडमध्ये ‘प्रवास’चा रिमेक बनवण्याचा प्रस्ताव ठेवला.
   
  मराठी ‘प्रवास’मध्ये अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापूरे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. दक्षिणात्य ‘प्रवास’मधील कलाकारांबाबत शशांक म्हणाला की, अशोकजी आणि पद्मिनीजी यांनी या चित्रपटात अफलातून अभिनय केला आहे. सर्वच स्तरांतील प्रेक्षकांनी त्यांच्या अभिनयाला उचित दादही दिली. त्यामुळं दक्षिणेतही या कथानकाला न्याय देण्यासाठी त्यांच्याच तोलामोलाचा अभिनय करणाऱ्या कलाकारांची गरज आहे. यासाठी प्रकाश राज आणि सुहासिनी मणिरत्नम या दक्षिणेकडील दोन दिग्गज कलाकारांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. प्रकाश राज आणि सुहासिनी या दोघांनीही ‘प्रवास’ पाहिला असून, त्यांना खूप आवडला आहे. त्यामुळं नॅरेशन वगैरे काहीही न करता दोघांनीही चित्रपटात काम करण्यासाठी संमती दर्शवली आहे. कोरोनामुळं काम थांबल्यानं थोडा उशीर झाला आहे. खरं तर जून महिन्यात शूट सुरू करण्याचा माझा विचार होता. आम्ही जेव्हा प्रकाश राज यांना भेटलो, तेव्हा ते म्हणाले की, मी हा चित्रपट पाहिला आहे. खूप कमालीचा चित्रपट आहे. आय अॅम रेडी फॅार इट. सुहासिनींच्या बाबतीतही अगदी तसंच घडलं. त्यांच्या सेक्रेटरींना जेव्हा मी मेसेज केला, तेव्हा त्यांनी लगेच कॅाल केला की, दोन दिवसांपूर्वीच मॅडम ‘प्रवास’बाबत बोलत होत्या. खूप सुंदर सिनेमा आहे. त्यामुळं हा चित्रपट करायला त्या तयार आहेत.

  ‘प्रवास’च्या प्रेमात राजेंद्र प्रसाद
  राजेंद्र प्रसाद हे साऊथचे खूप मोठे अॅक्टर आहेत. त्यांनी तिथे जवळपास ४०० सिनेमे केले असतील. त्यांना जेव्हा मी भेटायला गेलो, तेव्हा ते म्हणाले की, तू विश्वास ठेवणार नाहीस. माझे एक मित्र नॅशनल पुरस्कारांसाठी परीक्षक होते. त्यांनी तुझा ‘प्रवास’ पाहिला आणि मला म्हणाले होते की, तुझ्यासाठी हा परफेक्ट सिनेमा आहे. तू त्या डायरेक्टरला अॅप्रोच होऊन हा चित्रपट कर. त्यानंतर मी बालाजीला साकडं घातलं की, या दिग्दर्शकाला माझ्यासोबत सिनेमा बनवण्यासाठी सद्बुद्धी दे आणि माझ्याकडे घेऊन ये. आता बघ बालाजीची कृपा झाली आणि तू आलास. याचा अर्थ ‘प्रवास’ हा चित्रपट साऊथमध्ये बनणं हा केवळ जुळून आलेला योगायोग नसून, यामागं एक दैवी शक्तीही आहे, जी हे सर्व घडवून आणत आहे. खरं तर महिन्याभरापूर्वी मी तिकडं जायला हवं होतं, पण कोविडमुळं काम थांबलं आहे. सुहासिनी मॅडमच्या सेक्रेटरींकडे जूनपासून तारखा मागितल्या होत्या, पण सध्या घराबाहेर पडण्याची हिंमतच होत नाही.

  त्यांना इमोशन्समध्ये साधेपणा आवडतो
  साऊथच्या इंडस्ट्रीचा मी थोडा फार अभ्यास केला आहे. तिथल्या प्रेक्षकांना अॅक्शनमध्ये भडकपणा चालतो, पण इमोशन्समध्ये त्यांना साधेपणाच हवा असतो. तिथले लोक फॅमिली, आई, वडील यांच्याशी खूप कनेक्टेड असतात. आज आपल्याकडे जशी भयावह परिस्थिती आहे तशी साऊथमध्ये नाही. कारण तिथल्या प्रत्येक अॅक्टरच्या अॅम्ब्युलन्स सर्व्हिस, ब्लड डोनेशन कॅम्प्स, हॅास्पिटल्स आहेत. प्रत्येक सुपरस्टारनं आपल्या लोकांसाठी खूप काम केलं आहे. त्यामुळं तिथल्या लोकांना अॅक्शन आणि इमोशन्स खूप आवडतात. तिथली अॅक्शन खूप भडक असते, पण इमोशन्सच्या बाबतीत अगदी उलटं आहे. यासाठी आम्ही काही बदल केले आहेत. आता पटकथा जसजशी तयार होईल तसतसे आणखी बदल केले जातील. कलाकारांकडून होकार आलाच आहे. त्यामुळं पटकथेवरील काम पूर्ण झाल्यावर शूटिंगचा श्रीगणेशा करण्याची योजना आहे.

  रिमेकसाठी दिग्दर्शनावरच फोकस करणार
  राष्ट्रीय पारितोषिक विजेते लेखक भार्गवा सध्या ‘प्रवास’च्या तेलुगू व्हर्जनचं लिखाण करत आहेत. ‘प्रवास’मध्ये मी महत्त्वाची भूमिका साकारली होती, पण तेलुगू रिमेकमध्येही अभिनय करेन याबाबत साशंक आहे. एक तर लँग्वेजचा प्रॅाब्लेम होऊ शकतो. त्यामुळं या चित्रपटात अभिनय करण्याचा विचार नाही. केवळ दिग्दर्शनावर लक्ष केंद्रित करणार आहे. तमिळ आणि तेलुगू ही खूप चांगली इंडस्ट्री असल्यानं एकाच कामावर फोकस करण्याकडे माझा कल असेल. कोविडचं वातावरण थोडं निवळलं की रिमेकची जोरदार तयारी सुरू करणार आहे. या चित्रपटाखेरीज एक वेब सिरीज लिहून पूर्ण केली आहे. ओटीटीशी याबाबत बोलणं सुरू आहे. एक हिंदी सिनेमा लिहीला आहे. त्याचीही जुळवाजुळव सुरू आहे. आता थांबून जमणार नाही. हा ‘प्रवास’ असाच सुरू ठेवावा लागणार आहे.