रंगभूमीवर शेखर नाईक रेखाटणार बाबूराव पेंटरांचं जीवनचरीत्र!

चित्रकार असलेल्या नाईक यांनी बाबूरावांच्या जयंतीचं औचित्य साधत 'सिनेमा केसरी'ची घोषणा केली आहे. याबाबत 'नवराष्ट्र'शी बोलताना नाईक यांनी 'सिनेमा केसरी'बाबत सविस्तर माहिती दिली.

  काही दिग्दर्शकांना नेहमीच आव्हानात्मक काम करण्याची सवय असते. एखाद्या गोष्टीच्या अगदी खोलात जाऊन रिसर्च करायचा आणि मग आपल्याला उमगलेलं सत्य जगासमोर मांडण्याचा प्रयत्न काही दिग्दर्शक करत असतात. लेखक-दिग्दर्शक शेखर नाईकही यांच्यापैकीच एक आहेत. कायम काही ना काही शोधून सिनेमा आणि नाटकांद्वारे सादर करणारे नाईक आता कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचं जीवनचरीत्र रंगभूमीवर आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. चित्रकार असलेल्या नाईक यांनी बाबूरावांच्या जयंतीचं औचित्य साधत ‘सिनेमा केसरी’ची घोषणा केली आहे. याबाबत ‘नवराष्ट्र’शी बोलताना नाईक यांनी ‘सिनेमा केसरी’बाबत सविस्तर माहिती दिली.

  शेखर नाईक यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेलं चित्रकार अमृता शेरगिल यांच्या पत्रांवर आधारित ‘तुझी आम्री’ हे नाटक चांगलंच गाजलं आहे. यानंतर बाबूराव पेंटर यांच्यावर आधारलेलं ‘सिनेमा केसरी’ हे नाटक करण्याबाबत नाईक म्हणाले की, खरं तर ‘तुझी आम्री’च्या आधीच बाबूरावांवर काहीतरी करण्याचा विचार मनात घोळत होता. २०१४ मध्ये ‘म्हैस’ हा चित्रपट तयार झाल्यानंतर या विषयावर काही लोकांशी माझं बोलणं झालं होतं, पण माझे कोल्हापूरमधले एक मित्र त्यावर काही करणार होते म्हणून मी तेव्हा थांबलो होतो. कॅालेजमध्ये असल्यापासूनच बाबूरावांबाबत कुतूहल होतं. जसं अमृता शेरगिल यांच्याबद्दल होतं तसंच. कारण सर्व अंगांचं ज्ञान असलेले ते आम्हाला माहित असलेले जणू लिओनार्दो विंची होते. ते आर्किटेक्ट, चित्रकार, शिल्पकार होते. सर्व कलांमध्ये पारंगत होते. दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार तर ते होतेच, पण त्यांनी कॅमेरा तयार केला, फिल्म कंपन्या निर्माण केल्या. पोस्टर डिझाईन करण्यापासून पडदे रंगवण्यापर्यंत सर्व कामं त्यांनी केलेली असल्यानं मला ते जास्त जवळचे वाटतात. कारण ही सर्व कामं मीदेखील केली आहेत. पेंटरांनी हे काम १९५४च्या आधीच्या काळात केलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे.

  ‘गुरु-गीता’, ‘शोध मीरेचा’, ‘तुझी आम्री’ या नाटकांनंतर बाबूरावांवरील कलाकृती करण्याबाबत नाईक म्हणाले की, बाबूरावांचं व्यक्तिमत्त्व दृक-श्राव्य नाटकाच्या माध्यमातून उभं करणार आहे. दोन तासांच्या या नाटकात पेंटरांच्या सर्व गोष्टींचा समावेश केला जाईल. अर्थातच काळ १९५४ पूर्वीचा असेल. वेगवेगळ्या संदर्भांच्या माध्यमातून पेंटर उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाबूरावांनी कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं. सिनेमा, चित्रकला, नाट्यशास्त्र यापैकी कशाचंही शिक्षण न घेता ते त्यात पारंगत होते. त्यांच्या अंगी ते ज्ञान उपजत होतं. कलेचा वारसा त्यांना वडीलांकडून मिळाला होता. त्यांच्यावर कलाकृती बनणं गरजेचं होतं, पण अद्याप फार काही भव्य बनलेलं नाही. या नाटकाच्या निमित्तानं माहिती गोळा करताना चांगले संदर्भ मिळाले, तर भविष्यात डॅाक्युमेंट्रीही करण्याचा विचार आहे. अजून लोकांना भेटायचं असल्यानं थोडा वेळ लागेल. पुस्तकांमधील संदर्भ लोकांना भेटून टॅली करावे लागतील. लिखाण महिन्याभरात पूर्ण होईल. त्यानंतर लगेच वाचन सुरू होईल.

  व्ही. शांताराम व बालगंधर्वांसोबत भालजीही…
  या नाटकात बालगंधर्व, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर यांसारखे भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गजही दिसणार आहेत. व्ही. शांताराम त्यांचे शिष्य होते.  पेंटरांनी उभ्या आयुष्यात केलेलं काम दोन तासात सादर करण्याचा प्रयत्न आहे. खरं तर हे ‘तुझी आम्री’पेक्षा मोठं शिवधनुष्य आहे. कारण अमृताला फक्त चित्रकलेच्या माध्यमातून उभी करायची होती, पण पेंटरांबाबत तसं नाही. त्यांची सर्व अंग सादर करायची आहेत. त्यांनी या क्षेत्रात खऱ्या अर्थानं क्रांती घडवली. बाबूराव नेहमी वेगवेगळं टेक्निक वापरून कलाकृती तयार करायचे. त्यांच्या ‘सैरंध्री’ सिनेमापासून सेन्सॅारनं हस्तक्षेप करायला सुरुवात केली. कारण त्यातील एक वध पाहिल्यावर लोकं घाबरून किंचाळायचे. त्यामुळं पहिल्यांदा सेन्सॅारनं लक्ष घातलं. त्यांच्या सिनेमांमुळे टॅक्स आकारला जाऊ लागला.

  जानेवारीमध्ये पहिला प्रयोग
  ‘सिनेमा केसरी’चा पहिला प्रयोग १६ जानेवारी २०२२ रोजी कोल्हापूरमध्ये सादर केला जाणार आहे. हा बाबूराव पेंटर यांचा स्मृतीदिन आहे. लेखनाचं काम सुरू असून, जसजसे संदर्भ मिळतील तसं काम पुढे जाईल. बाबूरावांबाबत जे लोकांसमोर आलं नाही ते आणण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक गोष्ट स्वत: करून बघणं हा सर्वात मोठा गुण बाबूरावांच्या ठायी होता. दुसऱ्यावर अवलंबून राहून काम थांबू नये यासाठी ते सर्व काही शिकले. आपलं काम कुठेही अडता कामा नये असं ते म्हणायचे. परदेशातून कॅमेरा आणण्यासाठी पैसे नसल्यानं ते गप्प बसले नाहीत. त्या काळी त्यांनी स्वत: कॅमेरा तयार केला. त्यांना रिअॅलिस्टीक काम करायला खूप आवडायचं. त्यांनी जरी सेट बनवले तरी ते कसे रिअल वाटतील याकडं त्यांचा कल असायचा.

  लोकमान्य टिळकांनी दिली पदवी
  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जेव्हा आर्यन थिएटरमध्ये ‘सैरंध्री’ चित्रपट पाहिला, तेव्हा बाबूरावांचा सत्कार केला होता. त्यावेळी टिळकांनी बाबूरावांना ‘सिनेमा केसरी’ या नावानं संबोधलं. पुढे ही पदवी बाबूरावांच्या नावासोबत आपोआप जोडली गेली. याबाबतही रितसर रिसर्च करणार आहे. कलाकारांच्या निवडीबाबत इतक्यात काही सांगता येणार नाही. लेखन पूर्ण झाल्यावर त्यावर विचार करेन. सध्या डोळ्यांसमोर दोन-तीन नावं आहेत, पण अद्याप ठाम झालेलं नाही. यात दोन कलाकार असतील. बाबूरावांनी एका चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकाही साकारली होती. त्या सर्व निकषांवर खरे उतरणारे कलाकार निवडले जातील.

  डॅाक्युमेंटेशन करायला शिकवलं
  बाबूरावांनी बालगंधर्वांच्या नाटकांचं शूटिंग केलं होतं. अशा प्रकारे नाटकांचं डॅाक्युमेंटेशन केलं जाऊ शकतं असं त्यांच्या तेव्हा लक्षात आलं होतं. कॅमेरा फक्त सिनेमा करण्यापुरताच मर्यादित नसून, डॅाक्युमेंटेशनसाठीही उपयोगी ठरू शकतो हे त्यांनी जाणलं होतं. आपण केलेलं डॅाक्युमेंटेशन पुढच्या पिढीसाठी फायदेशीर ठरू शकतं हे त्यांना ठाऊक होतं. त्यामुळंच ते काळाच्या पुढचा विचार करणारे होते. त्यांनी बालगंधर्वांच्या नाटकांची डॅाक्युमेंटेशन केली जी आज उपयोगी ठरत आहेत. डॅाक्युमेंटेशन भारतात खूप कमी प्रमाणात होतं, पण बाबूरावांनी याची सुरुवात फार पूर्वीच केली होती. आता मी जिथे जाणार, ज्या लोकांना भेटणार ते सर्व शूट करणार आहे. भविष्यात ते कोणाला तरी उपयोगी पडेल. मी आजवर जिथे फिरलोय ते ‘ट्रव्हल विथ शेखर’च्या माध्यमातून दर मंगळवार आणि शुक्रवारी लोकांसमोर येतंय.