धक्कादायक प्रकार, सिनेसृष्टीत आणखी एका अभिनेत्रीची गळफास लावून आत्महत्या

  • अभिनेता सुशांतसिंग राजपूत, अभिनेता समीर शर्मा, आणि मराठी अभिनेता आशुतोष भाकरे यांच्या धक्क्यातून सिनेसृष्टी सावरली नसतानाच टीव्ही मालिका आणि भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्री अनुपमा पाठक हीने गेल्या रविवारी आपल्या दहिसर येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबईः सिनेसृष्टीत आणखी एका अभिनेत्रीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. अभिनेता सुशांतसिंग राजपूत, अभिनेता समीर शर्मा, आणि मराठी अभिनेता आशुतोष भाकरे यांच्या धक्क्यातून सिनेसृष्टी सावरली नसतानाच टीव्ही मालिका आणि भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्री अनुपमा पाठक हीने गेल्या रविवारी आपल्या दहिसर येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ही घटना चार दिवसानंतर उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी अनुपमाने फेसबुक लाईव्ह केलं होतं. यामध्ये तिने काही गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. परंतु इतक्या टाकाचे पाऊल उचलण्यापूर्वी तिने एक सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये तिने आत्महत्येचं कारण देखील लिहिलं होतं. 

काय लिहिलं होतं सुसाईड नोटमध्ये ? 

माझ्या एका मित्राने दिलेल्या सल्ल्यानुसार मी एका कंपनीत १० हजारांची गुंतवणूक केली होती. कंपनी माझे पैसे व्याजासकट मागील वर्षीच डिसेंबरमध्ये देणार होती. मात्र, आता ती कंपनी माझे पैसे परत देण्यास टाळाटाळ करत आहेत. असं तिने आपल्या सुसाइड नोटमध्ये मनीष झा चे नाव लिहिलं आहे. तसेच दुसरे कारण म्हणजे मनीष झाने लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर माझी दुचाकी गाडी घेतली होती. तेव्हा मी माझ्या मुळ गावी होती. जेव्हा मी परत आले तेव्हा त्यानं माझी दुचाकी देण्यास नकार दिला.   

दरम्यान, अनुपमा पाठक हिच्या घरात मिळालेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी चाचपणी केली असता तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील पुढील तपासणी पोलीस करत आहे.