गायिका वैशाली माडेच्या हाती राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ, उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत!

काही दिवसांपूर्वीच वैशाली राष्ट्रवादीत प्रवेश करणार होती. मात्र महाराष्ट्रात वाढता कोरोना बघता वैशालीचा प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता.

    प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली माडेने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून वैशालीवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेता अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री धनंजय मुंडे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित वैशालीने पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत वैशालीचं अभिनंदन केलं आहे.

    काही दिवसांपूर्वीच वैशाली राष्ट्रवादीत प्रवेश करणार होती. मात्र महाराष्ट्रात वाढता कोरोना बघता वैशालीचा प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आज ही प्रतीक्षा संपली आहे. आज वैशालीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अखेर प्रवेश केला आहे. वैशालीचा राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागात प्रवेश झाला आहे. तसेच तिची विदर्भ विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

    वैशाली ही महाराष्ट्राची प्रसिद्ध गायिका आहे. मराठीसोबतचं तिने बॉलिवूडमध्ये सुद्धा आपलं नाव कमवलं आहे. झी टीव्हीवरील ‘सारेगमप’ या शोची २००९ची ती विजेती आहे. त्यानंतर ती प्रकाशझोतात आली होती. बाजीराव मस्तानी या या चित्रपटातील पिंगा हे तिचं गाणं खुपचं प्रसिद्ध झालं होतं. तसेच तिने अलीकडेच आलेल्या कलंक या चित्रपटात देखील गाणं म्हटल आहे.