क्रिकेटसंगे चित्र रंगी रंगली स्नेहा

'नवराष्ट्र'शी विशेष बातचित करताना स्नेहानं क्रिकेट आणि चित्रकलेसोबतचं आपलं नातं उलगडलं.

  ‘अधुरी एक कहाणी’ आणि ‘काटा रुते कुणाला’ या गाजलेल्या मराठी मालिकांनंतर थेट हिंदीत गरुडझेप घेत ‘ज्योती’, ‘शेर-ए-पंजाब : महाराजा रणजीत सिंग’, ‘मेरे साई’, ‘चंद्रगुप्त मौर्या’, ‘कहत हनुमान जय श्रीराम’ या मालिकांमध्ये एका पेक्षा एक दमदार भूमिका साकारणारी स्नेहा वाघ सध्या क्रिकेट आणि चित्रकलेमुळे लाइमलाईटमध्ये आहे. ‘नवराष्ट्र’शी विशेष बातचित करताना स्नेहानं क्रिकेट आणि चित्रकलेसोबतचं आपलं नातं उलगडलं.

  लॅाकडाऊननं संपूर्ण जग थांबलं असताना काहींमधील सुप्त गुण पुन्हा बहरून आल्याचं पहायला मिळालं आहे. स्नेहाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. लॅाकडाऊनच्या काळात तिला चित्रकलेसाठी वेळ देता आलाच, पण आवडता क्रिकेटचा खेळही खेळता आला. याबाबत स्नेहा म्हणाली की, लवकरच मी क्रिकेटवर आधारित वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. या वेब सिरीजचं टायटल अद्याप निश्चित झालेलं नाही. स्कूलमध्ये असल्यापासून मला क्रिकेटची आवड आहे. मी दहावीत असताना क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होती. त्यावेळी मी सारखं क्रिकेट पहायचे. त्यावरून मला खूप ओरडाही पडायचा. दहावीत असूनही अभ्यासावर लक्ष नसल्यानं पप्पा-मम्मी ओरडायचे. पप्पांना क्रिकेट खूप आवडत असल्यानं ते जेव्हा पहायचे, तेव्हा मी लपून बघायचे. मी स्वत:ची स्क्रॅप बुकही बनवली होती. वर्तमानपत्रात क्रिकेटचे कटआऊटस यायचे ते कटींग करून वहीत चिटकवायचे. कोणी किती विकेट घेतल्या, हाययेस्ट स्कोर कोणाचा आहे, सर्वाधिक सिक्स कोणी मारले, एका इनिंग्जमध्ये सर्वात जास्त स्कोर कोणी केला या सर्व गोष्टींची नोंद मी वहीत ठेवायचे. माझ्या पप्पांसाठी सचिन तेंडुलकर देवमाणूस होता, तर माझ्यासाठी महेंद्रसिंग धोनी… पप्पांकडूनच क्रिकेटचे गुण आणि आवड माझ्यातही उतरली होती. थोडी मोठी झाल्यानंतर अॅक्टिंगमध्ये बिझी झाल्यानं क्रिकेटशी नातं तुटल्यासारखं झालं होतं, पण सोल कनेक्टशन कधीच संपत नाही. योगायोग म्हणजे या वेब सिरीजच्या माध्यमातून मला चक्क क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळं क्रिकेट खेळणं हे माझ्या नशिबात होतंच असंच मी म्हणेन. मग भले ते आॅनस्क्रीन का असेना… या वेब सिरीजसाठी मला क्रिकेटचं ट्रेनिंग घ्यावंच लागलं.

  क्रिकेटचे धडे गिरवताना…
  क्रिकेटचं कोचिंग घेण्यासाठी खूप मेहनत घेतली. शूटवर लेदर बॅालने खेळणार नव्हतो, पण कोचिंगसाठी ओरिजनल लेदर बॅाल वापरण्यात आला. बॅाल माझ्या शरीरावर ठिकठिकाणी लागला आहे. पायावर, हातावर, तोंडावर, खांद्यावर, बोटांवर, पोटावर बॅाल अक्षरश: शेकलाय. यात मी स्टार बॅटसमन प्ले करतेय. त्यामुळं फलंदाजीवर फोकस करावा लागला. बॅाडीलँग्वेज शिकण्यासाठी आणि क्रिकेटींग शॅाटस करेक्ट करण्यासाठी खूप प्रक्टीस करावी लागली. ती प्रॅक्टीस करता-करता इतका मार बसलाय की, शूटिंग संपल्यानंतरही माझ्या शरीरावर लेदर बॅालचे काळे, निळे डाग पडले होते.


  मुरादाबादमध्ये कोचिंग-शूटिंग
  आम्ही ही पूर्ण सिरीज उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये शूट केली आहे. तिथल्याच बीसीसीआयच्या क्रिकेट कोचनी आम्हाला क्रिकेटचे धडे दिले. बरेच दिवस तिथेच राहिलो आणि शूटही तिथेच केलं आहे. त्यामुळं एकंदरीत पूर्ण टीम एकत्र असल्याचा सांघिक फील आमच्यामध्ये आपोआप आला. शूटिंग करताना खूप मजा आली. क्रिकेट खेळत असल्यानं एक वेगळाच अनुभव होता. बॅटसमनचे ग्लोव्हज घालून माझे हात अक्षरश: पसरले होते. शूटिंगनंतर पुन्हा माझी बोटं जुळवायला जवळपास दोन महिने लागले. सध्या डबिंग सुरू असल्यानं या वर्षा अखेरीस ही वेब सिरीज रिलीज होण्याची शक्यता आहे.

  दिग्दर्शकांच्या नजरेतून…
  दीपक पांडे यांनी या वेब सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. तुम्ही अॅक्टींग करू नका असं त्यांनी आम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं. आमची कास्टिंगच त्यांनी रिअल पर्सनॅलिटी पाहून केली होती. जसे आम्ही वास्तवात आहोत ते लक्षात घेऊन आमचं कास्टिंग केलं होतं. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीचे होते. हाताची पाच बोटं जशी एकसारखी नसतात, तसे १२ प्लेअर्स भिन्न होते. त्यांनी आम्हाला रिअलमध्ये जसे रिअॅक्ट होता तसं व्हायला सांगितलं. मला तुम्ही पाहिजेत. कोणतंही कॅरेक्टर नको. तुम्ही कसे रिअॅक्ट कराल ते येऊ दे असं त्यांचं म्हणणं होतं. ते करण्यात वेगळीच गंमत होती. त्यांना माझं कॅरेक्टर नको, तर स्नेहा हवी होती. फक्त नाव बदललेलं होतं. मी टीमची कॅप्टन असल्यानं लीडरशीपचे गुण हवे होते. ती क्वालिटी माझ्यात आहे.

  रंगांमध्ये रमायला खूप आवडतं
  चित्रकलेची आवड मला बालपणापासूनच आहे. मला रंगांमध्ये रमायला खूप आवडतं. माझं रंगांवर खूप प्रेम आहे. कलर्ससोबत माझं खूप छान कनेक्शन आहे. कल्याणमधील होली क्रॅास कॅान्व्हंट स्कूलमध्ये मी शिकलेय. त्या शाळेतही मी ड्रॅाइंगमध्ये कायम ए प्लस मिळवायचे. एलिमेंट्री आणि इंटरमिडीएट या दोन्ही परीक्षा पास केल्या आहेत. माझ्या फॅमिलीत आर्टिस्टीक लोकं असल्यानं डीएनएमध्येच कला आहे. पप्पांनाही चित्रकलेची आवड होती. ते खूप छान पेंटींग करायचे. कार्डबोर्डचे आर्टवर्क ते खूप सुंदर बनवायचे. आम्ही दिवाळीला कंदील कधीच विकत घेतले नाहीत. घरीच बनवले जायचे. कल्याणमधीलच बिर्ला कॅालेजमध्ये मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्यानंतर लंडनला जाऊन फिल्म मेकींगचा कोर्स केला.

  मेडिटेशनसारखं मंडाला आर्टस
  मला अॅबस्ट्रॅक्ट चित्र काढायला आवडतात. मनातील व्हिजन पेपरवर उतरवायला आवडतं. त्यामुळं मी तशाच प्रकारची चित्रं काढण्यात रमते. आर्टिस्टीक आणि ब्युटीफुल जे आहे ते काढायला आवडतं. पेन्सिल स्केचेस काढता येत नाहीत. या लॅाकडाऊनमध्ये मी मंडाला आर्टस शिकले आणि त्याची पेंटिंग्ज काढली आहेत. मंडाला आर्टससाठी पूर्ण लक्ष केंद्रीत करावं लागतं. पेंटींगवर पूर्ण फोकस करावा लागतो. खूप लहान सहान गोष्टींचा विचार करून चित्रं काढावं लागतं. यामुळं कॅान्सन्ट्रेशन लेव्हल इतकं वाढतं की, मंडाला आर्टसचं काही बनवायला सुरुवात केल्यावर आजूबाजूच्या गोष्टींचं भान रहात नाही. यासाठी खूप वेळ लागतो. हे एखाद्या मेडिटेशनसारखं आहे. मी ही कला स्वत:च बघून बघून शिकलेय.

  एक्झिबीशन भरवणार नाही
  माझ्या पेंटिंग्जचं एक्झिबीशन भरवावं अशी पप्पांची इच्छा होती, पण मी इतकी मोठी पेंटर नाही. आपण केवळ हॅाबी किंवा पॅशन म्हणून एखादी गोष्ट करतो. त्यामुळं प्रदर्शन वगैरे भरवायला हवं असं मला वाटत नाही. माझ्या खूप जवळच्या लोकांना मी पेंटिंग्ज गिफ्ट देते. अॅक्टिंगमध्ये बिझी असताना चित्रकलेकडं दुर्लक्ष झालं होतं, पण लॅाकडाऊनमध्ये माझ्यातील पेंटर पुन्हा बाहेर आली आहे. ज्या माणसात कला नाही त्यात माणुसकी नाही असं म्हटलं जातं. मग ती कोणतीही कला असो. आजवर मी बऱ्याच व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, पण पोलिसांची भूमिका अद्याप केली नसल्यानं कायद्याचं रक्षण करणारी पोलिस अधिकारी साकारायला किंवा इंदिरा गांधींसारखी एखादी दिग्गज व्यक्तिरेखा साकारायला नक्कीच आवडेल.