‘इंडियन आयडॉल १२’ चं विजेतेपद जिंकून सायलीला करायचं आहे वडिलांच स्वप्न पुर्ण, आता हवीये फक्त प्रेक्षकांची साथ

'इंडियन आयडॉल १२'मधील आजवरचा प्रवास सायलीनं 'नवराष्ट्र'शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना शेअर केला.

    इंडियन आयडॉल १२’ सध्या चांगलंच रंगात आलं आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हीजनवर सुरू असलेल्या या शोमध्ये अंतिम फेरीत धडक मारण्याची धमक असणारी सायली कांबळे आपल्या सदाबहार गायकीनं परीक्षकांसोबतच रसिकांचीही मनं जिंकत आहे. संगीतकार आनंदजीभाई यांनी सायलीचं नामकरण सायली किशोर असं केलं आहे. अशा काही आठवणींसोबतच ‘इंडियन आयडॉल १२’मधील आजवरचा प्रवास सायलीनं ‘नवराष्ट्र’शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना शेअर केला.

    आपल्या आजवरच्या प्रवासाबाबत सायली म्हणाली की, सायनमधील साधना विद्यालयामध्ये शिकलेय. चौथीमध्ये असताना तुषार देवल आम्हाला म्युझिक शिकवायचे. तुषारदादाला माझा आवाज गोड वाटला आणि त्यानं माझ्या आई-वडीलांना बोलावून मला गाणं शिकायला पाठवा असं सांगितलं. तुषारदादाच्या सांगण्यावरून मी तेव्हापासून त्याची मावशी विद्या जाईल यांच्याकडे गाणं शिकतेय. बाईंचे खूप कार्यक्रम व्हायचे. त्यात आम्ही सर्व जुनी गाणी गायचो. ‘नैनो में बदरा…’, ‘रसिक बलमा…’, ‘चांद फिर निकला…’, ‘गगन सदन…’, ‘चांदण्यात फिरताना…’, ‘केव्हा तरी पहाटे…’, ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…’, ‘सखी गं मुरली मोहन…’ ही गाणीच आम्हाला बरंच काही शिकवणारी ठरली. या गाण्यांच्या माध्यमातून आमच्यावर गायनाचे संस्कार होत गेले. ही गाणी गायल्यावर विशेष आणखी काही शिकण्याची गरज नाही असं मला वाटतं. खूप स्पर्धांमध्ये भाग घेतला. दहावीला गाण्यातून ब्रेक घेतला. बारावीनंतर ‘गौरव महाराष्ट्राचा’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले. त्यानंतर स्टॅटिस्टीक्समध्ये मुंबई युनिव्हर्सिटीतून मास्टर्स केलं, पण गायनात करियर करण्याचा कधीच विचार केला नव्हता. गाणं माझं पॅशन होतं, पण पैसे कमावण्याचं साधन होईल असा कधीच विचार केला नव्हता. हळूहळू मी कार्यक्रम करू लागले. कॅार्पोरेट इव्हेन्ट्स केले. त्यानंतर मनात विचार आला की यातून मला आनंदही मिळतोय आणि इन्कमही होत आहे. त्यामुळं शिक्षण पूर्ण केल्यावर गायनातच करियर करायचं ठरवलं, पण मी मुलगी असल्यानं आई-बाबा तयार नव्हते. इंडस्ट्रीत कसं होणार, कोणी ओळखीचं नाही याचा विचार त्यांना होता. गाणं गाऊन पोट भरणार नसल्यानं बाब तयार नव्हते. आई माझ्यासोबत प्रत्येक कार्यक्रमाला यायची. महिन्याला फिक्स इन्कम मिळत नसल्यानं बँकेत जॅाबसाठी अॅप्लाय वगैरे केला. एक दिवस बाबांनीच इंडियन आयडॅालसाठी ट्राय करायला सांगितलं. त्यानंतर माझा या मंचावरील अविश्वसनीय प्रवास सुरू झाला.

    ‘इंडियन आयडॉल १२’च्या मंचावर आल्यानं आपल्यात झालेल्या बदलांबाबत सायली म्हणाली की, हा खूप मोठा प्लॅटफॅार्म आहे. इथं आल्यानं माझं गाणं चांगलं झालंच, पण पर्सनॅलिटीही डेव्हलप झाली आहे. हे सुरुवातीला जेव्हा इथे आले, तेव्हा पोटात गोळा यायचा, भीती वाटायची, थरथरायला व्हायचं, कॅान्फिडन्सच नसायचा, खूप नर्व्हसनेस असायचा, इथं आम्हाला म्युझिकली ट्रेन केलं जात आहे. केवळ गाणंच नाही तर ओव्हरआॅल आमचं व्यक्तिमत्त्व उभं करायला खूप सपोर्ट दिला जात आहे. या प्लॅटफॅार्मवर मिळालेलं प्रेम शब्दांत सांगणं कठीण आहे. ज्या व्यक्ती मला ओळखतही नाहीत तीदेखील माझ्यावर प्रेम करताहेत. असं घडेल याचा स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. नोव्हेंबरपासून हा सीझन सुरू झाला आहे. या दरम्यान विविध प्रकारची गाणी गायला मिळाली. खूप गाणी शिकले. घरी असते तर गाण्यांची इतकी व्हरायटी शिकता आली नसती. या मंचानं मला खूप शिकवलं. तुमच्याकडून जे प्रेम मिळतंय त्यामुळं स्वत:वरील विश्वास वाढलाय. आता मी स्टेजवर गेल्यावर तुम्हा सर्वांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी गाते. फिनालेसाठी काहीच एपिसोड्स शिल्लक आहेत. त्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत असाच सपोर्ट करून भरभरून मतं द्याल आणि मला या पर्वाची विजेती बनवाल असा विश्वास आहे.

    दिग्गजांची कौतुकाची थाप
    कुमार सानू दोनदा आले. ते म्हणाले की, ‘तू परफेक्ट गातेस.’ आनंदभाईंनी इंडस्ट्रीतील बऱ्याच गायकांचं नामकरण केलं आहे. कुमार सानू, साधना सरगम, सुनिधी चौहान यांची नावं आनंदभाईंनी ठेवली आहेत. त्यांनी माझं सायली किशोर हे नामकरण केलं आहे. संगीताचे जादूगार ए. आर. रेहमान आणि अजय-अतुलसुद्धा आले होते. अजय-अतुल आणि रेहमान यांच्यासमोर मला गाण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्यासमोर परफॅार्म करण्याची इच्छा आहे. रेखांनी आम्हा सर्वांना नावानं हाक मारली. त्या आमचा कार्यक्रम न चुकता पाहतात. इतक्या मोठ्या व्यक्ती आपला कार्यक्रम पाहतात ही खूप मोठी गोष्ट आहे. आदित्यभैया  इंडस्ट्रीबाबत माहिती देतो. ही केवळ सुरुवात असून, इथून बाहेर गेल्यावर तुम्हाला खरं काम करायचं आहे. त्यासाठी स्वत:ला कायम तयार ठेवा असं सांगतो. आजवर मुली इतक्या अखेरपर्यंत टिकल्या नसल्यानं ही स्पर्धा एखाद्या गायिकेनं जिंकावी असं त्याला वाटतंय. यासाठी तो मोटिव्हेट करतो. ‘आप लडकीयां छा रहो’, असं म्हणत उत्साह वाढवतो.

    सकस स्पर्धेचा फायदा होतोय
    जेव्हा मी इथं आले, तेव्हा एकटी होते. कोणालाही ओळखत नव्हते, पण आता आम्ही मित्र बनलो आहोत. मी कोणतंही गाणं परफॅार्म करण्यापूर्वी आशिषला ऐकवते. तो माझं काय चुकतंय किंवा कसं छान होऊ शकतं हे सांगतो. तो बऱ्याचदा त्याचं गाणं मला ऐकवतो. अरुणीताच्याबाबतीतही असंच करतो. आम्ही एकमेकांची गाणी ऐकून त्यातून शिकत पुढे जात आहोत. त्यामुळं लोक जेव्हा याला स्पर्धा म्हणतात, तेव्हाच ही स्पर्धा असल्याचं जाणवतं. एरव्ही आम्ही एकमेकांना मदत करून खूप काही शिकत असतो. मी स्पर्धेसाठी आलोय आणि दुसऱ्याला हरवायचं आहे असा कोणाचाच अॅटिट्यूड नाही. प्रत्येक जण जिंकण्यासाठी गातोय. एखाद्याचा चांगला सूर लागला की दानिश ढसाढसा रडतो. निहाल आणि माझंही खूप छान बाँडींग आहे. पवनदीपच्या बाबतीतही तेच म्हणेन. शन्मुखप्रिया आमच्यात खूप लहान असल्यानं तिला छोटू म्हणतो, पण स्टेजवर गेल्यावर ती वाघीण बनते. प्रत्येक जण म्युझिकशी प्रामाणिक असल्यानं दुसऱ्यावर मात करायची म्हणून कोणीही गात नाही.

    माझ्या दमलेल्या बाबाची कहाणी
    माझे बाबा कुलाब्यातील अश्विनी हॅास्पिटलसाठी अॅम्ब्युलन्स चालवतात. ते आज खूपच खुश आहेत. मी लहानपणापासून बाबांना ओळखलंच नव्हतं. माझे वडील नेमकी कशी व्यक्ती आहे हे मला समजलंच नाही. कारण बाबा कायम कामाला असायचे. मी कायम आईसोबत असायचे. त्यामुळं त्यांच्यासोबत कधी वेळ घालवण्याची संधी मिळाली नव्हती. इथं आल्यावर मला त्यांचं कधीही न पाहिलेलं रूप दिसलं. ते केवळ माझ्याच परफॅार्मंसवर नाचत नाहीत, तर सर्वांचेच परफॅार्मंसेस एन्जॅाय करतात. आपली एनर्जी कशी हाय ठेवायची ते मी त्यांच्याकडून शिकत आहे. शूटिंग संपत असतानाही ते उभे राहून सर्वांना चिअर-अप करत असतात. काम आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळं त्यांनी आयुष्यात इतकं कधीच एन्जॅाय केलं नसेल. त्यांच्या कामाला कधी इतका मानसन्मान दिलेला नव्हता, पण इथं त्यांना तो मान मिळतोय.

    परीक्षकांचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं
    नेहामॅडमसारख्या स्टेज परफॅार्मर अद्याप पाहिली नाही. अनू मलिकसर मोटिव्हेट करतात. दमणला असताना ते कायम आम्हाला गाईड करायचे. विशाल ददलानीसरही खूप गोष्टी समजावून सांगायचे. हिमेशसरांनी पवनदीप, सवाई भट आणि अरुणीताकडून गाणं गाऊन घेतलं आहे. आता आमचीही गाणी येतील. हिमेशसरांनी आजवर बरीच अजरामर गाणी केली आहेत. त्यांच्यासारख्या संगीतकारासोबत काम करण्याची संधी इंडियन आयडॅालमुळं मिळत आहे. सोनूमॅडमनी नुकतीच माझ्या एका व्हिडीओवर कमेंट केली. त्यामुळं मला भरून आलं. या आमच्यासाठी खूप मोठ्या गोष्टी आहेत. त्या खूप पॅाझिटीव्ह विचार करणाऱ्या आहेत.

    आशा भोसले माझं दैवत
    आशाबाईंनी जे काही गायलं आहे ते कोणीच करू शकत नाही. ‘घन राणी…’, ‘साथी रे भूल न जाना…’ यांसारखी गाताना खूप एनर्जी लावावी लागते. कोणत्याही गायकासाठी ते सोपं नाही. ही गाणी त्यांनी वन टेक गायली आहेत. हे अनबिलीव्हेबल आहे. आशाबाई मला खूप आवडतात. त्यांनी गायलं नाही असं काहीच राहिलेलं नाही. अशी कुठलीच जागा नाही जी त्यांच्या गळ्यातून आलेली नाही. असा कुठलाच सूर नाही जो त्या लावू शकत नाहीत. त्यामुळेच माझ्यासाठी त्या दैवत आहेत.