भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घालताना ‘अजूनही बरसात आहे’!

मालिका दिवसेंदिवस रंजक होत जातेय आणि प्रेक्षकांचा मालिकेतला आणि गोष्टीत आता पुढे काय होणार, यातला रस अजून वाढत जातोय. मालिकेची गोष्ट ही आदिराज आणि मीरा यांच्या प्रेमकथेभोवती फिरते आहे.

    बऱ्याच वर्षांनी उमेश कामत आणि मुक्ता बर्वे हे कलाकार सोनी मराठी वाहिनीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मालिका आणि मालिकेतले मीरा (मुक्ता) आणि आदिराज (उमेश) यांची प्रेमकथा प्रेक्षकांना आवडते आहे. प्रेमाला कुठे असते Expiry Date? असं म्हणत मीरा आणि आदिराज प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करताहेत. इतकंच नाही तर मालिकेवर आणि या जोडीवर चाहत्यांच्या प्रेमाचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. चाहत्यांनी कविता पाठवून, रांगोळ्या काढून, मालिकेच्या शीर्षकगीताची कॅलिग्राफी केलेली  छत्री तयार करून आपलं प्रेम कलाकारांपर्यंत पोचवलं आहे. एवढंच नाही तर  #Adira असा हॅशटॅगसुद्धा या जोडीसाठी चाहत्यांनी बनवला आहे. 

    मालिका दिवसेंदिवस रंजक होत जातेय आणि प्रेक्षकांचा मालिकेतला आणि गोष्टीत आता पुढे काय होणार, यातला रस अजून वाढत जातोय. मालिकेची गोष्ट ही आदिराज आणि मीरा यांच्या प्रेमकथेभोवती फिरते आहे. त्यामध्ये प्रेक्षकांना काही फ्लॅशबॅक सीन बघायला मिळताहेत ज्यातून मीरा आणि आदिराज यांची भूतकाळातली प्रेमकहाणी उलगडतेय. या फ्लॅशबॅक सिन्सना प्रेक्षकांची खास पसंती मिळतेय आणि हे सीन चित्रित करण्यासाठी कलाकार आणि संपूर्ण टीम अतिशय मेहेनत घेते आहे. या सिन्ससाठी कलाकार आत्ताच्या वयापेक्षा १० वर्षं तरुण दाखवण्यात आले आहेत. त्यासाठी मुक्ताची वेगळी हेअर स्टाईल आणि उमेशचा बिना दाढीचा लूक दाखवण्यात आला आहे. फ्लॅशबॅकसाठी पूर्ण दाढी केल्यानंतर पुन्हा वर्तमानातलं चित्रीकरण करण्यासाठी उमेशला मध्ये २-३ दिवस वेळ द्यावा लागतोय. सध्या चित्रीकरणासाठी अनेक प्रकारचे नियम पाळावे लागताहेत अशा परिस्थितीत दोन लुक्स सांभाळून चित्रीकरण करणं, ही कलाकारांसाठी आणि टीमसाठी तारेवरची कसरत आहे आणि मालिकेला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम हे या केलेल्या कसरतीचं फळ आहे, हे नक्की. 

    मालिकेत आता पुढे नक्की काय घडणार, मीरा आणि आदिराज यांची प्रेमकथा पुढे कोणतं वळण घेणार, हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा, ‘अजूनही बरसात आहे’. सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. सोनी मराठी वाहिनीवर.