जहांगीर कला दालनामध्ये ‘सोलफुल सिम्फनी ‘; जयश्री सवानी यांच्या कलाकृतींचे २३ फेब्रुवारीपासून प्रदर्शन

अमूर्तता म्हणजे आत्मपरीक्षणाची संधी. यामुळेच त्यांच्या चित्रात गडद रंग प्रामुख्याने दिसतात. मानवी मनाचा निखळ आनंद आणि मनात उपजत असलेली प्रेमाची भावना हे दाखवण्यासाठी यापेक्षा वेगळ्या रंगांचा वापर होऊच शकत नाही.

    मुंबई : प्रसिद्ध चित्रकर्ती जयश्री सवानी यांनी आपल्या भावभावनांचे, आपल्या आतल्या आवाजाचे चित्रण केले असून, त्या कलाकृती ‘सोलफुल सिम्फनी’ या शीर्षकांतर्गत मुंबईतील जहांगीर कलादालनात २३ फेब्रुवारीपासून प्रदर्शित होत आहेत. या विश्वात जी कोणती गोष्ट अस्तित्वात आहे, तिची जागा ठरलेली आहे, आणि इतरांशी योग्य ती सांगड घालत आपली भूमिका ती चपखलपणे निभावते आहे, यावर जयश्री यांचा दृढ विश्वास आहे. आपल्यासाठी जी भूमिका आधीच लिहिली गेली आहे, ती चोखपणे वठवतानाच त्याचा आनंद घ्यायचा आणि तो इतरांनाही द्यायचा हेच आपल्या हातात असल्याचे त्या सांगतात.

    जयश्री यांच्यासाठी अमूर्तता म्हणजे आत्मपरीक्षणाची संधी. यामुळेच त्यांच्या चित्रात गडद रंग प्रामुख्याने दिसतात. मानवी मनाचा निखळ आनंद आणि मनात उपजत असलेली प्रेमाची भावना हे दाखवण्यासाठी यापेक्षा वेगळ्या रंगांचा वापर होऊच शकत नाही.

    इथे प्रत्येक क्रिया आणि भावनेला काही न काही अर्थ आहे. त्याचे काहीतरी परिणाम होतच असतात. जयश्री यांच्या याच विचारांचं प्रतिबिंब त्यांच्या या अमूर्त चित्रप्रदर्शनात पडलेलं दिसतं.

    या प्रक्रियेबद्दल त्या सांगतात, माझ्या अंतर्मनात ज्या काही कल्पना किंवा विचार येतात, त्यांना मी कॅनव्हासवर उतरवते.

    जगात घडणाऱ्या प्रक्रियेचा शोध घेण्याची मला जी आवड आहे, ती मला शांत बसूच देत नाही. त्यामुळेच मी सगळ्या नैसर्गिक प्रक्रियांमध्येही हाच शोध घेत फिरते.

    प्रकाश आणि सावलीचा खेळ या रंगांच्या माध्यमातून रेखाटायला मला फार आवडते. निसर्गसुद्धा वेगवेगळ्या रंगांच्या माध्यमातून व्यक्त होत असतो, त्या निसर्गाच्या भावना ‘ब्लूम’ चित्रामधून व्यक्त होतात. त्यांच्या एका चित्रात खरेपणा दाखवण्यासाठी पांढऱ्या रंगाचा वापर केला आहे.

    हे अत्यंत समर्पक आहे. कारण, एखाद्याची वाईट बाजू दाखवण्यासाठी प्रामुख्याने काळ्या रंगाचा वापर होतो. त्यांच्या ‘ब्रेकथ्रू’ या चित्रातून अचानक झालेले क्रांतिकारी बदल दिसतात.

    आपला आतला आवाज मांडण्याचे प्रामाणिक प्रयत्न जयश्री सावनी यांनी केले आहेत. त्याला निश्चितच भेट द्यायला हवी. मुंबईत जन्मलेल्या जयश्री या वाणिज्य पदवीधर आहेत. चित्रकलेचे शिक्षण त्यांनी स्वतःच घेतले आहे. याशिवाय फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी डिप्लोमा केला आहे.

     

    कला हे त्यांचे पॅशन आहे. चित्रे काढण्याबरोबरच त्या एक उत्तम नर्तिका आहेत. फॅशन डिझायनर आहेत. याचबरोबर त्या तरुणांना चित्रकलेचे धडे देतात.

    आजवर त्यांच्या कलाकृतींचे देशभरातील वेगवेगळ्या कलादालनात अनेक प्रदर्शने भरली असून, समूह प्रदर्शनांमध्येही त्या सहभागी झाल्या आहेत.

    • चित्रकार: जयश्री सवानी
    • प्रदर्शनाचे शीर्षक : ‘सोलफुल सिम्फनी’
    • कालावधी: २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२१
    • स्थळ: जहांगीर कलादालन, काळा घोडा, मुंबई
    • वेळ: सकाळी ११ ते ७ वाजेपर्यंत