ssr death case Showik and drug smuggler Anuj discuss drug exchange in WhatsApp chat
शौविक आणि ड्रग्स तस्कर अनुजचे व्हॉट्सअप चॅट

  • अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ
  • नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई
  • ड्रग्स पार्टीसाठी ८० हजार रुपये खर्च केल्याचा उल्लेख

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात (SSR Death Case) ड्रग्ज (drugs) अँगल समोर आल्यानंतर एनसीबी (NCB) कडून तपासात दररोज नवनवी माहिती समोर येते आहे. यातून सुशांतची (Sushant Singh Rajput) गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) अडचणीत भर पडते आहे. आता रियाचा भाऊ शौविक (Showik Chakraborty) आणि ड्रग्जची तस्करी (Smuggling) करणाऱ्या अनुज केशवानी यांच्यातील व्हाट्सअप चॅट (whatsapp chat) समोर आले आहेत.

या संवादात ड्रग्जच्या देवाणघेवाणीची चर्चा आहे. चॅटमध्ये अनुजने शौविकला गांजाचे फोटो पाठविले आहेत, तसेच गांजाच्या छोटी कळी आणि मोठ्या कळीच्या विषयात माहिती दिली आहे. त्यावर शौविकने ठिक आहे असा रिप्लाय दिला आहे. यापुढे शौविकने लिहिले आहे की, हा गांजा पाठवून दे, जो माल येतो आहे, त्याचा दर्जा चांगला आहे का, गेल्या वेळी पाठवलेला माल चांगला नव्हता, असेही शौविकने या चॅटमध्ये पाठविले आहे.

यावर उत्तर देताना अनुजने ‘ भाई, ठिक आहे, मी स्वत: माल घेण्यासाठी जात आहे’, असे उत्तर पाठविले आहे. यावर शौविकने अनुजला विचारले आहे की, ‘किती वाजेपर्यंत डिलिव्हरी करण्यासाठी येशील?, ५० ग्रॅम आहे का ?’ यावर अनुजने ३.३० ते ४.३० पर्यंत येतो असा रिप्लाय दिला आहे.

शौविक आणि अनुजचे हे चॅटिंग रियाच्या अडचणी वाढवणारे आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात रिया, शौविकसह १८ जणांना एनसीबीने अटक केली आहे. रिया २२ सप्टेंबरपर्यंत भायखळा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.

सुशांतच्या फार्म हाउसवर मिळाली डायरी

एनसीबीने सुशांत सिंह राजपूतच्या फार्म हाउसवर घातलेल्या छाप्यात नवी माहिती हाती आली आहे. ८ मार्च २०१९ या दिवशी ‘छिछोरे’ या सिनेमाची पार्टी पवना धरणातील बेटावर झाल्याचे समोर आले आहे. या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावल्याची माहितीही एनसीबीला मिळाली आहे. या पार्टीत ड्रग्जचा वापर झाल्याचे पुरावेही हाती लागले आहेत. तसेच सुशांतच्या फार्महाऊसवर डायरीही हाती लागली आहे.