फत्ते होणार सुभाषचं ‘ऑपरेशन यमन’!

'कॅप्टन इंडिया' या हिंदी चित्रपटाची घोषणा केल्यानं वादसदृश परिस्थिती निर्माण झाली. सुभाष यांनी 'नवराष्ट्र'शी खास बातचित करताना नेमकं काय घडलं त्यावर प्रकाश टाकला.

  मागील काही दिवसांपासून समान विषयावर दोन चित्रपट बनवला जाण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोस्ट प्रोडक्शनच्या कामात आघाडीवर असलेले मराठमोळे निर्माता-दिग्दर्शक सुभाष काळे चित्रपट निर्मितीकडे वळले आहेत. निर्माता हरमन बावेजानंही याच विषयावर आधारित ‘कॅप्टन इंडिया’ या हिंदी चित्रपटाची घोषणा केल्यानं वादसदृश परिस्थिती निर्माण झाली. सुभाष यांनी ‘नवराष्ट्र’शी खास बातचित करताना नेमकं काय घडलं त्यावर प्रकाश टाकला.

  २०१५ मध्ये यमनी क्रायसेसच्या काळात विदेश मंत्रालयानं यमनमध्ये वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी एक ऑपरेशन आखलं होतं. या ऑपरेशनच्या को-ऑर्डिनेशनची जबाबदारी निवृत्त जनरल वी. के. सिंग यांच्याकडं सोपवण्यात आली होती. याच ऑपरेशनवर एकाच वेळी दोन चित्रपट बनत असल्यानं वादंग निर्माण झाला आहे. या विषयावर सुभाष ‘ऑपरेशन यमन’ हा चित्रपट बनवत असून, हरमननं कार्तिक आर्यनसोबत ‘कॅप्टन इंडिया’ची घोषणा केली आहे. याबाबत सुभाष म्हणाले की,  २०१५ मध्ये यमन आणि सौदी अरेबियामध्ये झालेल्या युद्धावेळी तिथे ४००० भारतीय अडकले होते. त्यांच्या रेस्क्यू मिशनवर आम्ही नऊ महिन्यांपासून काम करत होतो. यात माझ्यासोबत हिंदीतील आघाडीचे एडिटर संजय संकला आहेत. त्यांनी यापूर्वी ‘दिल है के मानता नहीं’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘रावडी राठोड’ यांसारखे महत्त्वपूर्ण चित्रपट केले आहेत. त्यांच्यासोबत मी या प्रोजेक्टवर काम करत होतो. संकला यांचा नातेवाईक यमनमधील ऑपरेशनमध्ये सामील होता. त्यांनी ही स्टोरी संकलांना सांगितली होती. त्यावर ते २०१६ पासून काम करत होते. मला विषय आवडल्यानं २०१९ पासून आम्ही दोघांनी मिळून या प्रोजेक्टवर काम सुरू करून लॅाकडाऊनमध्ये स्क्रीप्ट पूर्ण केली. प्री-प्रोडक्शनचं कामही पूर्ण झालं. आर्टिस्टशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू झाली. संकला यांनी अक्षयसोबत काम केलं असल्यानं त्यांचे त्याच्याशी संबंध खूप चांगले आहेत. मी आदित्य रॅाय कपूर, विकी कौशल, परेश रावल यांच्याशी संपर्क साधला. परेश रावल यांनी ग्रीन सिग्नल दिला. अक्षय लंडनवरून आल्यानंतर नॅरेशन ऐकून निर्णय घेणार होता. सर्व लॅाक करून चित्रपटाची घोषणा करणार इतक्यात ‘कॅप्टन इंडिया’ नावाच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आणि पोस्टर लाँच करण्यात आलं. पोस्टर आल्यावर आम्हाला समजलं की त्यात यमनची राजधानी सनामधील चित्र आहेत. आपण करत असलेल्याच विषयावर हा चित्रपट असल्याची गोष्ट मी संकला यांच्या लक्षात आणून दिली. त्याची निर्मिती हरमन बावेजा करत असून, हंसल मेहता दिग्दर्शन करणार आहेत.

  एकाच विषयावर दोन चित्रपट

  दोन्ही चित्रपट सिमीलर विषयावर आधारीत असल्याचं जाणवलं. आमचे कलाकार फायनल नसल्यानं घोषणा केलेली नव्हती. त्यांनी लगेच कलाकार निवडून, पोस्टर लाँच करून घोषणाही केली. एकाच विषयावर दोन चित्रपट बनत असल्यानं दोघांनाही याचा फटका बसणार हे जाहीर होतं. आम्ही तर २०१६ पासून ‘ऑपरेशन यमन’ या चित्रपटावर काम सुरू केलं होतं. कलाकारांची निवड करताना आदित्यशी संपर्क साधण्यासाठी आम्ही कॅार्न नावाच्या सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीला चित्रपटाची संकल्पना पाठवली होती. त्यावेळी सिमीलर विषयावर दोन चित्रपट येत असल्याचं कॅार्नचे क्षितीज मेहता काहीच बोलले नव्हते. त्यामुळं आम्ही बेसावध राहिलो. कार्तिक अशाच विषयावर आधारीत चित्रपटात काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं नाही. विषय चांगला असल्यानं नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आदित्यच्या तारखा मिळवून देतो असं ते म्हणाले, पण ‘कॅप्टन इंडिया’ची घोषणा झाल्यावर आम्हाला धक्का बसला आणि कॅार्नमधूनच ही कॅान्सेप्ट लीक झाल्याचा संशय येऊ लागला.

  …अशी झाली कॅान्ट्रोव्हर्सी

  एकाच विषयावर दोन चित्रपट येत असल्यानं आरोप-प्रत्यारोप झाले आणि त्याचं रूपांतर कॅान्ट्रोव्हर्सीमध्ये झालं. कथा चोरीचा मुद्दा ऐरणीवर आला, पण दोन्ही चित्रपटांची केवळ संकल्पना समान आहे. कथा वेगवेगळ्या असू शकतात. महिन्याभरानंतर मी जेव्हा हरमनशी बोललो, तेव्हा समजलं की तो देखील तीन-चार वर्षांपासून त्या प्रोजेक्टवर काम करत होता. हा चित्रपट पब्लिक डोमेनवर असल्यानं या विषयावर कोणाचं बंधन नसल्यानं कोणीही चित्रपट बनवू शकतो असा विचार केला. आपण आपला चित्रपट चांगला बनवायचा आणि लोकांवर निर्णय सोपवायचा असं ठरवलं. एकाच इंडस्ट्रीत राहून एकमेकांशी वैर का घ्यायचं हा विचार केला आणि सामंजस्यानं हे प्रकरण निकाली काढलं.

  यासाठी थांबलो होतो

  ‘ऑपरेशन यमन’ या चित्रपटाचं रजिस्ट्रेशन आम्ही ७ जूनलाच केलं होतं. हरमननं २३ जुलैला ‘कॅप्टन इंडिया’ची घोषणा केली. आम्ही टायटल आणि स्क्रीप्टही रजिस्टर केलं आहे. आता दोन्ही चित्रपट बनणार आहेत. आता आमचा फोकस कलाकारांची निवड करण्यावर आहे. संजय संकला याचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘मिशन मंगल’च्या लेखिका निधी सिंग धर्मा यांच्या साथीनं मी आणि संकला यांनी या चित्रपटाचं केलं आहे. सिने कलर्स स्टुडिओ या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. तांत्रिक टीम आणि क्रिएटीव्ह टीम ठरलेली आहे. केवळ कलाकार लॅाक झाले की, सर्वांना फायनल करण्यात येईल. २०२२ मध्ये शूट सुरू करून, २०२३मध्ये ‘ऑपरेशन यमन’ रिलीज करण्याची आमची योजना आहे. अक्षय सध्या खूप बिझी असल्यानं त्यातून थोडा वेळ काढून आमच्या चित्रपटाला देणार असल्याचं त्यानं संकला यांना सांगितलं आहे. आता अक्षयच्या तारखांसाठी थांबावं लागणार आहे.

  याची काळजी घेणार आहोत

  आणखी बऱ्याच गोष्टी करण्याचा विचार आहे. त्यानंतर लगेचच ‘ऑपरेशन यमन’ची घोषणा करण्यात येईल. या चित्रपटाचं बजेट १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एकाच विषयावर दोन चित्रपट बनत असल्यानं दोन्ही सिमीलर होऊ नयेत यासाठी प्लॅाटमध्ये काही बदल करता येईल का याची चाचपणी करणार आहोत. एकाच विषयावर दोन प्रोजेक्ट येतात तेव्हा त्याचा फटका दोघांनाही बसतो. हर्षद मेहताच्या घोटाळ्यावर ‘स्कॅम १९९२’ ही वेब सिरीज आली आणि त्याच विषयावर अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’सुद्धा आला. त्यामुळं दोघांमध्ये तुलना झाली. त्याचा फटका चित्रपटाला बसला. काही वर्षांपूर्वी शहीद भगतसिंग यांच्यावर एकाच वेळी बरेच चित्रपट आले होते. तेव्हाही प्रत्येकाला थोड्या फार प्रमाणात नुकसान सोसावं लागलं होतं. तसं काही आमच्या चित्रपटाबाबत व्हायला नको याची काळजी घेणार आहोत. ‘पद्मावत’, ‘केदारनाथ’, ‘पॅडमन’, ‘लक्ष्मी’, ‘राधे’ यांसारख्या हिंदीतील बऱ्याच बिग बजेट चित्रपटांच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम रिअल टच स्टुडिओमध्ये करण्यात आलं आहे.