Tushar Shetty

‘सुपर डान्सर’चा(Super Dancer 4) चौथा सीझन अंतिम टप्प्यात पोहोचला असून, ९ ऑक्टोबरला ग्रँड फिनाले होणार आहे. सोनी एन्टरटेन्मेंटवरील या शोमधील चिमुरड्या डान्सर्सचं सर्वत्र खूप कौतुक होत आहे. या शोमधील फ्लोरिना (Florina And Tushar Shetty)आणि तिचा डान्सिंग गुरू कोरिओग्राफर तुषार शेट्टी (Choreographer Tushar Shetty Interview)सध्या लाइमलाईटमध्ये आहेत. फिनालेच्या तयारीमध्ये बिझी असलेल्या तुषारनं वेळात वेळ काढून ‘नवराष्ट्र’सोबत एक्सक्लुझिव्ह बातचित केली.

  ‘सुपर डान्सर ४’बद्दल तुषार म्हणाला की, हा सोनीवरील माझा तिसरा शो आहे. यापूर्वी ‘सुपर डान्सर ३’ आणि ‘इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये होतो. या शोवर लोकं खूप प्रेम करत असून, खूप पाठिंबाही मिळत आहे. या शोचा अनुभव खूप वेगळा आहे. अशा प्रकारचं फॅन फॅालोईंग आणि फेम या शोमध्ये जास्त अनुभवायला मिळालं. याचं मुख्य कारण फ्लोरिना असल्याचं मी म्हणेन. फ्लोरिना ऑडीशनपासूनच खूप फेमस झाली आहे. तिचं पेअरींग कोणासोबत होईल हे जाणून घेण्यासाठी त्या वेळेपासूनच लोकं खूप उत्सुक होते.

  ‘सुपर डान्सर ३’मध्ये प्रेक्षकांनी मला तेजससोबत पाहिलं असल्यानं माझी फ्लोरिनासोबत जोडी बनावी असं बऱ्याच जणांना वाटत होतं. तिसुद्धा हिपॅाप करते आणि मी देखील. त्यामुळं दोघांची स्टाईल थोडी सिमिलर आहे. अखेर लोकांच्या इच्छेप्रमाणेच झालं. आमची जोडी बनली आणि नंतर छान बाँडिंगही झालं. फ्लोरिनासोबत डान्स करताना खूप मजा येते. तिच्यासोबत जितकी मस्ती करतो ते सर्व डान्समध्ये उतरतं आणि ते लोकांपर्यंत पोहोचतं. याच कारणामुळं लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे. त्यासाठी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. फिनालेमधील फरफॅार्मन्स ग्रँड असेल. खूप डान्सर्स, मोठमोठे प्रॅाक्स, भव्य सेट, वेगवेगळे कलाकार असतील. फिनालेची तयारी खूप जोरात सुरू आहे. प्रेशर मुळीच नाही. फिनालेमध्ये पोहोचल्यानं आता फ्लोरिनाला केवळ एखाद्या स्टारसारखं परफॅार्म करायचं आहे. यापूर्वी तिनं असं कधी अनुभवलेलं नसल्यानं ती खूप एक्साईटेड आहे. फिनालेमध्ये पृथ्वी आणि संचितसोबत फ्लोरिनाची तगडी स्पर्धा होणार असल्याचं जाणवतं. डान्सवाईज पाच मुलं आपापल्या फॅार्ममध्ये एक्स्पर्ट आहेत.

  यासाठी ‘सुपर डान्सर ४’ वेगळा
  ‘सुपर डान्सर ४’मधील आव्हानं पूर्वीच्या शोपेक्षा खूप वेगळी होती. मागच्या पर्वात माझ्यासोबत तेजस होता आणि तो खूप छान डान्सर आहे हे सर्वांना माहित आहे. तो वयानं थोडा मोठा होता आणि पूर्वी शो केल्यानं अनुभवी होता. माझ्यासोबत चित्रपटही केल्यानं माझी काम करण्याची शैली त्याला माहित होती. त्यामुळं काम ईझी व्हायचं. ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ हा मोठ्या लोकांचा शो होता. त्यामुळं या शोच्या तुलनेत तिथं कमी मेहनत घ्यावी लागली. ‘सुपर डान्सर ४’मध्ये फ्लोरिनासारख्या सहा वर्षांच्या मुलीला ट्रेन करायचं आव्हान होतं. ती इतकी लहान आहे की तिला काही गोष्टी समजतही नव्हत्या. केवळ तिच्याकडून डान्स करून घ्यायचा होता. ती खूप उत्तम डान्सर असल्याचा फायदा झाला, पण आपण एका स्पर्धेत असल्यानं परफॅार्मन्सवर भर द्यावाच लागणार होता. हे करताना तिला स्पर्धेचं प्रेशरही द्यायचं नव्हतं. ते प्रेशर घेण्याचं तिचं वय नाही. या आव्हानासोबतच तिच्याकडून चांगले ॲक्ट आणि डान्स करून घेणं माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. फ्लोरिनाला शिकवण्यासाठी मला तिच्यासारखं लहान बनावं लागलं. तिच्यासारखा विचार करावा लागला. तिच्यासोबत मस्ती करत डान्स आणि ॲक्ट शिकवावा लागला. हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा आणि अविस्मरणीय आहे.

  फ्लोरिनाची ‘ही’ गोष्ट भावली
  मुलं लहान असल्यानं त्यांच्यावर प्रेशन नव्हतं, ते आमच्यावर होतं. कारण परफॅार्मन्स चांगला झाला नाही तर त्यांना कोणी काही बोलणार नाही. सुरुवातीला फ्लोरिनाला थोडी समज कमी होती, पण शो सुरू झाल्यावर चार-पाच आठवड्यांनी ती समजू लागली. आजूबाजूच्या वातावरणाची तिला जाणीव झाली. सर्व मुलं चांगला डान्स करत असल्यानं आपल्यालाही बेस्ट द्यावं लागणार हे तिला समजलं. त्यामुळं ती या शोबाबत अधिक सिरीयस झाली आणि मेहनतही घेऊ लागली. मी जे शिकवायचो ते ती रात्री घरी जाऊन प्रॅक्टीस करायची. दुसऱ्या दिवशी यायची तेव्हा त्या स्टेप्स पूर्ण तयारीनिशी सादर करायची. तिला पूर्ण बीटससह डान्स लक्षात असायचा ही तिची गोष्ट मला खूप भावली. त्यावरून मला लक्षात आली की ती मेहनती आहे. तिची सुरेख साथ लाभल्यानं आमच्या यशाचं क्रेडीट मी तिला देईन.

  वेगवेगळ्या स्टाईल्स केल्या
  फ्लोरिना जेव्हा मला भेटली तेव्हा ती हिपहॉप फ्री स्टाईल डान्सर होती. तिनं कधी कोरिओग्राफी करून डान्स केलेला नव्हता. फक्त गाणं वाजवून त्यावर डान्स करत स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. अशा डान्सरना कोरिओग्राफी शिकवणं हे मोठं चॅलेंज असतं. कारण मी लाईफमध्ये केवळ कोरिओग्राफी केली आहे. शोमध्येही दोन-तीन मिनिटांच्या ॲक्टमधून कोरिओग्राफी सादर करायची असते. इथं आल्यानंतर फ्लोरिना कोरिओग्राफी शिकली असून, आम्ही बऱ्याच स्टाईल्सही केल्या. सालसा, फुटवर्क, बॅालिवूड, फुटवर्कच्या वेगवेगळ्या स्टाईल्स, हिपहॉपचे स्ट्रीटसाईज, वॅकींग, लॅाकींग, हाऊल्स हे इंटरनॅशनल स्टाईल्स फ्लोरिनानं खूप चांगल्या प्रकारे सादर केले आहेत. या सर्व स्टाईल्स प्रॅक्टीस करून शिकायला आम्हाला खूप वर्ष लागली. मात्र फ्लोरिनानं सात-आठ महिन्यांमध्ये चार-पाच दिवसांमध्ये स्टाईल पिक करून स्टेजवर परफॅार्म केलं आहे. यासाठी मी फ्लोरिनाला ॲप्रिशिएट करेन. कारण माझी कोरिओग्राफी इझी नसते.

  आसामी बिहू ते सुपर डान्सर
  फ्लोरिना मूळची आसाममधील असून, सुरुवातीला ती बिहू हे तिथलं लोकनृत्य करायची. फ्लोरिना लहान असताना तिची आई तिच्याकडून बिहू डान्स करून घ्यायची. एका व्हिडीओमध्ये आई-वडील दोन वर्षांच्या फ्लोरिनाला बिहू शिकवत असल्याचं पहायला मिळतं. ‘सुपर डान्सर २’चा विजेता विशालही आसाममधील असल्यानं फ्लोरिना त्याच्याकडे डान्स शिकायला गेली, पण तिचा इंटरेस्ट नव्हता. तिला हिपहॉप फ्रीस्टाईल शिकायचं होतं. खरं तर तिच्या बॅाडी लँग्वेजमध्येच ते होतं. त्यामुळं ती हिपहॉप फ्रीस्टाईल शिकली. इतकंच तिचं डान्सचं ट्रेनिंग झालं. तिनं एक-दोन वर्ष डान्स केला असेल आणि शोमध्ये आली. फ्लोरिनामध्ये ते नॅचरली आहे. मी फक्त तिचं टॅलेंट पॅालिश करून चांगले परफॅार्मंसेस कोरिओग्राफ केले.

  जजेससोबतही खूप छान बाँडिंग
  शिल्पामॅडम प्रत्येक ॲक्टनंतर ‘शेट्टी’ बोलतात ते खूप आवडतं. कारण तेव्हा मॅडम काय फिल करत असतात ते जाणवतं. जजेस खूप प्रेमानं कॅाम्प्लिमेन्टस देतात. त्यामुळं आत्मविश्वास वाढतो. पुढील ॲक्टसाठी उत्साह वाढतो. गीतामॅडम आईसारखं प्रेम करतात. अनुरागदादांचं फ्लोरिनासोबत जराही जमत नाही. दोघांमध्ये तू तू मै मै सुरू असते. फ्लोरिनाला मी टॅाप थ्रीमध्ये बघतो, हे अनुरागदादांचं वाक्य उत्साहवर्धक ठरलं. त्या क्षणापासून दादांनी खूप सपोर्ट केला. आम्ही प्युअर डान्सिंग करतो अशी कमेंट त्यांनी बऱ्याचदा दिली आहे. त्यांनी आमच्यासाठी खूप वेळा कप फोडले आहेत.

  आदर्शवत प्रभूसर
  गोविंदासरांनी माझ्या कोरिओग्राफीचं खूप कौतुक केलं. एका डान्सिंग लिजेंडकडून कौतुक होणं खूप मोठी गोष्ट आहे. हेमा मालिनी, संजय दत्त, नीतू सिंग, मौसमी चॅटर्जी, तनुजा, सोनाली बेंद्रे या सर्वांनी फ्लोरिनासोबत माझंही खूप कौतुक केलं. सर्वांनी फ्लोरिनासोबत डान्सही केला आहे. कोरिओग्राफर्समध्ये प्रभू देवासर माझे आयडल आहेत. लहानपणापासून त्यांच्या गाण्यांवर फिदा आहे. त्यांना फॅालो करतो आणि त्यांच्यासोबत कामही केलं आहे. ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’मध्ये अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरिना कैफ या तिघांना डान्स शिकवण्याची संधी मिळाली. त्यावेळी प्रभूसरांनी माझं खूप कौतुक केलं आणि माझ्याकडून काही नवीन गोष्टीही शिकले.

  थोरल्या भावाकडून मिळाली प्रेरणा
  मुंबईतीलच असलेल्या तुषारनं बलपणी कधीच डान्सर बनण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. बालपणी बास्केटबॅाल खेळणाऱ्या तुषारला मोठेपणी मर्चंट नेव्हीमध्ये जायचं होतं. त्यानं केवळ इंटरनॅशनल पातळीवरील बी बॅाईंग वगैरेंचे व्हिडीओज पाहिले होते. ते पाहिल्यावर डान्सबाबत कुतूहल जागं झालं आणि तुषारची पावलं डान्सच्या दिशेनं वळली. हळूहळू डान्सबाबत समजू लागल्यावर त्यानं क्लास सुरू केला. एचआर कॅालेजमधल्या टिममध्ये डान्स केला. त्यानंतर रिॲलिटी शोज आणि मुव्हीजमध्ये असिस्ट करायला सुरुवात केली. एकदा अचानक ‘सुपर डान्सर’मध्ये कोरिओग्राफी करण्यासाठी कॅाल आला आणि त्याचं जगच बदलून गेलं. थोरला भाऊ विकीकडून प्रेरणा घेत तुषार डान्सिंगकडे वळला. सोळा-सतराव्या वर्षी तुषारनं डान्स सुरू केला.