प्रथमेशचा ‘टकाटक २’ पूर्ण, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम यांची निर्मिती, तसंच जगत सिंग यांची सहनिर्मिती असलेल्या 'टकाटक २'च्या टीमनं गोव्यामध्ये मुहूर्तानंतर लगेचच तिथलं शूटिंग पूर्ण केलं.

    दोन वर्षांपूर्वा मराठी चित्रपटांच्या तिकिटबारीवर दुष्काळ असताना प्रदर्शित झालेल्या ‘टकाटक’ या चित्रपटानं यशस्वीपणे बिझनेस करत प्रेक्षकांचं मनोरंजनही केलं. पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर ‘टकाटक २’ या नावानं याच चित्रपटाचा पुढील भाग काढण्याची योजना आखण्यात आली. ‘टकाटक २’ला ही नशीबाची साथ लाभली आणि कोरोना व लॉकडाऊनच्या भयावह वातावरणातही या चित्रपटानं शूटिंग पूर्ण केलं आहे.

    पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम यांची निर्मिती, तसंच जगत सिंग यांची सहनिर्मिती असलेल्या ‘टकाटक २’च्या टीमनं गोव्यामध्ये मुहूर्तानंतर लगेचच तिथलं शूटिंग पूर्ण केलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गोव्यात शूटिंगवर बंदी घालण्यात आली होती. दुसऱ्या लॉकडाऊननंतर पुन्हा निर्बंध शिथिल होताच ‘टकाटक २’च्या टीमनं वेगवान हालचाली करत अल्पावधीत बारामती आणि भोर येथील अखेरचं शूटिंग शेडयुल निर्विघ्ननपणे पूर्ण केलं. कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करत ‘टकाटक २’चं चित्रीकरण पूर्ण केल्याची माहिती दिग्दर्शक मिलिंद कवडेनं दिली आहे.

    या चित्रपटात प्रथमेश परब, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आणि इतर कलाकारांच्या भूमिका आहेत.