लवकरच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेची होणार गिनीज बुकात नोंद!

२८ जुलै २००८ रोजी सुरू झालेली ही मालिका मागील १३ वर्षांपासून अविरतपणे रसिकांचं मनोरंजन करण्याचं व्रत जोपासत आहे.

    अबालवृद्धांचं मनोरंजन करणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही अद्वितीय मालिका विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर उभी आहे. या मालिकेची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॅार्डमध्ये करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सब टीव्हीवर प्रसारीत होणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सिरीयलनं लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे.

    २८ जुलै २००८ रोजी सुरू झालेली ही मालिका मागील १३ वर्षांपासून अविरतपणे रसिकांचं मनोरंजन करण्याचं व्रत जोपासत आहे. आज घडीला ही भारतातील दीर्घ काळ सुरू असलेली मालिका बनली आहे. दरम्यानच्या काळात विविध विक्रम करणाऱ्या टीव्ही विश्वातील माइलस्टोन ठरलेल्या या मालिकेनं नुकतेच ३००० भाग पूर्ण केले आहेत. याच बळावर या शोनं गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॅार्डच्या दिशेनं झेप घेतली आहे.

    या मालिकेशी निगडीत असलेल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यासाठी नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेची टीम प्रचंड उत्साहित आहे.