१०००० वर्षांपूर्वीच्या काळात नेणार डॅा. विक्रम

'द बर्थ १०००० बीसी' असं शीर्षक असलेल्या या चित्रपटाच्या निमित्तानं विक्रम यांनी 'नवराष्ट्र'शी एक्सक्लुझीव्ह संवाद साधला.

  चित्रपट आणि त्याबद्दलचं आकर्षण भल्याभल्यांना चंदेरी दुनियेत घेऊन येतं. आपापल्या क्षेत्रांत यशस्वी झाल्यानंतरही काही जण हौसेखातर इथं येतात आणि काहीतरी भव्य-दिव्य करत इथंच रमतात. कर्नाटकमधी डॅा. विक्रम आर. यांना चित्रपट बनवण्याचे वेध लागले आणि पदार्पणातच ते प्रेक्षकांना १०००० वर्षांपूर्वीची स्टोरी सांगण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘द बर्थ १०००० बीसी’ असं शीर्षक असलेल्या या चित्रपटाच्या निमित्तानं विक्रम यांनी ‘नवराष्ट्र’शी एक्सक्लुझीव्ह संवाद साधला.

  सिनेसृष्टीत आजवर बरेच ऐतिहासिक सिनेमे बनले आहेत, पण डॅा. विक्रम यांनी पदार्पणातच प्री हिस्टॅारीक मुव्ही बनवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटाबाबत सध्या फार चर्चा होत नसली किंवा अद्याप याबाबत फार कोणाला ठाऊक नसलं तरी जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा मात्र नक्कीच सर्वांचं लक्ष वेधून घेईल. डॅा. विक्रम हे कर्नाटकमधील चिकबल्लापूर या निमशहरी भागातील आहेत. एमबीबीएस झाल्यानंतर कर्नाटकमधील देवनाहल्ली येथील मानसा हॅास्पिटलमध्येच त्यांनी प्रॅक्टीस सुरू केली आहे. जनरल डॅाक्टर असलेल्या विक्रम यांना आयएएस बनण्याचे वेध लागले आणि त्यातून त्यांच्यातील दिग्दर्शकानं जन्म घेतला. ‘द बर्थ १०००० बीसी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यापूर्वी त्यांनी कोणत्याही दिग्दर्शकाला असिस्ट केलेलं नाही. कुटुंबातही कोणती फिल्मी पार्श्वभूमी नाही. विक्रमचे आई-वडील सरकारी नोकरीत होते. असं असूनही चित्रपट दिग्दर्शनाकडे वळण्याबाबत विक्रम म्हणाले की, माझा एक प्रोड्युसर मित्र आगामी चित्रपटासाठी स्टोरीच्या शोधात होता. त्यानं पूर्वी बनवलेल्या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्यानं यावेळी काहीतरी वेगळ्या विषयावर चित्रपट बनवण्याची त्याची इच्छा होती. अचानक एकदा त्याची आणि माझी भेट झाली. माझ्याकडे एक सुंदर स्टोरी होती. ती मी त्याला ऐकवली. त्याला ती खूप भावली आणि ‘द बर्थ १०००० बीसी’ या चित्रपटाची प्रोसेस सुरू झाली.

  दिग्दर्शनाचे धडे गिरवण्याबाबत विक्रम म्हणाले की, मी लहानपणापासून खूप चित्रपट पहायचो. जागतिक पातळीवरचे चित्रपट पहायला मला आवडतात. हे चित्रपट पाहता पाहता ते कसे बनवले जातात याबाबत कुतूहल निर्माण झालं आणि त्याचा अभ्यास करू लागलो. त्यातून चित्रपट बनवण्याची आवड निर्माण झाली. यासाठी मी कोणत्याही प्रकारची ट्रेनिंग घेतलं नाही. इंटरनेटच्या माध्यमातून चित्रपट दिग्दर्शनाची सर्व प्रक्रिया समजून घेतली. पटकथालेखन कसं केलं जातं याचा अभ्यास केला. यासाठी मला जवळपास तीन ते चार महिने लागले. या चित्रपटाची स्क्रीप्टही मीच लिहीली आहे. यासाठी १५ दिवसांचा वेळ लागला. कमी बजेटमध्ये एक चित्रपट बनवण्याचा आमचा विचार होता, पण स्टोरीलाईन आणि अॅक्टींगवाइज कुठेही तडजोड करायची नव्हती. खरं तर हा चित्रपट एकाच अॅक्टरला केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आला आहे.

  आयएएसनं दिला चित्रपटाचा प्लॅाट
  खरं तर आयएएसनं मला या चित्रपटाचा प्लॅाट दिला आहे. त्यावेळी मी आयएएसची तयारी करत होतो. चार वेळा प्रिलीम्स क्लीअर केल्या होत्या. त्यात अँत्रापॅालॅाजी नावाचा एक सब्जेक्ट आहे. यात इव्होल्युशन आॅफ मॅनचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. ते मला खूप जबरदस्त वाटलं. तो अनुभव खूप रोमांचक होता. त्यामुळं हा अनुभव फिल्मच्या माध्यमातून पडद्यावर सादर करण्याचा विचार मनात आला. यासाठी अँत्रापॅालॅाजीवर आधारीत बऱ्याच पुस्तकांचं वाचन केलं. इंटरनेटच्या माध्यमातूनही खूप रिसर्च केला. मानवच्या जन्माच्या कहाणीचा मेन प्लॅाट आहे. यासाठी इग्नोची (इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी)खूप मदत झाली. इथं कोणत्याही विषयावरील स्टडी मटेरीयल खूप जबरदस्त मिळतं. आयएएसची एक्झाम देऊ शकलो नाही. आयएएसची तयारी करण्यासाठी आणि कोचिंगसाठी मी दिल्लीला गेलो होतो. तिथे चार प्रिलीम्स दिले, पण नंतर माझी संधी हुकली. दिल्लीत मी सहा महिने राहिलो होतो.

  मुख्य भूमिकेत प्रताप राणा
  या चित्रपटाला कोणतीही भाषा असता कामा नये याचं प्लॅनिंग अगोदरच केलं होतं. चित्रपटाचं एक नवीन मॅाडेल इंडस्ट्रीसमोर सादर करायचं होतं. अशा प्रकारचाही चित्रपट बनू शकतो हे दाखवायचं होतं. बजेट जरी कमी असलं तरी क्वालिटीवाईज जे काही चित्रपटासाठी आवश्यक आहे ते प्रदीप यांनी उपलब्ध करून दिलं आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी आम्हाला कलाकारांची आॅडीशन्स घ्यावी लागली नाही. यात मुख्य भूमिका साकारणारे प्रताप राणा हे निर्मात्यांचे धाकटे बंधू आहेत. त्यांनी ‘बद्री वर्सेस मधुमती’ आणि ‘प्रीती माडू थप्पेनील्ला’ या दोन चित्रपटांमध्ये काम केलं असून, कन्नडमधील नामवंत अभिनेते आहेत. प्रताप पहिल्या दिवसापासून या चित्रपटाच्या मेकिंगच्या प्रक्रियेत सहभागी होते. त्यामुळं आम्हाला पुढील काम करणं सोपं गेलं. या चित्रपटात संवाद नसल्यानं स्क्रीनप्लेच तशा प्रकारे लिहिला आहे. चित्रपटात प्रताप कायम काही ना काही शोध लावतानाच दिसेल. एक काम झालं की दुसरं असा त्याचा उद्योग सुरूच असतो.

  स्पॅनिश-चायनीजसह आठ भाषांमध्ये
  या प्री हिस्टॅारीक मुव्हीमध्ये १०००० वर्षांपूर्वीचा काळ पहायला मिळेल. त्यामुळं त्या प्रकारचं वातावरण चित्रपटात दाखवणं गरजेचं होतं. त्या काळी मानव कसा रहायचा, त्यानं कसे शोध लावले त्याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. त्याचं कनेक्शन आजच्या काळाशी जोडण्यात आलं आहे. या सिरीजमध्ये सात ते आठ चित्रपट बनवण्याची तयारी मी केली आहे. आता दुसऱ्या भागावर लेखन सुरू केलं आहे. या चित्रपटात ९५ टक्के भाग १०००० वर्षांपूर्वीचा पहायला मिळेल. यासाठी जवळपास कर्नाटकमधीलच सर्व लोकेशन्सवर शूट केलं आहे. होन्नावर, अंदमानमध्ये शूट केलं आहे. ९० टक्के शूटिंग जंगलात झालं आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट हिंदी, स्पॅनिश, चायनीस, इंग्लिश, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम अशा आठ भाषांमध्ये रिलीज होणार आहे. ९० टक्के चित्रपटात डायलॅाग्ज नाहीत. सुरुवातीला हिंदीमध्ये चार डायलॅाग्ज आहेत. प्रताप राणांसोबत अनुषा आणि बालकलाकार कॅथरीन आहे.

  टेक्निशियन्सची प्री हिस्टॅारीक मुव्ही
  हा माझा पहिला चित्रपट असल्यानं टेक्निकली साऊंड असावा अशी माझी इच्छा होती. यासाठी नॅशनल अॅवॅार्ड विनर महावीर साबन्नावरकडे साऊंड रेकॅार्डीस्ट म्हणून निवड केली. कन्नडमध्ये चांगला सिनेमॅटोग्राफर कोण आहे याचा शोध घेतला. त्यानंतर आनंद सुंदरेशाकडे सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सोपवली. साऊथमध्ये प्रसिद्ध असलेल्या संगीतकार जुदा सँडी यांनी संगीत दिलं आहे. महेश थोगाटा यांनी सुरेख एडिटींग केलं आहे. हा चित्रपट सर्व टेक्निशियन्सवर अवलंबून आहे. प्रेक्षक या चित्रपटाशी स्वत:ला कनेक्ट करतील अशी मला आशा आहे. आम्ही आमच्या परीनं एक वेगळा आणि अनोखा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. आता प्रेक्षकांना तो कसा वाटतो ते पहायचं आहे. चित्रपटातील ९५ टक्के भागात केवळ पार्श्वसंगीत आणि वेगवेगळे आवाज ऐकायला मिळतील. केवळ हावभावांच्या माध्यमातून या चित्रपटाची स्टोरी आणि त्यातील विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.