‘सामंथा तू तुझ्या करिअरमधील खूप मोठी चूक केलीस’, ‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर पाहून सामंथावर नेटकरी संतापले!

सामंथा अक्किनेनीने राजीची भूमिका साकारली आहे. या थ्रिलर सीरिजच्‍या ९ भागांच्‍या नवीन सीझनमध्‍ये श्रीकांत मध्‍यमवर्गीय फॅमिली मॅन व जागतिक दर्जाचा गुप्‍तचर अशा दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे.

  अभिनेता मनोज वाजपेयीच्या ‘द फॅमिली मॅन २’चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि ट्रेलर पाहून चाहते अगदी भारावले. पण ट्रेलरसोबतच एक वादही समोर आला आहे. सोशल मीडियावर #FamilyMan2_against_Tamils हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला.

  काय आहे वादाचे कारण

  दक्षिण भारतातील लोक ‘द फॅमिली मॅन २’चा ट्रेलर पाहून संतापले आहेत. दक्षिण भारताच्या पार्श्वभूमीवर ‘द फॅमिली मॅन २’ ची कथा रचली गेली आहे. सीरिजमध्ये श्रीलंकेत आपल्या हिताची लढाई लढणा-या तामिळ बंडखोरांचा संबंध ‘आयएसआयएस’ या अतिरेकी संघटनेशी जोडला गेल्याचा दावा अनेक लोकांनी केला असून सोशल मीडियावर अनेकांनी याबद्दलचा संताप व्यक्त केला आहे. ‘द फॅमिली मॅन २’ तामिळविरोधी आहे, तामळींना अतिरेक्यांसारखे दाखवण्यात आले आहे, अशा आरोप अनेकांनी केला आहे. विशेष म्हणजे, या पार्श्वभूमीवर अनेकांनी साऊथची सुपरस्टार सामंथा अक्कीनेनीला तामिळ फिल्म इंडस्ट्रीतून हद्दपार करण्याचा इशाराही दिला आहे.

   

  यानंतर तुझा एकही सिनेमा तामिळनाडूत रिलीज होऊ देणार नाही, असे एका युजरने लिहिले आहे. सामंथा तू तुझ्या करिअरमधील खूप मोठी चूक केलीस, याचे परिणाम तुला भोगावे लागतील, असे अन्य एका युजरने लिहिले आहे.

   

  काय आहे ट्रेलरमध्ये

  २ मिनिटं ४९ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये फॅमिली मॅन ऊर्फ श्रीकांत तिवारीची कथा दाखवण्यात आली आहे. या सीझनमध्‍ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्‍पर्धी राजीचा सामना करणार आहे. सामंथा अक्किनेनीने राजीची भूमिका साकारली आहे. या थ्रिलर सीरिजच्‍या ९ भागांच्‍या नवीन सीझनमध्‍ये श्रीकांत मध्‍यमवर्गीय फॅमिली मॅन व जागतिक दर्जाचा गुप्‍तचर अशा दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे.

  ‘द फॅमेली मॅन २’ ही सीरिज १२ फेब्रुवारी २०२१ रोजी अॅमेझॉन प्राइमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होती. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता ही सीरिज ४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.