प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिक्री यांना हृदयविकाराचा झटका, मुंबईत घेतला अखेरचा श्वास!

दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले होते. त्यांना १९८९ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता.

    राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं आज हृदययाच्या झटक्याने मुंबईत निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या होत्या. २०१८ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर २०२० साली ब्रेन स्ट्रोकचा त्रासही त्यांना झाला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती गंभीर होती.

    १९७८ सालच्या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. त्यांना ‘तमस’ (१९८८), ‘मम्मो’ (१९९५) आणि ‘बधाई हो’ (२०१८) या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

    दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले होते. त्यांना १९८९ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. सुरेखा यांना त्यांच्या ‘बालिका वधू’ या मालिकेमधल्या भूमिकेने घराघरात पोहोचवलं होतं. तर ‘बधाई’ हो या चित्रपटातली त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली.