हर्षद मेहता वेबसिरिज बॅंक लोगो प्रकरणी सोनी पिक्चर्सला तीन आठवड्यांचा अंतरिम दिलासा!

कारवाईच्या भितीपोटी सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्राईव्हेट लिमिटेड कंपनीने उच्च न्यायालयात फौजदारी रीट याचिका दाखल केली आहे.

    सोनी लिव्ह अॅपवरील हर्षद मेहता वेबसिरीजविरोधात पुण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासाला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली तसेच कोणतीही कारवाई न करण्याचे पोलिसांना निर्देशही दिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सोनी पिक्चर्सला अंतरिम दिलासा मिळाला आहे.

    `स्कॅम १९९२- हर्षद मेहता स्टोरी’ या सोनी लिव्ह अँपवरील सोनी पिक्चर्सच्या वेब सिरीजमध्ये एका दृश्यात कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचा लोगो वापरल्याचा आऱोप करत बॅंकेने पुण्यातील सहकार नगर पोलीस स्थानकात भारतीय दंड संहिता, ट्रेडमार्क तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. कारवाईच्या भितीपोटी सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्राईव्हेट लिमिटेड कंपनीने उच्च न्यायालयात फौजदारी रीट याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. ए. जे जमादार यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. ट्रेडमार्क कायद्याच्या कलम ११५(४) अन्वये पोलिस उप-अधीक्षक (डीवायएसपी) पेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशीची तरतूद नाही. मात्र, सदर प्रकरणात  पोलीस निरीक्षक (पीआय) चौकशी करत आहेत. पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या नोटीसमधून स्पष्ट होत असल्याचा दावा सोनी पिक्चर्सच्यावतीने अॅड. शिरीष गुप्ते यांनी केला. तसेच आयपीसी कलम ५०० (अब्रुनुकसानी) अंतर्गत नोंदविण्यात आलेल्या गुन्हाचा दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पोलीस निरीक्षकामार्फत तपास केला जाऊ शकत नसल्याचेही गुप्ते यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

    त्याबाबत खंडपीठाने राज्य सरकारकडे विचारणा केली असता, याचिकाकर्त्यांनी केलेल्या युक्तिवादावर तसेच दाव्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सूचना घेण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील जे.पी. याग्निक यांनी खंडपीठाला दिली. तसेच बँकेच्यावतीने प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्यासाठी अॅड. शेखर जगताप यांनी खंडपीठाकडे वेळ मागितला. त्याची दखल घेत खंडपीठाने पोलिसांना योग्य पावले उचलण्यास सांगत यापुढे सदर प्रकऱणात चौकशी सुरू ठेवता येणार नाही, असेही स्पष्ट केले आणि तीन आठवड्यांसाठी पोलिसांच्या कारवाईला स्थगिती देत सुनावणी १७ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.