आध्यात्मिक मनोरंजन देणारा चित्रपट ‘पायवाटेची सावली’!

‘शोधून थकून गेला मुसाफिर, मग पायवाटेवर भेटली सावली’ या कवितेच्या ओळीत ‘पायवाटेची सावली’ या चित्रपटाचे सार आहे.

    सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मनाची मशागत करणे गरजेचे वाटू लागलेय. खरंतर मानसिक आरोग्य जपण्याबाबत अगोदरपासूनच बोलले जात होते परंतु कोरोना कालखंडात याचे महत्व  पटले आहे. असं म्हटलं जातं की, सगळी सोंगे आणता येतात परंतु पैश्याचे सोंग आणता येत नाही. सध्यस्थितीत  जागतिक आर्थिक मंदी आल्यामुळे सामान्यांचे हाल होताहेत, नोकऱ्या गेल्यामुळे पैश्यांची चणचण भासतेय, धंदे घायकुतीला आलेत त्यामुळे सामाजिक आर्थिक चक्र कोलमडले आहे. या सर्वांचा थेट परिणाम मनावर होतोय आणि बऱ्याच जणांना मानसिक आजाराने जखडले आहे. अनेकजण आर्थिक कोंडीतून बाहेर निघण्याचे मार्ग शोधताहेत परंतु त्यामुळे मानसिक खच्चीकरणंच होताना दिसतेय. यामुळेच परमेश्वरावरचा विश्वास वृद्धिंगत होताना दिसतोय कारण ‘पुढे कधी काय घडेल ते फक्त परमेश्वरालाच ठाऊक असते आणि नियती आपली गुपिते गुपितच ठेवत असते’. 

    हाच धागा पकडत प्रसिद्ध लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक मुन्नवर भगत यांनी आगामी सिनेमा ‘पायवाटेची सावली’ बनविला असून तो द्वैभाषिक आहे. मराठी आणि हिंदीमध्ये (स्वामी सहर कब होगी) भाषेत हा चित्रपट असून ५०% मराठीमध्ये आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण संपले असून पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सुरुसुद्धा झाले आहे. त्रिशा स्टुडिओ मध्ये चित्रपटावर बाह्यनिर्मितीचे संस्कार होत असून येत्या दिवाळी ला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

    ‘शोधून थकून गेला मुसाफिर, मग पायवाटेवर भेटली सावली’ या कवितेच्या ओळीत ‘पायवाटेची सावली’ या चित्रपटाचे सार आहे. चित्रपटातील नायक हा परोपकारी आणि सद्गुणी असून वाईट गोष्टींच्या सावलीतही तो उभा राहत नाही. तत्ववादी लोकांचे, बऱ्याचदा, घडते त्याप्रमाणे त्याची नोकरी जाते. कमाईचे बाकी काहीही स्रोत नसल्यामुळे तो हळूहळू नैराश्याच्या गर्तेत जातो. त्यातच त्याची पत्नी त्याच्याकडे सतत पैशांचा तगादा लावत असते. तिच्या साध्यासुध्या इच्छाही आपण पूर्ण करू शकत नाही या भावनेमुळे त्याच्यात आपण सर्व काही हरवून बसलो आहोत ही भावना प्रखर होत जाते आणि त्याच्या मनात आत्महत्येचे विचार घोंघावू लागतात. आणि त्यावेळी परमेश्वर त्याच्या जीवनात प्रवेश करतो आणि मग पुढे त्याच्या जीवनात प्राक्तनामुळे जे जे बदल घडतात त्याची मीमांसा चित्रपटातून केली गेली आहे.

    ‘निवडुंग’, ‘गाव पुढे आहे’ सारखे आशयघन चित्रपट बनविणारे निर्माते दिग्दर्शक मुन्नवर भगत यांनी ‘पायवाटेची सावली’ चे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचे लेखन, संवाद, पटकथा आदी त्यांचेच असून चित्रपटाची निर्मितीही त्यांनीच केली आहे. या चित्रपटातून रेवती अय्यर हा नवा चेहरा चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. डीओपी आहेत अरविंदसिंह पुवार तर संगीत दिलंय अमित बिस्वास यांनी. संकलनाची जबाबदारी सांभाळताहेत सुबोध नारकर. थोडक्यात ‘पायवाटेची सावली’ हा चित्रपट आध्यात्मिक मनोरंजन देणारा असून मनोरंजनासोबत प्रबोधनही करतो.