लहान मुलांवरील ‘वेल डन बॉईज’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

आशिष निनगुरकर व अशोक मानकर लिखित गाण्यांना श्रीरंग आरस व एस. पी. सेन यांनी संगीत दिलं असून, पल्लवी केळकर, श्यामल सावके, गीता व जे. पी. दत्ता यांनी ही गाणी गायली आहेत.

    संकलक-दिग्दर्शक प्रकाश जाधव पुन्हा एकदा लहान मुलांवर आधारीत चित्रपट घेऊन येत आहेत. ‘रमाबाई आंबेडकर’, ‘आम्ही चमकते तारे’ व ‘श्यामची शाळा’ या चित्रपटांनंतर साईनाथ चित्रची निर्मिती असलेला ‘वेलडन बॉईज’ या चित्रपटाचं चित्रीकरण व तांत्रिक गोष्टी पूर्ण झाल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे. लहान मुलं देशाची भविष्य असतात; परंतु आज आपण या मुलांचं आचरण, संस्कार, भाषाशैली आणि वागण्या-बोलण्याची पद्धत पाहिली तर असं वाटतं, की देशाचं भविष्य अंधकारमय तर नाही ना? प्रत्येक शाळेत जसे हुशार विद्यार्थी असतात तसेच खोडकर, उनाड व मस्तीखोर विद्यार्थीही असतात, पण या मुलांमध्येही कुठेतरी चांगले गुण दडलेले असतात.

    या मस्तीखोर मुलांचं अंधकारमय भविष्य शिक्षकांमार्फत कसं प्रकाशमय करता येईल असा एक प्रयत्न या चित्रपटातून केलेला आहे. या चित्रपटात मोहन जोशी, विजय पाटकर, शिल्पा प्रभूलकर, प्रिय रंजन, विनोद जॉली, महेंद्र पाटील व आशिष निनगुरकर यांच्याबरोबर बऱ्याच बालकलाकारांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाचं लेखन अशोक बाफना व किशोर ठाकूर यांचं असून, अशोक मानकर व महेंद्र पाटील यांनी संवाद लिहिले आहेत. आशिष निनगुरकर व अशोक मानकर लिखित गाण्यांना श्रीरंग आरस व एस. पी. सेन यांनी संगीत दिलं असून, पल्लवी केळकर, श्यामल सावके, गीता व जे. पी. दत्ता यांनी ही गाणी गायली आहेत.