urvashi rautela says bollywood outsiders treated like things for trp
बॉलिवूडमध्ये बाहेरच्या कलाकारांना वस्तुप्रमाणे वापरलं जातं, 'या' अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

सोशल मीडिया, घराणेशाही याबद्दल उर्वशी रौतेलाने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आपलं मत व्यक्त केलं. गेले काही महिने खूप तणावपूर्ण होते. सोशल मीडियावर ज्या प्रकारे नकारात्मकता पसरवली जाते, त्यामुळे अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो.

गेला काही काळ नेपोटिझमवरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. बॉलिवूडमध्ये बाहेरच्या कलाकारांना एखाद्या वस्तुप्रमाणे वापरलं जातं, अशा शब्दात एका अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.

ही अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला आहे. सोशल मीडिया, घराणेशाही याबद्दल तिने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आपलं मत व्यक्त केलं. गेले काही महिने खूप तणावपूर्ण होते. सोशल मीडियावर ज्या प्रकारे नकारात्मकता पसरवली जाते, त्यामुळे अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. असा ताण मीही सहन केला आहे, असं ती यावेळी म्हणाली.

बॉलिवूडमधील घराणेशाहीवर बोलतानाही तिने आपलं मत स्पष्टपणे मांडलं. ती म्हणाली की, बॉलिवूडमध्ये एखादा स्टार किड असेल तर त्याला खूपच महत्त्व दिलं जातं. बऱ्याचदा माध्यमंच हे काम करतात. बॉलिवूडच्या बाहेरून आलेल्या कलाकाराने कितीही चांगलं काम केलं तरी त्याच्याकडे विशेष लक्ष न देता ते फक्त स्टार किड्सचंच कौतुक करत राहतात. पण, हीच गोष्ट जर गॉसिपची असेल, तर मात्र परिस्थिती वेगळी असते. एखादं गॉसिप पसरवायचं असेल तर बॉलिवूडच्या बाहेरून आलेल्या लोकांवर लक्ष केंद्रित केलं जातं. त्यांच्याकडून झालेली एखादी चूकही मोठी करून दाखवली जाते आणि टीआरपी मिळवला जातो. त्यांच्याबद्दल कंड्या पिकवून त्या खपवल्या जातात. हेच स्टार किडच्या बाबतीत मात्र लपवलं जातं, असं उर्वशीचं म्हणणं आहे.

बऱ्याचदा चांगलं काम करूनही माध्यमांना त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. पण, गॉसिप दाखवून टीआरपी मिळवायचा असेल तर मात्र बॉलिवूडमध्ये गॉडफादर नसलेल्यांचा वस्तूसारखा वापर केला जातो, असा आरोप उर्वशीने केला आहे. अशा गोष्टींचा एखाद्या सेलिब्रिटीला मानसिक त्रास होऊ शकतो, हेही तिने पुढे नमूद केलं आहे.