veteran actor ravi patwardhan passes away

अगबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली. अगंबाई सासुबाई या मालिकेतली त्यांची भूमिका ही लक्षणीय ठरली आहे. आपल्या नातू जर चुकत असेल तर त्याचे कान कसे टोचायचे हे या आजोबांना पक्कं ठाउक होतं. म्हणूनच ते मालिकेतल्या सोहमला सतत उपदेशाचे डोस देत असत. त्यांचं 'सोम्या, कोंबडीच्या' हे पेटंट वाक्य प्रेक्षकांच्या मनात कायमच रुंजी घालत राहील यात शंकाच नाही.

ठाणे : मराठी रंगभूमीचे, चित्रपट सृष्टीचे जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन (Ravi Patwardhan) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

रवी पटवर्धन यांनी मराठी नाटके आणि मराठी चित्रपटांसह मालिकांमध्येही काम केले होते. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

अगबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली. अगबाई सासुबाई या मालिकेतली त्यांची भूमिका ही लक्षणीय ठरली आहे. आपल्या नातू जर चुकत असेल तर त्याचे कान कसे टोचायचे हे या आजोबांना पक्कं ठाउक होतं. म्हणूनच ते मालिकेतल्या सोहमला सतत उपदेशाचे डोस देत असत. त्यांचं ‘सोम्या, कोंबडीच्या’ हे पेटंट वाक्य प्रेक्षकांच्या मनात कायमच रुंजी घालत राहील यात शंकाच नाही.

रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्‍‌र्ह बॅंकेत नोकरी करत होते. वयाच्या ऐंशीव्या वर्षी भगवद्गीतेचे ७०० श्लोक पाठ करून ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले होते. बालगंधर्व हे १९४४ साली झालेल्या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. त्या नाट्यमहोत्सवातल्या बालनाट्यात अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयाच्या रवी पटवर्धनांनी भूमिका केली होती.

आज होणार अंत्यसंस्कार

काल रात्री पटवर्धनांना श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मार्चमध्येही त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना, मुलगी, जावई, चार नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.