‘लगान’चा रिमेक? हा अभिनेता दिसू शकतो भुवनच्या भूमिकेत, आमिर खानने सुचवलं नाव!

 ‘लगान’ चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आमिर खानने एक व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून माध्यमांशी संवाद साधला.

    लगान चित्रपटाला नुकतीच २० वर्ष पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट सगळ्यांसाठीच खूप स्पेशल ठरला आहे. आज लगानमधील क्रिकेटची मॅच प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय अशीच आहे. ‘लगान’ चित्रपटाच्या शेवटी जो संदेश दिलाय तो आजच्या परिस्थितीला लागू होतोय. लगान चित्रपटाचा रिमेक आला तर त्यात भुवनची भूमिका कोण साकारेल याचं उत्तर अमिर खाननेच दिलं आहे.

     ‘लगान’ चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आमिर खानने एक व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘लगान’ चित्रपटाच्या रिमेकसाठी कोणाची निवड होऊ शकते ?, असा सवाल केल्यानंतर आमिरने ताबडतोब उत्तर दिलंय. यावेळी तो म्हणाला, “आजच्या घडीला खूप उत्तम कलाकार आहेत…रणवीर सिंह आहे…रणबीर कपूर आहे…विक्की कौशल आहे…हे सगळे उत्तम कलाकार आहेत…कदाचित ते माझ्यापेक्षाही उत्तम पद्धतीने ‘भुवन’ची भूमिका साकारतील.”

    “जर कुणाला ‘लगान’चा रिमेक करायचा असेल तर मी आणि आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे अधिकार सुद्धा देऊ…आम्ही सगळ्यांनी ‘लगान’ बनवताना जो त्रास काढलाय, तो त्रास त्यांनाही काढू द्या. बनवा ‘लगान’चा रिमेक…आम्हाला सुद्धा पहायचंय…आजच्या पिढीतील तरूण अभिनेते कसं काम करतील ?, हे पहायला मला आवडेल”, असं देखील आमिर यावेळी म्हणाला.