निगेटीव्ह पब्लिसीटी प्रेक्षकांनी केली पॅाझिटीव्ह : पल्लवी जोशी

आज ऑफिसमध्ये गेले, तेव्हा राष्ट्रीय पुरस्कारांची प्रेस काॅन्फरन्स सुरू होती. टीव्हीवर मी सारं पहात होते. सर्वोत्कृष्ट स्क्रीन प्ले साठी विवेकचं नाव घोषित होताच. आम्ही एकच जल्लोष केला. त्याने सुरुवातीपासून या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले. मागच्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कारासाठी डॅाकेट पाठवण्याचं काम मीच केलं होतं. मी आपल्या कामात मश्गुल हाते. इतकी की स्वत:लाच विसरून गेले होते.

  ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘ताश्कंत फाईल्स’ या चित्रपटाने दोन राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. आलिशा अली शाह या व्यक्तिरेखेसाठी पल्लवी जोशी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, तर विवेक रंजन अग्निहोत्री यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक (संवाद)पुरस्कार घोषित झाले आहेत. ‘ताश्कंत फाईल्स’च्या टीमच्या या सर्वोच्च आनंदाच्या क्षणी पल्लवी यांनी ‘नवराष्ट्र’शी एक्सक्लुझीव्ह संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.

  मागच्या वर्षी कोरोनामुळं राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा होऊ शकली नाही. त्यामुळं गेल्या वर्षापासूनच मी राष्ट्रीय पुरस्कारांची आतुरतेने वाट पहात होते, पण यंदा मला एखादा पुरस्कार मिळेल असं ध्यानीमनीही नव्हतं. आज ऑफिसमध्ये गेले, तेव्हा राष्ट्रीय पुरस्कारांची प्रेस काॅन्फरन्स सुरू होती. टीव्हीवर मी सारं पहात होते. सर्वोत्कृष्ट स्क्रीन प्ले साठी विवेकचं नाव घोषित होताच. आम्ही एकच जल्लोष केला. त्याने सुरुवातीपासून या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले. मागच्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कारासाठी डॅाकेट पाठवण्याचं काम मीच केलं होतं. मी आपल्या कामात मश्गुल हाते. इतकी की स्वत:लाच विसरून गेले होते.

  इतक्यात माझं नाव आलं…
  विवेकला पुरस्कार घोषित झाल्याचा आनंद आम्ही सेलिब्रेट करत असतानाच अचानक माझं नाव अनाऊंस झालं. मी त्यावेळी अक्षरश: ब्लँक झाले होते. काय झालं ते समजेनासंच झालं. आपल्याला पुरस्कार मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. अखेर मनापासून केलेल्या कामाचं कौतुक झालं ही खूप मोठी गोष्ट आहे. आनंदाला पारावार उरला नाही. नॅशनल पुरस्काराचं एक वेगळंच अप्रूप असतं. प्रत्येक कलाकार या पुरस्काराची आतुरतेनं वाट पहात असतो. मी खूप आनंदी आहे. जबाबदारी वाढली आहे. भविष्यात आणखी चांगलं काम करण्यासाठी हुरूप आला आहे.

  निगेटीव्ह पब्लिसिटी करण्याचा घाट
  २०१९ मध्ये जेव्हा ‘ताश्कंत फाईल्स’ हा चित्रपट रिलीज झाला, तेव्हा काही लोकांनी याची निगेटीव्ह पब्लिसिटी करण्याचा प्रयत्न केला होता. का कुणास ठाऊक वाईट प्रतिक्रिया देऊन वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला होता, पण आपले प्रेक्षक हुषार आहेत, चाणाक्ष, चतूर आहेत. त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. त्यांनी सिनेमाचा विषय ओळखला. विषय त्यांच्या मनाला भिडला आणि त्यांनीच मग हा चित्रपट यशस्वी करण्याचा वीडा उचलला. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात. कोणतीही फिल्म पाहिल्यावर त्या पाठीमागची मेहनत लक्षात घ्यायला हवी.

  क्रेडीट गोज टू ऑडियन्स
  अर्थातच क्रेडीट विवेकचं आणि प्रेक्षकांचं आहे. जेव्हा एखाद्या चित्रपटाची जाणूनबुजून खिल्ली उडवायचा प्रयत्न केला जातो, तेव्हा प्रेक्षकच न्याय करतात. प्रेक्षकांनी चित्रपट पाहिला आणि त्यांनीच ‘ताश्कंत फाईल्स’बाबत जबाबदारीनं आणि मुद्देसूद लिहिलं. त्यामुळे सिनेमा न पाहिलेल्यांनी गर्दी केली. आमचा चित्रपट माऊथ टू माऊथ पब्लिसिटीच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचला. निगेटीव्ह गोष्टींपेक्षा पॅाझिटीव्ह गोष्टी लेखांमार्फत फिरत होत्या. त्यामुळे शो हाऊसफुल होऊ लागले आणि बघता बघता १०० दिवस कधी पूर्ण झाले ते समजलंही नाही. सुजाण प्रेक्षकांमुळे यश मिळालं. प्रेक्षकांनी ही फिल्म उचलून धरली नसती, तर हीसुद्धा इतर चांगल्या फिल्मप्रमाणे आली आणि गेली असती. प्रेक्षकांना केवळ मसालापट नकोत, स्टोरी सेंटर्ड चित्रपटही आवडतात हे यावरून सिद्ध झालं आहे. ते कंटेंट बेस्ड फिल्मवरही तितकंच प्रेम करतात याची खात्री पटली.