विकास गुप्ता प्रत्युषा बॅनर्जीबरोबर होता रिलेशनशीपमध्ये, मृत्यूच्या ५ वर्षांनंतर केले धक्कादायक खुलासे!

काही लोकांनी माझ्याबद्दल तिला वाईट वाईट गोष्टी सांगितल्या होत्या आणि म्हणून प्रत्युषा व माझे ब्रेकअप झाले होते.

    अभिनेता विकास गुप्ता काही महिन्यांपूर्वी ‘बिग बॉस 14’च्या घरात गेला आणि सेक्शुअ‍ॅलिटी, त्याचा आईसोबतचा वाद, त्याच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी अशा अनेक गोष्टींचा खुलासा झाला. आता विकास गुप्ताने पुन्हा एकदा पर्सनल लाईफबद्दलचा धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी तो म्हणाला, होय  मी दिवंगत अभिनेत्री प्रत्युषाला डेट करत होतो, असा खुलासा त्याने केला आहे.

    एका मुलाखतीत विकास गुप्ताने अनेक खुलासे केलेत. तू कधी कुण्या मुलीला डेट केले आहे का? मित्र दूर जात होते म्हणून तू तुझ्या सेक्शुअ‍ॅलिटीचा खुलासा केलास का? असे प्रश्न विकासला या मुलाखतीत विचारण्यात आले. यावर मी प्रत्युषा व अन्य एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, असे त्याने सांगितले. तो म्हणाला, मी दोन मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो. यापैकी एक प्रत्युषा बॅनर्जी होती. मी बायसेक्शुअल आहे.  हे प्रत्युषाला माहित नव्हते. आमचे ब्रेकअप झाले, त्यानंतर तिला याबद्दल कळले होते. आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो, पण हे रिलेशन फार कमी वेळासाठी होते. काही लोकांनी माझ्याबद्दल तिला वाईट वाईट गोष्टी सांगितल्या होत्या आणि म्हणून प्रत्युषा व माझे ब्रेकअप झाले होते.

    प्रत्युषा बॅनर्जीचे १ एप्रिल २०१६ रोजी निधन झाले होते. तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हा ती राहुल राज सिंह याला डेट करत होती. प्रत्युषाच्या मृत्यूसाठी तिच्या या बॉयफ्रेन्डला जबाबदार ठरवण्यात आले होते. प्रत्युषाच्या पालकांनी राहुल राज सिंहवर मुलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत, गुन्हा दाखल केला होता.