लहान शहरातील मुलीच्या आयुष्याभोवती फिरणारी ‘विकल्प’!

'विकल्प' हा लघुपट कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील छळाचं उत्तम सादरीकरण असल्याचं नेहाचं म्हणणं आहे.

    रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सनं ‘विकल्प’ हा लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. याचं दिग्दर्शन धीरज जिंदाल यांनी केलं असून, नेहा शर्मा आणि अंशुल चौहान हे प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. ही कथा शिवानी नावाच्या एका लहान शहरातील मुलीच्या आयुष्याभोवती फिरते. ती आपल्या आईवडिलांसोबत खूप वाद घालून आपलं भविष्य महानगरात शोधण्याचा निर्णय घेते. मात्र, कामाच्या ठिकाणी आलेल्या एका अनपेक्षित आणि धक्कादायक घटनेमुळं तिच्या आयुष्यात बरीच उलथापालथ होते.

    तिला स्वतःसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे. तिला बदला घ्यायचा आहे, आपल्या भांडणाऱ्या कुटुंबाकडं परत जायचं आहे किंवा संपूर्ण घटनेकडं दुर्लक्ष करून तिनं स्वतःसाठी कठोर परिश्रमातून उभं केलेलं आयुष्य जगायचं आहे, याबाबत तिला निर्णय घ्यावा लागेल. यात नेहानं शिवानी नावाचं कॅरेक्टर साकारलं आहे. तिच्या महत्त्वाकांक्षा आणि आकांक्षा तिनं सादर केल्या आहेत.

    अंशुलनं उभा केलेला शिवानीचा मित्र तिच्या भूतकाळातील घटनांबाबत बोलतो आणि तिला योग्य तो निर्णय घेण्यास सांगतो, त्यामुळे तिचा संघर्ष आणखी वाढतो. ‘विकल्प’ हा लघुपट कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील छळाचं उत्तम सादरीकरण असल्याचं नेहाचं म्हणणं आहे.