जहांगीर कला दालनात जलरंगातील ‘ट्रॅव्हलिंक्स’ डॉ. गोरख अग्रवाल यांच्या चित्रकलाकृतींचे २३ फेब्रुवारीपासून प्रदर्शन

आवड म्हणून साकारलेल्या जलरंगातील कलाकृती रसिकांना खुणावणाऱ्या असून, त्या 'ट्रॅव्हलिंक्स' या शीर्षकांतर्गत जहांगीर कला दालनात प्रदर्शित होत आहेत.

  मुंबई : पेशाने वैद्यकीय सेवेत असणारे डॉ. गोरख अग्रवाल यांच्या ‘ट्रॅव्हलिंक्स’ या जलरंगातील चित्रांचे प्रदर्शन २३ फेब्रुवारीपासून जहांगीर कला दालनात सुरू होणार आहे. १ मार्चपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले आहे.

  आपले व्यावसायिक करिअर यशस्वीरित्या सांभाळून कलेची आवड जोपासणे आणि त्यातही यशस्वी होणे, हे फार कमी लोकांना जमते. डॉ. गोरख अगरवाल यांना हे तंत्र चांगले जमले आहे. त्यांनी आवड म्हणून साकारलेल्या जलरंगातील कलाकृती रसिकांना खुणावणाऱ्या असून, त्या ‘ट्रॅव्हलिंक्स’ या शीर्षकांतर्गत जहांगीर कला दालनात प्रदर्शित होत आहेत. २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२१ दरम्यान जहांगीर कला दालनात सकाळी ११ ते ७ वा. दरम्यान त्यांच्या एकल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

  डॉ. अग्रवाल हे पेशाने बालरोगतज्ज्ञ आहेत. आपले हे कर्तव्य उत्तमरीत्या निभावतानाच कलेची आवड त्यांना शांत बसू देत नव्हती. यातूनच त्यांनी चित्रे काढण्यास सुरुवात केली. कोरोना लॉकडाऊनच्या काळात जेंव्हा आपण घरात बसून परिस्थिती कधी बदलेल याचा विचार करत होतो, तेव्हा डॉ. अग्रवाल यांनी परिस्थितीवर कोणतीही चिडचिड न करता, ती स्वीकारून आपल्याला त्यातून काय करता येईल याचा विचार केला आणि यातून आपली चित्रकलेची आवड जोपासली.

  अगदी लहानपणापासून त्यांना चित्रांची आवड होती. आपल्या वडिलांसोबत राजावाडी रुग्णालयाच्या लहान मुलांच्या वॉर्डमध्ये जाताना त्यांच्या डोक्यात चित्रांचा विचार असायचा. ६ वारली चित्रांच्या साहाय्याने त्यांनी सोमैय्या कॉलेजचा कॅम्पस रेखाटला. सायन्स बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर ही चित्रे लावली आहेत. तर गौतम बुद्धांचे एक पेंटिंग दलाई लामा यांना भेट देण्याचा सन्मान त्यांना मिळाला.

  नुकतीच त्यांनी ज्या ठिकाणांना भेट दिली त्याची पेंटिंग्ज ट्रॅव्हलिंक्स या प्रदर्शनात आपल्याला दिसतील. या प्रवासात त्यांनी अनेक फोटो काढले. एक रेफरन्स म्हणून जरी त्यांनी हे फोटो वापरले असले तरी ही चित्रे काढताना त्यांनी आपल्या आठवणींमधून तिथे फेरफटका मारला आणि मग चित्र कॅनव्हासवर उतरलं. त्यामुळे ही चित्रे फोटोपेक्षा निश्चितच वेगळी दिसतात. चित्रातील रंग, प्रकाशाचा वापर हे जेवढे महत्त्वाचे तेवढेच त्या विषयाशी जोडलेल्या त्यांच्या भावनाही महत्त्वाच्या असतात. याचा प्रत्यय डॉ. अग्रवाल यांची चित्रे पाहताना येतो.

  डॉक्टरकीसारख्या महत्त्वाच्या प्रोफेशनमध्ये असताना, तुम्ही चित्रांसाठी वेळ कधी काढता, असा प्रश्न अनेकजण त्यांना विचारतात. ते सांगतात, सगळ्यात पहिला मुद्दा असतो तो स्वतःला वेळ देण्याचा. आम्ही आमच्या क्षेत्रात एवढे व्यस्त असतो की त्यापेक्षा कोणताही वेगळा छंद, आवड असेल तर ती नक्कीच जोपासायला हवी. आणि एखाद्या गोष्टीची आवड असेल तर त्यासाठी सवड निश्चितच मिळते.

  • चित्रकार: डॉ. गोरख अग्रवाल
  • प्रदर्शनाचे शिर्षक : ‘ट्रॅव्हलिंक्स’
  • कालावधी: २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२१
  • स्थळ: जहांगीर कलादालन, काळा घोडा, मुंबई
  • वेळ: सकाळी ११ ते ७ वाजेपर्यंत