राजकीय तमाशा हवा, थिएटरमधील नाटक नको? उद्विग्न रंगकर्मींचा संतप्त सवाल!

एकाच दिवशी, एकाच वेळी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील रंगकर्मींनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले तरीही सरकारचे डोळे उघडले नसल्याचे परखड मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर यांनी 'नवराष्ट्र'शी बोलताना व्यक्त केले.

  मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा कारावास भोगत असलेल्या अस्वस्थ रंगकर्मींनी ९ आॅगस्ट रोजी आंदोलनाचे हत्यार उपसत राज्य सरकारला धारेवर धरले होते. दुसऱ्या दिवशी चर्चा केल्यानंतर लवकरच थिएटर उघडण्यावर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. सरकारला रंगकर्मी, त्यांच्या भावना आणि उध्वस्त झालेल्या संसारांची पर्वा नसेल, तर लवकरच यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रंगकर्मींनी दिला आहे. सरकारला राजकीय तमाशा हवा, पण थिएटरमधील नाटक नको आहे का? असा संतप्त सवाल उद्विग्न रंगकर्मींकडून विचारण्यात येत आहे.

  एकाच दिवशी, एकाच वेळी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील रंगकर्मींनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले तरीही सरकारचे डोळे उघडले नसल्याचे परखड मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केले. आंदोलन केल्यानंतर अमित देशमुख, विजय वडेट्टीवार यांनी रंगकर्मींची भेट घेतली होती. त्यांनी सप्टेंबरमध्ये सिनेमागृहांसोबत नाट्यगृहेही उघडण्याचे आश्वासन दिले होते, पण अद्याप काहीच हालचाल नाही. सांस्कृतिक घडामोडींकडे कोणाचं लक्ष नसल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे. त्यामुळे लवकरच पुन्हा मागच्या वेळेपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार आहे. थिएटर उघडल्यानंतर लगेच कोणत्याही नाटकाचे प्रयोग करता येणार नाहीत. त्यासाठी तालिम सुरू करावी लागेल, दीड वर्षांमध्ये मोडतोड झालेल्या सेटसची डागडुजी करावी लागेल, थिएटर्स स्वच्छ आणि सॅनिटाईज करावी लागतील, तिथल्या यंत्रणा तपासाव्या लागतील. या सर्व प्रोसेससाठी कमीत कमी महिन्याभराचा कालावधी लागेल. त्यानंतर नाटकाचा शो करणे शक्य होईल. त्यामुळे घोषणा झाल्याबरोबर लगेच नाटक होणार नाही. रंगकर्मींच्या या मुद्द्यावर बोलण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

  … तर रंगकर्मींनी बहिष्कार टाकतील
  सांस्कृतिक संचालनालय रंगकर्मींच्या प्रश्नांकडे आणि त्यांच्या समस्यांकडे ढुंकूनही पहात नाही. त्यामुळे रंगकर्मींनी भविष्यात सांस्कृतिक संचालनालयाच्या कोणत्याही कार्यक्रमांना जाता कामा नये, त्यांच्या कार्यक्रमांवर सर्व रंगकर्मींनी बहिष्कार टाकायला हवा असेही पाटकर म्हणाले. थिएटर सुरू करू शकत नाही, पण उद्याने, चौपाट्या खुल्या आहेत. मग उघड्या जागेतील शो सुरू करण्याची तरी परवानगी आम्हाला द्या. जेणेकरून रंगकर्मींना काही अंशी दिलासा मिळेल. ४० कोटींचा टर्नओव्हर असलेली झाडीपट्टी नाट्यसृष्टी मागील दोन वर्षांपासून बंद आहे. तिथल्या कलाकारांवर अक्षरश: भीक मागण्याची वेळ आली आहे. मुंबईतील कित्येक कलाकार झाडीपट्टी रंगभूमीवर जाऊन अमाप पैसे कमवून आले आहेत, पण तिथल्या कलाकारांना आज कोणी वाली नाही.

  लोककलावंतांना चार पैसे मिळतील
  गौरी-गणपतीच्या सणात कोकणामध्ये लोककलांना खूप वाव असतो. भजन, डबलबारी भजन, दशावतार, नाच, फुगड्या हे कार्यक्रम होऊ शकतील. त्यातून लोककलांवंतांना चार पैसे मिळतील. फक्त थिएटर्स उघडायची नाहीत आणि बाकी सर्व खुले करायचे हा लोककलावंतांसोबतच सर्व रंगकर्मींवर अन्याय आहे. सरकार आणखी किती आत्महत्या होण्याची वाट पाहणार आहे. मागील दीड वर्षांपासून जे रंगकर्मी एखाद्या आश्रिताप्रमाणे जीवन जगले त्यांना आता स्वाभिमानाने रोजी रोटी कमावू द्या.

  आम्ही ते स्मशानी ज्यांना प्रेतही न वाली…
  दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या रस्त्यावर झालेला राजकीय तमाशा संपूर्ण महाराष्ट्राने, नव्हे तर जगाने पाहिला आहे. त्यावेळी कोरोना नव्हता का? सर्वात आधी थिएटर्स बंद करायची आणि उशिरा उघडायाची हे धोरण चुकीचे आहे. थिएटरच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेऊ शकतो. प्रेक्षकांचे तापमान चेक करू शकतो, सॅनिटायझेशन करू शकतो, मास्क तपासू शकतो, फिझिकल डिस्टन्स ठेवू शकतो. आजवर राजकारण्यांनी केवळ कलाकारांचा वापर करून घेतला, पण आता आमच्या समस्या सोडवण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही हे प्रत्येक रंगकर्मीचे दु:ख आहे. आम्हीच आमची प्रेते उचलत आहोत.

  टास्क फोर्ससोबत मिटींग ठेवा
  समाजात कोणत्या गोष्टी खुल्या करायच्या हा निर्णय जर टास्क फोर्स घेत असेल, तर त्यांच्यासोबत आमची एक मिटींग ठेवा. टास्क फोर्ससमोर आम्ही आमचे म्हणणे मांडू. थिएटर्स न उघडण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत ते आम्हाला समजेल आणि त्यांच्यापर्यंत आमचे प्रश्न पोहोचतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ७-८ लाख रंगकर्मी आहेत. त्यांना काय सांगायचे आणि कसे समजवायचे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्षचे आपल्या केबिनमधून बाहेर पडत नाहीत. त्यांना रंगकर्मींचे काही पडलेले नाही. रंगकर्मी रसत्यावर आणि ते आपल्या कामात होते.