कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता, वाईतील दिगंबरने आयफोनवर बनवला ‘पिच्चर’!

दिगंबरला कोणताही अभिनयाचा वारसा नाही. त्याच्या वडिलांची वडापावची गाडी आहे. बालपणापासून सिनेमा पाहण्याची आवड त्याला दिग्दर्शनाच्या मैदानात उतरण्यासाठी पुरेशी ठरली.

  सिनेमाचं वेड एखाद्याकडून काय करवून घेईल याचा नेम नाही. इच्छा असेल तर मार्ग मिळतोच हे वाईतील एका तरूणाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. जनरल मोटर्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या दिगंबर वीरकर या नवोदित दिग्दर्शकानं आयफोनवर सिनेमा बनवला आहे. या मराठी सिनेमाचं शीर्षक ‘पिच्चर’ असं आहे. या अनोख्या सिनेमाची प्रोसेस ‘नवराष्ट्र’सोबत शेअर करताना दिगंबरनं ‘पिच्चर’बाबतही सांगितलं.

  सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या गावी राहणाऱ्या दिगंबरला कोणताही अभिनयाचा वारसा नाही. त्याच्या वडिलांची वडापावची गाडी आहे. बालपणापासून सिनेमा पाहण्याची आवड त्याला दिग्दर्शनाच्या मैदानात उतरण्यासाठी पुरेशी ठरली. त्याने आयटीआय केलेला आहे.

   दिग्दर्शन करण्याबाबत दिगंबर म्हणाला की, हॉलीवूडचा ‘अवतार’ सिनेमा पहिल्यापासून माझ्या मनात चित्रपट बनवण्याचा विचार सुरू झाला. कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता मी दिग्दर्शन केलं आहे. यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला. बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागलं.

  दिग्दर्शक बनण्यासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षण घेण्याबाबत दिगंबर म्हणाला की, युट्युबवर आणि इंटरनेटच्या माध्यमातून सिनेमा बनवण्यासाठी आवश्यक असलेली माहिती मिळवली. त्यानंतर दिग्दर्शक बनण्याच्या दृष्टिकोनातून सिनेमा पाहू लागलो. एखादा सीन कोणत्या अँगलमधून, कसा आणि का घेण्यात आला असेल याचा स्टडी केला आणि सिनेमा बनवण्याचं धाडस केलं. या कामी काही मित्रमंडळींनी मदत केली. जेम्स कॅमेरॉनच्या ‘अवतार’ सिनेमानं प्रेरणा दिली आणि ‘पिच्चर’ बनवला. बऱ्याच स्टोरीज लिहिल्या होत्या त्यावर सिनेमाच्या फॉरमॅटमध्ये आणण्यासाठी ड्राफ्ट शिकून घेतला. कथा पटकथेत कशी बदलायची ते समजून घेतलं. दादासाहेब फाळके यांनी कॅमेरा नसताना सिनेमा केला, मग आता आपण का करू शकत नाही असा विचार केला आणि लागलो कामाला. ‘परागंदा’ ही शॉर्ट फिल्म बनवली. एफटीआयच्या एनएसआयमध्ये स्क्रिनिंग केलं. त्यातून आलेल्या अनुभवातून ‘पिच्चर’ बनवला.

  आयफोनवरच शूट का?

  ‘पिच्चर’ मी १२ मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या आयफोनवर शूट केला आहे. आज मार्केटमध्ये यापेक्षाही जास्त मेगापिक्सेल असलेले मोबाईल आहेत, पण माझ्याकडे १२ मेगापिक्सेलचा फोन असल्याने त्यावर शूट केला. काही प्रॉब्लेम आला नाही. स्क्रीनवर छान दिसत असल्याने एडिट केला आणि मॅक्स प्लेअरवर प्रदर्शित झाला आहे. याचं लेखन, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग मी स्वतःच केलं. यात एकही गाणं नाही.

  सर्व सामान्यांच्या परिचयाचे टायटल

  हा एकूण ८४ मिनिटांचा चित्रपट आहे. टायटलबाबत सांगायचं तर ‘पिच्चर’ हा शब्द दैनंदिन वापरातील आहे. सिनेमाला जाताना आपण ‘पिच्चर’ असाच उच्चार करतो. चित्रपट, सिनेमा किंवा फिचर फिल्म असं काही बोलण्यापेक्षा ‘पिच्चर’ हा शब्द जास्त जवळचा वाटतो. त्यामुळे या कथानकासाठी हेच टायटल योग्य असल्याचं जाणवलं. हा चित्रपट नवोदित क्लाकारांच्या जीवनावर आधारित आहे. सुरुवातीला अपयश आलं तरी खचून न जाता प्रयत्न करत रहायला हवं हे सांगणारा आहे.

  थिएटरमधील कलाकार

  हा सिनेमा रिलीज करण्यासाठी काही लोकांना भेटलो, पण माझ्या गावाकडच्या भाषाशैलीमुळे दुर्लक्ष केलं गेलं. माझं प्रोडक्ट कस आहे याकडं लक्ष दिलं नाही. याची खंत वाटते. याच कारणामुळे मॅक्स प्लेअरवर सिनेमा रिलीज केला. आयुष्यात कोणत्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायला हवं हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. जगदीश चव्हाण, राम गायकवाड, महेश आंबेकर, ऐश्वर्या शिंगाडे, अंकिता नरवणेकर, गणेश वीरकर, महेश्वर पाटणकर, कुशाल शिंदे, सीमा निकम, सीमा वर्तक, सोनाली विभूते, रविकिरण दीक्षित, अविनाश धुळेकर आदी कालाकारांनी या चित्रपटात काम केलं आहे. पार्श्वसंगीत केदार दिवेकर आणि साउंड डिझाईन निखिल लांजेकरनं केलं आहे. बावधन, वाई, सातारामध्ये शूट केलं आहे.