विठ्ठल साकारणारा अजिंक्य बनला इंद्रा

अजिंक्यची जोडी 'फुलपाखरू' फेम हृता दुर्गुळेसोबत जमली आहे. या मालिकेबाबतचा अनुभव अजिंक्यनं 'नवराष्ट्र'सोबत बोलताना शेअर केला.

  ‘विठू माऊली’ या गाजलेल्या मालिकेत विठ्ठलाची भूमिका साकारणारा अजिंक्य राऊत झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या नव्या मालिकेत इंद्राच्या भूमिकेत दिसणार आहे. यात अजिंक्यची जोडी ‘फुलपाखरू’ फेम हृता दुर्गुळेसोबत जमली आहे. या मालिकेबाबतचा अनुभव अजिंक्यनं ‘नवराष्ट्र’सोबत बोलताना शेअर केला.

  पुण्यातील डी. वाय. पाटील कॅालेजमधून इन्ट्रुमेंन्टेशन इंजीनियरींग करणाऱ्या अजिंक्यनं परभणीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. कोठारे व्हीजनच्या ‘विठू माऊली’ या मालिकेद्वारे त्यानं छोट्या पडद्यावर प्रवेश केला. दुसऱ्या लॅाकडाऊनपूर्वी त्यानं प्रथमेश परबसोबत ‘टकाटक २’ हा चित्रपट केला. आता ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत तो एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. याबाबत अजिंक्य म्हणाला की, या मालिकेत अॅक्टर म्हणून स्वत:ला एक्सप्लोर करायला चांगला चान्स मिळतोय. झी मराठीसोबत हे माझं पहिलं असोसिएशन आहे. यापूर्वी मी ‘विठू माऊली’ या मालिकेत विठ्ठलाची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेसाठी मला वेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागला होता. २३-२४ वर्षांच्या तरुणाला देवाच्या रूपात प्रेक्षकांना स्वीकारायला लावण्याचं आव्हान होतं. विठ्ठलाच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आता ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत वेगळी आव्हानं आहेत. देव म्हणून प्रेक्षकांनी स्वीकारलेल्या तरुणाला आता वास्तववादी भूमिकेत सादर करायचं आहे. या कॅरेक्टर्समध्ये वेगवेगळे शेडस पहायला मिळतील. त्याचं घरी एक रूप आणि कामाच्या ठिकाणी काहीसं कठोर रूप दिसतं. एकाच व्यक्तिरेखेत असलेली दोन रूपं दिग्दर्शक मंदार देवस्थळींच्या दिग्दर्शनाखाली सादर करायला मिळणं हा छान अनुभव आहे. यासाठी मी जीव ओतून काम करतोय. या मालिकेचं वेगळेपण सांगायचं तर यात लव्ह अॅट फर्स्ट साईट वगैरे काही नाही. सिनेमात जसं गुड लुकींग दाखवलं जातं आणि पाहताक्षणीच प्रेम होतं असं काही यात नाही. टिपीकल प्रेमात पडण्याची परिभाषा मोडीत काढणारी ही मालिका आहे. सिच्युएशन दोघांना एकत्र आणते. इच्छा नसताना कामाच्या ठिकाणी ते भेटतात. त्यांचे बॅास त्यांना जबरदस्तीनं एकत्र काम करायला लावतात. दोघांची एकमेकांसोबत काम करण्याची अजिबात इच्छा नसते. एकमेकांचा द्वेष करणारे दोघेही हळूहळू एकमेकांना ओळखू लागतात. कुठेतरी त्यांना एकमेकांमधल्या चांगल्या गोष्टी जाणवू लागतात. त्यानंतर पुढं काय घडतं ते ‘मन उडू उडू झालं’ पाहिल्यावरच समजेल.

  माणुसकी जपणारा कुटुंबवत्सल तरुण
  यात मी इंद्रजीत नावाची व्यक्तिरेखा साकारत असून, हा इंद्रा या नावानं ओळखला जातो. हा कॅालेजमध्ये गोल्ड मेडल मिळवलेला मुलगा आहे. खूप सोफेस्टिकेटेड, आईचा लाडका, कुटुंबात थोरला आहे. मनाप्रमाणं किंवा गुणवत्तेनुसार काम मिळत नसल्यानं तो एक प्रकारचं काम स्वीकारतो. त्यातही तो प्रामाणिकपणा आणि माणूसकी जपतो. काम वेगळ्या धाटणीचं असल्यानं ते करताना त्याला मजा येतेय. मूळात अजिंक्य म्हणून मी असा मुळीच नाही. ‘विठू माऊली’ ही मालिका करताना माझ्यावर जे संस्कार झाले, त्यानुसार मारामारी करणं मला जमत नाही. माझा स्वभाव नसताना ते उत्तमरीत्या प्रेक्षकांसमोर सादर करण्याचं आव्हान या कॅरेक्टरमध्ये आहे.

  देवस्थळी-नलावडेंकडून शिकतोय
  मंदार देवस्थळी खूप चांगले दिग्दर्शक आहेत. दोन वाक्यांमधला पॅाझ कसा कॅश करायचा किंवा वाक्य न बोलता अभिनयाद्वारे भावना कशी पोहोचवायची ही कला त्यांना खूप चांगल्या प्रकारे जमते. यावर आम्ही डिस्कशन करून चांगले सीन्स करत आहोत. हृता दुर्गुळे ही खूप सुंदर अभिनेत्री असल्यानं तिच्यासोबत काम करण्याचा छान अनुभव आहे. मालिकेची संपूर्ण टीमच अतिशय एनर्जेटीक आणि कमालीची परीपूर्ण आहे. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडेंसोबत माझा इन्ट्रोडक्शन सीन आहे. त्यांचा अभिनय पाहिल्यावर मला प्रश्न पडला की, इतक्या सहज कसं काय कोणी काम करू शकतं? सहज अभिनय कसा केला जातो हे त्यांच्याकडं पाहून शिकणं ही माझ्यासाठी जणू पर्वणीच आहे. त्यांच्यासोबत सीन्स करताना खूप शिकतोय.

  देवत्व त्यागून माणूस बनताना…
  लहानाचा मोठा परभणीमध्ये झालो आहे. आयुष्यातील १७ वर्षांचा काळ मी परभणीमध्ये राहिलो आहे. तिथे भाषेपेक्षा जास्त भावनेला महत्त्व दिलं जातं. ‘विठू माऊली’साठी मला बोलीभाषेपासून सर्वच टोन चेंज करावा लागला होता. प्रमाण भाषा, देवांची भाषा, त्याला काही अॅक्सेन्ट असता कामा नये ही बंधनं होती. ते कॅरेक्टर केल्यानं बोलण्यात इतका ठेहराव आला की, संथ आणि शांतपणे बोलू लागलो होतो. आता त्यात बदल करून नॅार्मल बोलावं लागत आहे. थोडी निगेटीव्ह शेड येण्यासाठी कुठे जास्त स्ट्रेस देणं किंवा वाक्यांची सुरुवात वेगळ्या शैलीत करणं हे काम करावं लागत आहे. खूप बोलण्यापेक्षा न बोलता सांगणं यावर सध्या भर देत आहे. माझी ही शैलीही प्रेक्षकांना आवडावी हीच अपेक्षा आहे.

  यासाठी हा शो पहायला हवा
  साऊथ फिल्म्स आणि तिथल्या गाण्यांचं क्रेझ मराठीमध्ये आहे. एकूणच बरेच आंतरराष्ट्रीय चित्रपटही डब करून संपूर्ण जगभर प्रदर्शित होतात. मराठमोळा बाज आणि साऊथ इंडियन फ्लेवर मिक्स करून ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेच्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे. विठ्ठल म्हणून काम केलेला कलाकार नॅार्मल माणूस म्हणून कसं काम करतो हे पाहण्यासाठी, हृता आणि माझ्या केमिस्ट्रीसाठी, मंदार देवस्थळींचं दिग्दर्शन अनुभवण्यासाठी ही मालिका पहायला हवी. झी मराठीनं एकाच वेळी नवीन विषयांवर आधारित, नवीन मूडमधील मालिका आणण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे. त्यापैकी एक नवा फ्लेवर ‘मन उडू उडू झालं’मध्ये पहायला मिळणार आहे.

  सुंदर व हुषार अभिनेत्री
  हृता अतिशय हुषार अभिनेत्री आहे. ‘अनन्या’ हा तिचा चित्रपट तयार असून, सध्या ती या मालिकेसोबत आणखी एका नव्या चित्रपटाचं शूटिंग करण्यात बिझी आहे. दिवसा ‘मन उडू उडू झालं’साठी शूट करून रात्री चित्रपटाचं शूटिंग करतेय. ती अव्हेलेबल नसते तेव्हा माझं पूर्ण शूट ठेवलं जातं. त्यामुळं एकमेकांना कॅाम्प्लिमेंट करत आणि साथ देत आमचं शूटिंग सुरू आहे. तिचं कामाबाबतचं डेडीकेशन कमालीचं आहे. खूप काम करूनही नवीन सुरुवात असल्यासारखाच तिचा नेहमी प्रयत्न असतो. काम करताना अतिशय सेटल असते. आमचं आॅनस्क्रीन आणि आॅफस्क्रीन बाँडींग खूप छान झालं आहे. आता पुढे आणखी छान सीन्स करायला मिळणार आहेत.

  आधी डिग्री, मग अभिनय
  बाबा परभणीत डिप्लोमा कॅालेजमध्ये असून, आई सिव्हील हॅास्पिटलमध्ये नर्स आहे. त्यामुळं कुटुंबात अॅक्टिंग करणारं कोणीही नाही. शाळेत असल्यापासून मला अभिनयाची आवड होती, पण परभणीहून अभिनयासाठी पाठवणं शक्य नसल्यानं कमीत कमी ग्रॅज्युएट तरी व्हायला हवं असं आई-बाबांचं म्हणणं होतं. तेसुद्धा मुंबईत नव्हे, तर पुण्यात जाऊन करायचं होतं. त्यानंतर तुझ्या लाईफचे डिसिजन्स तू घेऊन काय ते ठरव, पण डिग्री असायला हवी असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानुसार मी डिग्री घेतल्यानंतर मुंबईत शिफ्ट झालो आणि अभिनय सुरू केला.