
रत्नाकर मतकरी यांच्या ‘कामगिरी’ या कथेवर आधारित ‘२१७ पद्मिनी धाम’ हे नाटक रंगभूमीवर येत आहे.
गुढकथा आणि रहस्य कथांच्या बाबतीत जेव्हा केव्हा बोललं जात तेव्हा रत्नाकर मतकरी (Ratnakar Matkari) हे नाव हमखास घेतलं जात. आपल्या लिखाणाने एक रहस्यमयी आणि गूढ जगात या कथा वाचकांना घेऊन जातात. याच कथांच अनेकदा जिवंत कलाकृतीत रूपांतर झालं असून आता रत्नाकर मतकरी यांच्या ‘कामगिरी’ या कथेवर आधारित ‘२१७ पद्मिनी धाम’ (217 Padmini Dham) हे नाटक रंगभूमीवर येत आहे.
गेल्या वर्षात याच नावाने एकांकिका स्पर्धा मध्ये ‘२१७ पद्मिनी धाम’ ही एकांकिका गाजली. प्रेक्षकांचा मिळणार प्रतिसाद पाहून या एकांकिकेच नाटक करण्याचं दिग्दर्शक संकेत आणि नचिकेत यांनी ठरवलं. नाटकाचं लिखाण सुरु असताना निर्मात्याची शोध संकेत घेत होता आणि अशा वेळी करण भोगले याने नाटकांची निर्मितीची जबाबदारी घेतली. या नाटकांच्या निमित्ताने मिलिंद शिंदे हे पुन्हा एकदा रंगभूमीवर दिसणार आहेत. बराच काळ मालिका आणि सिनेमा केल्यानंतर मिलिंद शिंदे पुन्हा एकदा रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडायला येत आहे. रंगभूमीवर या नाटकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा वेगळा कलाविष्कार पाहायला प्रेक्षकांना मिळणार आहे. नाटकाची संपूर्ण टीम ही एकांकिका करत आली असून अनेक स्पर्धामध्ये गाजलेले चेहरे इथे नाटकाच्या व्यवस्थापनात मदत करताना दिसणार आहेत.
या नाटकाचं नेपथ्य संदेश बेंद्रे करत असून नाटकांच्या नेपथ्याची निर्मिती खास असणार आहे. नेपथ्याच्या बाबतीत सुद्धा या नाटक एक वेगळा प्रयोग करण्याचा दिग्दर्शकाचा आणि नेपथ्यकाराचा मानस आहे. एकांकिका ते नाटक असा प्रवास करणारी कथा नचिकेत दांडेकर याने नाट्य रूपांतरित केली आहे. या नाटकांची तालीम सध्या सुरु झाली असून नाटकात मिलिंद शिंदे सह अजून दोन कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नाटकाची निर्मिती करणारा करण याच निर्माता म्हणून हे पहिलंच नाटक आहे.
नाटकांच्या निमित्ताने करण सांगतो ,“संकेतच हे नाटक मी एकांकिका म्हणून पाहिलं होतं. त्यातलं गिमिक आणि कथेची गूढता हे मला फार आकर्षित करतं. एकांकिका पाहिल्यानंतर काही दिवसांनी संकेत निर्माता शोधतोय हे मला कळल्यावर मी स्वतःच त्याला आपण मिळून निर्मिती करू असं सांगितल. या कथेच्या नाट्य रूपांतरापासून मी नाटकाच्या प्रोसेस मध्ये आहे आता हे नाटक रंगभूमीवर येणार असून प्रेक्षकांना ते एक नवा नाट्यानुभव मिळेल ही आशा आहे.”
ज्येष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे सांगतात की, “पुन्हा एकदा रंगभूमीवर येतोय. त्याला कारण ही तसच आहे पहिलं कारण म्हणजे रत्नाकर मतकरी त्यांनी लिहिलेले एकतरी पात्र आपल्याला साकारायला मिळावं ही मनात असलेली इच्छा आणि दुसरं म्हणजे नाटक खरंच वेगळं आहे आणि जे पात्र मी साकारणार आहे त्याचं रेखाटन हे फार जुजबी झालेलं आहे. सिनेमा मालिका या माध्यमात काम करत असताना ती माझी आवड म्हणून मी करतो तर नाटक हे माझं सर्वस्व आहे. माझी सुरुवात सुद्धा नाटकातूनच झाली त्यामुळे रंगभूमीवर काम करण्यासाठी मी प्राधान्य जास्त दिल आहे. या नाटकांची प्रोसेस ही फार वेगळी आणि माझ्यासाठी कसोटीची आहे. आपण नेहमीच बोलतो की कलाकृती वेगळी आहे, पण या नाटकांच्या बाबतीत खरंच तस आहे.”