akhil mishra

अभिनेते अखिल मिश्रा यांचं आज निधन झालं आहे.

    थ्री इडियट्स (3 Idiots) या चित्रपटात लायब्ररियन दुबे ही भूमिका साकारणारे अभिनेते अखिल मिश्रा (Akhil Mishra) यांचं आज निधन झालं आहे. बाल्कनीमध्ये काम करत असताना अखिल मिश्रा हे खाली पडले, असं म्हटलं जात आहे. अखिल मिश्रा यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

    “तो एक अपघात होता. किचनमध्ये ते जमिनीवर जखमी अवस्थेत आढळून आले. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. आता त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही घटना घडली तेव्हा अखिल यांची पत्नी सुझान बर्नर्ट ही हैदराबादमध्ये शूटिंग करत होती.

    “माझ्यासाठी ही खूप दु:खद आणि मन हेलावणारी घटना आहे. माझ्या आयुष्याचा भाग मला सोडून गेला आहे,” अशा भावना अखिल मिश्रा यांच्या निधनानंतर सुझाननं व्यक्त केल्या आहेत.

    अखिल मिश्रा यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अखिल मिश्रा यांच्या निधनानं अनेकांना धक्का बसला आहे. अखिल मिश्रा यांनी ‘डॉन’, ‘गांधी माय फादर’,‘शिखर’, ‘कमला की मौत’, ‘वेल डन अब्बा’ या चित्रपटांमध्ये काम केलं. ‘3 इडियट्स’मधील दुबे या भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. प्रधान मंत्री या मालिकेत देखील त्यांनी काम केले. ते ‘उतरन’, ‘उडान’, ‘सीआयडी’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘हातिम’ आणि इतर अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रमांचा भाग होते.

    अखिल यांचे पहिले लग्न 1983 मध्ये मंजू मिश्रा यांच्याशी झाले होते. या दोघांनी 1983 मध्ये ‘धत तेरे…की’ या फिचर फिल्ममध्ये आणि ‘गृहलक्ष्मी का जिन’ या मालिकेत काम केले होते. पुढे मग 1997 मध्ये मंजूच्या मृत्यूनंतर, अखिल यांनी फेब्रुवारी 2009 मध्ये जर्मन अभिनेत्री सुझान बर्नर्टशी लग्न केले. सुझान बर्नर्टनं अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘कसौटी जिंदगी की’, ‘सावधान इंडिया’, ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, या मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे.