मिस्टर परफेक्शनिस्ट! वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतोय मुलगा, डेब्यू चित्रपट रिलीज होण्यापूर्वी दुसरा चित्रपटही पूर्ण

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या 'महाराज'मधून ३० वर्षीय जुनैद खान अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही, मात्र नेटफ्लिक्स हा चित्रपट लवकरच प्रदर्शित करणार आहे.

  सध्या अनेक स्टार किड्स बॅालिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाले आहे. येत्या काळात अनेक स्टार किड रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसणार आहेत. यामध्ये अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खानचाही समावेश आहे. आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांचा मुलगा जुनैद (junaid khan) बॉलीवूडमध्ये आपलं स्थान बनवण्यास सज्ज झाला आहे. येत्या काही दिवसात त्याचा ‘महाराज’ हा डेब्यू चित्रपट रिलीज होणार आहे. पण तो वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मिस्टर परफेक्शनिस्ट बनताना दिसत आहे. त्याचा पहिला चित्रपट अद्याप रिलिज झालेला नसताना त्याने त्याच्या दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केलंआहे. रिपोर्ट नुसार, जुनैदने त्याचा दुसरा प्रोजेक्ट अवघ्या 58 दिवसांत पूर्ण केला आहे. मात्र, त्याच्या या दुसऱ्या चित्रपटबद्दल फारशी माहिती समोर नाही आली आहे.

  वडिलांच्या होम प्रोडक्शनमध्ये बनतोय जुनैदचा दुसरा चित्रपट

  जुनैद खानचा दुसरा चित्रपट त्याचे वडील आमिर खानच्या होम प्रोडक्शन म्हणजेच आमिर खान प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. या चित्रपटात जुनैदसोबत दक्षिण भारतीय चित्रपटांची सुंदर अभिनेत्री साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहे. जुनैद खान त्याच्या आगामी शीर्षक नसलेल्या चित्रपटाचे ५० दिवसांचे शेड्यूल पूर्ण करून गेल्या महिन्यात जपानहून परतला. जपानमधील सपोरोमध्ये दीड महिना शूटिंग केल्यानंतर जुनैदने आपला चित्रपट पूर्ण केल्याचे सांगण्यात येत आहे.

  जुनैदचे चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल झाले होते

  अलीकडे जुनेद खान आणि सई पल्लवीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ते चित्रपटाच्या सेटवर शूटिंग करताना दिसले होते. हे दोघे सपोरो स्नो फेस्टिव्हलच्या पार्श्वभूमीवर शूटिंग करताना दिसले. रिपोर्ट्सनुसार, जपानमध्ये खराब हवामान असतानाही जुनैद आणि त्याच्या संपूर्ण टीमने तिथे शूटिंग सुरू ठेवली आणि चित्रपट पूर्ण केला. चित्रपट लवकर पुर्ण करण्यासाठी टीमला दररोज 12-14 तास काम करावे लागत होते, अशी माहिती समोर आली होती.

  जुनैदचे आगामी प्रोजेक्ट

  रिपोर्ट्सनुसार, जुनैदचा आणखी एक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहे, ज्यामध्ये तो खुशी कपूरसोबत दिसणार आहे. ‘लव्ह टुडे’ या तमिळ चित्रपटाचा हा अधिकृत हिंदी रिमेक असेल, ज्याचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. महाराजबद्दल सांगायचे तर हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.