आता ‘भिडू’ बोलताना जरा जपून, जॅकी श्रॉफने ठोठावले कोर्टाचे दार

जॅकी श्रॉफने त्याच्या संमतीशिवाय त्यांचे नाव, आवाज किंवा इतर कोणतेही गुणधर्म वापरण्यापासून कंपन्या, सोशल मीडिया चॅनेलला प्रतिबंध करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.

  बॉलीवूड स्टार जॅकी श्रॉफ हे अनेकांचे चाहते असून त्याचे कित्येक चित्रपट हे सुपरडुपर हिट आहेत. यांनी प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात घर करून ते चित्रपटमधून तसेच अभिनयातून लोकांना आवडू लागला. आता त्याचदरम्यान जॅकी श्रॉफ याने दिल्ली उच्च न्यायालयात आपले नाव, उपमा आणि त्याचे टोपणनाव ‘भिडू’ वापरण्यासाठी संरक्षण मिळावे यासाठी याचिका दाखल केली आहे. मंगळवार, १४ मे रोजी, जॅकीने त्याचे नाव, प्रतिमा, आवाज आणि त्याचा ‘भिडू’ नावाचा अनधिकृत वापर केल्याबद्दल अनेक संस्थांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

  जॅकी श्रॉफच्या प्रकरणाची सुनावणी १५ मे रोजी होणार आहे, उद्याच्या कारवाईनंतर न्यायालय कदाचित अंतिम आदेश जारी करेल.

  श्रॉफचे प्रतिनिधित्व करताना, अधिवक्ता प्रवीण आनंद यांनी न्यायालयाला माहिती दिली की त्यांच्या प्रतिमा आक्षेपार्ह मीम्समध्ये वापरल्या गेल्या आहेत आणि काही प्रकरणांमध्ये त्यांच्या आवाजाचाही अशाच हेतूने गैरवापर करण्यात आला आहे.

  उच्च न्यायालयासमोरील आपल्या याचिकेत, ज्येष्ठ अभिनेत्याने जॅकी श्रॉफ, जॅकी, जग्गू दादा तसेच भिडू या नावांचे संरक्षण मागितले आहे आणि म्हटले आहे की कोणत्याही व्यासपीठावर याचा वापर करता येणार नाही.

  त्याने तंत्रज्ञान विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (MEITY) बेकायदेशीरपणे त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व लिंक्स आणि वेबसाइट्स काढून टाकण्याची सूचना द्यावी अशी विनंती केली.

  ही काही पहिलीच वेळ नाही, जेव्हा एखाद्या बॉलीवूड अभिनेत्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. गेल्या वर्षी अनिल कपूरनेही आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. यावर्षी जानेवारीत या अभिनेत्याने केस जिंकली होती. विजयाच्या परिणामी, त्याचे नाव, आवाज, प्रतिमा, उपमा, बोलण्याची पद्धत, हावभाव आणि ‘झकास’ देखील आता संरक्षित आहे.