‘कार्तिकेय -२’ प्रेक्षकांसाठी एक अनोखी सफर – निखिल सिद्धार्थ

‘कार्तिकेय-२ (Karthikey-2) या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर २७ नोव्हेंबर रोजी रात्री ८.०० वाजता झी सिनेमावर आहे. त्यानिमित्ताने निखिल सिद्धार्थची (Nikhil Siddharth) खास मुलाखत.

  ‘कार्तिकेय-२’ चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला आणि तो जबरदस्त हिटही झाला. सर्वांच्या अपेक्षेपेक्षा इतकं अधिक यश मिळविण्यात चित्रपटातील कोणत्या गोष्टीचा वाटा सर्वाधिक आहे, असं तुला वाटतं?
  उत्तर – श्रीकृष्णाच्या गाथेमुळे प्रभावित झाली नाही अशी एकही व्यक्ती नाही. ‘कार्तिकेय-२’ची कथा त्यावरच आधारित असून तो प्रेक्षकांना जीवनातील एका अनोख्या धाडसी सफरीचा आनंद देतो. आतापर्यंतचं सर्वात मोठं रहस्य उकलण्यात माझं जीवन गुंतलं असून झी सिनेमाच्या प्रेक्षकांना या धाडसी सफरीवर घेऊन जाताना मला फार आनंद होत आहे. कठीण काळात आपण सर्वांनी कधी ना कधी परमेश्वराचा धावा केलाच असेल. या चित्रपटातही आपल्याला असंच काहीसं दिसेल. त्यामुळेच हा चित्रपट अधिक विश्वासार्ह झाला आहे. या कथेला श्रीकृष्णाचं सामर्थ्य लाभलं आहे, असा माझा विश्वास आहे.

  माझ्या मते याच कारणामुळे हा चित्रपट इतका प्रचंड यशस्वी बनला आहे- लोकांनी स्वत: या चित्रपटाचा प्रसार केला. हा चित्रपट साधारण यशस्वी होईल, असं आमची अपेक्षा होती. पण ५० दिवसांनंतरही तो चित्रपटगृहांमध्ये प्रसारित होत राहिला. ती गोष्ट महत्त्वाची आहे आणि ज्या प्रेक्षकांनी तो चित्रपटगृहांत येऊन पाहिला, त्या प्रत्येक प्रेक्षकाचे आम्ही ऋणी राहू.

  आपल्या देशात पौराणिक चित्रपट इतके लोकप्रिय का होतात? अशा चित्रपटांवरील जबाबदारी बघता तुझ्या भूमिकेसाठी आणि एकंदरीतच चित्रपटासाठी तू कशी पूर्वतयारी केली होतीस?
  उत्तर – ज्याने भारतात जन्म घेतला आहे, अशा व्यक्तीला भारताची प्राचीन समृध्द संस्कृती आणि महाकाव्ये यांची माहिती नसेल, असं संभवतच नाही. मी स्वत: माझ्या वडिलांकडून अशा महाकाव्यांतील गोष्टी ऐकतच मोठा झालो आहे. त्या कथांबद्दल वाटणाऱ्या उत्सुकतेमुळेच मी या चित्रपटातील भूमिका स्वीकारली. अशा कथांबद्दल वाटणारी उत्सुकता आणि त्यावरील विश्वास यामुळेच भारतात पौराणिक चित्रपट लोकप्रिय होतात. कारण आपण सर्वांनीच आपले आई-वडील आणि आजी-आजोबांकडून अशा पौराणिक कथा बालपणापासून ऐकलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला त्यांचा विलक्षण अभिमान वाटतो.

  ‘कार्तिकेय-२’साठी मी संशोधन आणि अन्य माहिती जमा करण्यात बराच वेळ व्यतीत केला. दुर्दैवाने या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असतानाच माझ्या वडिलांचं निधन झालं. परिणामी हा चित्रपट करताना माझ्या भावना आवरणं मला अवघड जात होतं. पण माझे वडील माझ्या या संशोधनात खूपच समरस झाले होते. त्यांनी चित्रपटातील काही प्रसंगांच्या चित्रफितीही पाहिल्या होत्या आणि त्या त्यांना खूपच आवडल्या होत्या. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे मी त्यांना वाहिलेली श्रध्दांजलीच आहे.

  अनुपम खेर यांच्याबरोबर काम करतानाचा तुझा अनुभव कसा होता?
  उत्तर : या चित्रपटाशी संबंधित सर्वच गोष्टींनी माझं जीवनच बदलून टाकलं आहे. या चित्रपटासाठी चित्रीकरण करताना माझ्यातील अभिनेत्याची कसोटी लागली होती आणि या चित्रपटाने मी व्यापक प्रेक्षकांशी जोडला गेलो. या सर्वांवर कडी म्हणजे अनुपम खेर सरांबरोबर भूमिका साकारण्याची मिळालेली संधी. हा अनुभव खूपच भारावून टाकणारा होता. ते चित्रपटाची कथा आणि पटकथेत इतके गुंतून गेले होते की त्यांनी चित्रपट जणू जिवंतच केला. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी याला जे वलय दिलं की त्यात आम्ही सर्वजण गुरफटून गेलो.