अभिनेत्री हेतल यादवचा भीषण अपघात! शुटिंगवरून परतताना अभिनेत्रीच्या कारला ट्रकची धडक

    मुंबई : हिंदी मालिकांमधील लोकप्रिय चेहरा असलेली अभिनेत्री हेतल यादव (Hetal Yadav)  हिचा रात्री शुटिंगवरून घरी परतत असताना भीषण अपघात घडला. अभिनेत्रीच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली असून या अपघातात सुदैवाने अभिनेत्रीला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र याचा मोठा धक्का अभिनेत्रीच्या मनावर बसला आहे.

    रविवारी रात्री शूटिंग संपल्यावर रात्री ९ च्या सुमारास हेतल यादव स्वतःच कार ड्राईव्ह करत निघाल्या. जेवीएलआर हायवे जवळ आल्यावर एका ट्रकची त्यांच्या कारला जोरदार धडक बसली. मात्र हेतल या अपघातात गंभीर दुखापतीपासून वाचल्या.

    एका वृत्तपत्राला माहिती देताना हेतल म्हणाल्या, “मी काल रात्री ८:४५ च्या सुमारास शुटिंग पॅकअप केले आणि घरी जाण्यासाठी फिल्मसिटी सोडले. मी JVLR महामार्गावर पोहोचताच एका ट्रकने माझ्या कारला धडक दिली आणि माझी कार उड्डाणपुलाच्या काठावर ओढली आणि ती पडणार होती. या घटनेमुळे मला धक्का बसला. मी माझ्या मुलाला आणि पोलिसांना फोन करून अपघाताची माहिती दिली”. हेतलने छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘इमली’ या लोकप्रिय मालिकेतदेखील काम केलं आहे.