भरपाई देऊन प्रकरण मिटवणार का ?; उच्च न्यायालयाची चित्रपट निर्मात्यांना विचारणा

दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करणारी मॉडेल आणि अभिनेत्री साक्षी मलिकच्या परवानगीशिवाय तिचा एक फोटो ॲमेझॉन प्राईम ओटीटीवरील 'व्ही' या तेलगु सिनेमात दाखवण्यात आला आहे. एक वेश्या व्यवसाय करणारी महिला म्हणून हा फोटो वापरण्यात आला आहे.

    मुंबई : अभिनेत्रीच्या परवानगीशिवाय तिचा फोटो चित्रपटात वापरल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘व्ही’ या तेलगु चित्रपटाच्या निर्मात्यांना अभिनेत्रीला भरपाई देऊन प्रकरण मिटवणार का ? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीदरम्यान केली.

    दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करणारी मॉडेल आणि अभिनेत्री साक्षी मलिकच्या परवानगीशिवाय तिचा एक फोटो ॲमेझॉन प्राईम ओटीटीवरील ‘व्ही’ या तेलगु सिनेमात दाखवण्यात आला आहे. एक वेश्या व्यवसाय करणारी महिला म्हणून हा फोटो वापरण्यात आला आहे. हा फोटो साक्षीने साल २०१७ मध्ये आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केल्याचे म्हटले आहे.

    या प्रकारामुळे आपल्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून मानसिक त्रास झाल्याचा दावा करत साक्षीने वेंकटेश्वर क्रिएशन विरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा ठोकला आहे. त्यावर न्या. गौतम पटेल यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

    भरपाईची अपेक्षित रक्कम भरण्यास निर्माते तयार नसल्याची माहिती साक्षीच्या वतीने बाजू मांडताना वकील अलंकार किर्पेकर आणि अॅड. सविना बेदी यांनी न्यायालयाला दिली. त्यावर जर हा खटला याचिकाकर्ते जिंकले तर त्यांनी मागितलेली भरपाई निर्मात्यांना द्यावीच लागेल असे स्पष्ट संकेत खंडपीठाने निर्मात्यांना दिले आणि याबाबत लेखी स्वरूपात खुलासा करण्याचे निर्देश निर्मात्यांना देत सुनावणी १ एप्रिलपर्यंत तहकूब केली.