vedangi kulkarni interview

यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली. म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले आणि वटपौर्णिमेला पूजा आणि उपास करण्याची प्रथा सुरू झाली. नुकत्याच सुरू झालेल्या ‘सत्यवान सावित्री’ (Satyavan Savitri Serial) मालिकेत हे सारंकाही पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सावित्रीची भूमिका वेदांगी कुलकर्णीने (Vedangi Kulkarni) साकारली आहे. तेव्हा याच निमित्ताने वेदांगीशी केलेली ही खास बातचीत.

    स्मिता मांजरेकर,मुंबई : सावित्रीचे पात्र रंगवणारी वेदांगी सांगते की, सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण आणले. तिने जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी व्रत केलं. एवढंच आपल्याला माहित आहे. पण मालिकेत यापलिकडचा सावित्रीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तिचा एकूण जीवन संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ती राज घराण्यातून आलेली आहे. ती राजकन्या आहे. तरी ती एका जंगलात राहणाऱ्या मुलाशी लग्न करते. तो जंगलातला असला तरी त्याच्यातही काहीतरी वेगळेपण आहे. म्हणून तिने त्याच्याशी लग्न केलं. एकूणच या मालिकेतून सत्यवान आणि सावित्रीची त्याकाळातील लव्ह स्टोरी आम्ही दाखवणार आहोत. ते कसे भेटले ? त्यांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली ? हे पाहणं नक्कीच इंट्रेस्टिंग असेल तसंच ही त्याकाळातली कथा असली तरी ही कथा आत्ताच्या काळातील लोकांना कशी आवडेल? त्यापध्दतीने ही मालिका रेखाटण्यात येणार आहे.

    भूमिकेची तयारी करताना
    भूमिकेची तयारी करताना मी ही कथा वाचली. जुने चित्रपट पाहिले. त्यांनीही त्यांच्या पध्दतीने खूप चांगलं चित्रण केलं आहे. पण मी जेवढं वाचलं, पाहिलं. त्यात फक्त खूपच बेसिक गोष्ट दाखवण्यात आली आहे. पण झी मराठीच्या टीमने या मालिकेसाठी खूप अभ्यास केला आहे. ते खूप जणांना भेटले. त्यातून नव्याने गोष्टी कळल्या. तसंच वैयक्तिकरित्या या भूमिकेसाठी मी शब्द, उच्चार, भाषेचा अभ्यास केला. कारण पौराणिक कथा म्हटली की, त्यात भाषा वेगळी असते. त्यामुळे भाषेवर खूप मेहनत घ्यावी लागली.

    मालिकेतील माझा लूक
    मला सुरुवातीला मालिकेत लूक कसा असेल हे माहित नव्हतं. वेगवेगळे लूक टेस्ट केले. आधी सावित्रीसाठी फक्त साधी साडी असा लूक देणार होतो. पण आता प्रेक्षक पाहत असलेला लूक खूपच वेगळा आहे. सुरुवातीला ती राजकन्या दाखवण्यात आली आहे. त्यामुळे त्याप्रमाणे तिचा लूक ठेवण्यात आला आहे. तर नंतर सत्यवानाशी लग्न केल्यानंतर एकदम वेगळाच लूक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मला दोन्ही लूक आवडले. पौर्णिमा ओकने वेशभूषा केली आहे.

    भूमिकेचं आव्हान
    पौराणिक भूमिका साकारताना मला रिस्क वाटते. एक अभिनेत्री म्हणून आव्हान असतं. कारण डेली सोप करताना त्यात खूप आव्हानं नसतात. दैनंदिन जीवनातलीच ती पात्र असतात. पण पौराणिक मालिका करताना तंत्रज्ञानापासून अनेक गोष्टीशी जुळवून घ्यावं लागतं. तसंच या मालिकेचं चित्रीकरण क्रोमावर करण्यात येत आहे. त्यामुळे कल्पनाशक्तीच्या जोरावर सीन करावा लागत आहे. लाईव्ह लोकेशन असलं की, आजूबाजूच्या गोष्टी आपण सहज अनुभवतो. जंगल, नदी, राजवाडा हे भोवताली असतात. त्याचा एक वेगळा प्रभाव पडतो. पण क्रोमावर शूट करण्यात येत असल्यामुळे सगळ्या गोष्टी कल्पना करून त्याप्रमाणे सीन साकारायला लागत आहे, हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. ते चित्रीकरण वास्तवही वाटलं पाहिजे ही मोठी तारेवरची कसरत आहे. खरंतर मी ऑडिशन्सच्यावेळीही खूपच साशंक होते. ही भूमिका करावी की करू नये ? याबाबत ठाम नव्हते. पण ऑडिशन्स तर देऊन बघू, असा विचार करून ऑडिशन दिली आणि मग सेलेक्ट झाले. पण तरीही ही भूमिका मला पेलवेल का? असे अनेक विचार मनात येत होते. पण नंतर दिग्दर्शक संतोष कोल्हसह आमचे वर्कशॉप झाले. त्यांनी आमच्याकडे ती भूमिका अक्षरश: करवून घेतली.

    सावित्रीचे भावलेले गुण
    सावित्रीचा ठामपणा मला खूपच भावला. तिचा दृढनिश्चयी स्वभाव मला आवडला. खाजगी आयुष्यात माझ्यात दृढनिश्चयता नाहीए. त्यामुळे सावित्रीचा ठामपणा माझ्या आयुष्यात कसा आणता येईल? यासाठी मी प्रयत्न करत आहे.

    आजच्या काळाशी मिळतीजुळती कथा
    सावित्री ही शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टींमध्ये पारंगत होती आणि तिला तिच्या वडिलांनी कधीच मुलगी आहे म्हणून कसली बंधन आणली नाही. ती खूप हुशार होती. तिला सगळंच यायचं. त्याकाळात ती जास्त शिकलेली होती. म्हणून मुलं तिला नकार देत होते. जे आत्ताही आपण पाहतो. त्याकाळात ती स्वत:चा पती मी स्वत: निवडणार या विचाराची होती आणि आत्ताच्या मुलीदेखील त्याच विचाराच्या आहेत. त्यामुळे ही कथा जुन्या काळातील असली तरी आजची पिढी लगेच त्याच्याशी कनेक्ट होईल.

    वटवृक्षाचं नुकसान करू नका….
    मी माझ्या फॅन्सला एवढाच संदेश देईल की, तुम्हाला जमतंय तेवढंच करा. आपल्या निर्सगाची काळजी घ्या. झाडे लावा, तोडू नका. वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी वटवृक्ष तोडणं हे मला काही पटत नाही.

    आदित्यशी असलेलं बॉण्डिंग
    या मालिकेत आदित्य दुर्वे सत्यवानाची भूमिका साकारत आहे. आमच्यात चांगलं बॉण्डिंग झालं आहे. आम्ही ऑडिशनला भेटलो होतो. तेव्हा माहित नव्हतं की, पुढे जाऊन काम करू. पण तेव्हाच आमच्यात चांगलं बॉण्डिंग झालं. तो सहकलाकार म्हणून खूप चांगला आहे. पौराणिक मालिका असल्यामुळे सीनचे टेक जास्त होतात. पण तो न कंटाळता प्रत्येक सीनमध्ये साथ देतो.

    एकांकिका ते मालिकेचा प्रवास
    मी मुंबईची. माझी शाळा पार्ले टिळक विद्यालय तर डहाणूकर कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. माझे आई-वडिल हे दोघेही कलाक्षेत्राशी निगडीत नाही. मला इथे गॉडफादर नाही. पण लहानपणी मला नृत्याची आवड होती. पण कॉलेजमध्ये असताना मी थिएटरमध्ये सहभागी झाली. अनेक एकांकेत भाग घेतला. तेव्हा अभिनय करेल असं काही ठरवलं नव्हतं. पण २०१० मध्ये झी मराठीच्या ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या शोचा भाग झाले. त्यानंतर इंटरकॉलेज कॉम्पिटिशनमध्ये मला बक्षिसं मिळत गेली आणि मग यात आवड निर्माण झाली. तसंच एक आत्मविश्वास आला की, आपण हे करू शकतो. त्यानंतर मी दोन नाटकात काम केलं. मंगेश कदम यांचं ‘छडा’ आणि उषा नाडकर्णी यांच्यासह ‘लंडनच्या आजीबाई’ या नाटकात काम केलं. त्यानंतर मी मालिकेकडे वळले. माझी पहिली मालिका मंदार देवस्थळी दिग्दर्शित ‘सूर राऊ दे’ ही मालिका झी युवावर यायची. त्यानंतर ‘साथ दे तू मला‘ या मालिकेत मुख्य भूमिका केली. ‘कुसुम‘ मालिकेतील माझी भूमिकाही प्रेक्षकांना आवडली.