‘रक्षाबंधन’चं शूट पूर्ण होताच अक्षय कुमार लागणार ‘राम सेतू’च्या तयारीला!

सध्या आनंद एल. राय यांच्या 'रक्षाबंधन'चं शूट पूर्ण करत असलेला अक्षय 'राम सेतू'साठी सप्टेंबरमध्ये वेळ देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    लॅाकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर शूटिंगला परवानगी मिळाल्यापासून काही कलाकार जणू झपाटल्यासारखे कामाला लागल्याचं पहायला मिळत आहे. यात अक्षय कुमार आघाडीवर आहे. लॅाकडाऊनमुळे शूट रखडलेल्या चित्रपटांसोबतच अक्षयनं नवीन चित्रपटांच्या चित्रीकरणालाही प्रारंभ केला आहे. यापैकीच ‘राम सेतू’ हा एक महत्त्वपूर्ण चित्रपट आहे. सध्या आनंद एल. राय यांच्या ‘रक्षाबंधन’चं शूट पूर्ण करत असलेला अक्षय ‘राम सेतू’साठी सप्टेंबरमध्ये वेळ देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयच्या जोडीला जॅकलीन फर्नांडीस आणि नुसरत भरूचा मुख्य भूमिकेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अक्षय शूटिंगसाठी श्रीलंकेत जाणार होता, पण तिथे १५ दिवस कॅारंटाईन व्हावं लागणार असल्यानं समस्या निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. केप आॅफ गुड फिल्म्स, अबुदांतिया एन्टरटेन्मेंट आणि लायका प्रोडक्शनच्या सहकार्यानं अमेझॅान प्राईम व्हिडीओ या चित्रपटाची सहनिर्मिती करत आहे. डॅा. चंद्रप्रकाश द्विवेदी या चित्रपटाचे क्रिएटीव्ह प्रोड्युसर आहेत.