ajay-devgn

'तान्हाजी'मध्ये नरवीर तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर करणारा अजय देवगणही डिजिटलवर पदार्पण करणार असल्याची बातमी यापूर्वीच आली आहे.

    चित्रपटांच्या पावलावर पाऊल टाकत रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला ओटीटी प्लॅटफॉर्मही कोट्यवधींची गणितं सोडवू लागला आहे. चित्रपटांप्रमाणे वेब सिरीजनंही कोट्यवधी रुपयांचा खेळ सुरू केला आहे. आजवर कलाकार चित्रपटांसाठी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेत असल्याचं ऐकलं होतं, पण कानामागून आली आणि तिखट बनली ही म्हण खरी करत ओटीटीसुद्धा कोट्यवधींचं मानधन देऊ लागला आहे. याच कारणामुळं मागील काही दिवसांपासून मोठमोठया कलाकारांची पावलं डिजिटलच्या दिशेनं वळू लागली आहेत.

    काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘फॅमिली मॅन २’साठी मनोज बाजपेयीला ८ ते १० कोटी रुपयांचं मानधन मिळाल्याची चर्चा सुरू असताना हा आकडा आता थेट शंभर कोटींच्या पार गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ‘तान्हाजी’मध्ये नरवीर तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर करणारा अजय देवगणही डिजिटलवर पदार्पण करणार असल्याची बातमी यापूर्वीच आली आहे.

    ‘लुथर’ या ब्रिटीश शोचा हिंदी रिमेक असलेल्या ‘रुद्रा’ या लिमिटेड एपिसोडच्या वेब सिरीजमध्ये काम करण्यासाठी स्टार नेटवर्कनं अजयला तब्बल १२५ कोटी रुपयांची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यात प्रोमो शूटपासून सोशल मीडिया पोस्ट आणि रिअलिटी शोमध्ये प्रमोशनपर्यंतच्या सर्व अक्टिव्हीटीजचा समावेश असल्याचं समजतं. राजेश मापुसकरांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या वेब सिरीजचा प्रीमियर या वर्षाअखेरीस होणार आहे.