नाथ प्रतिष्ठानच्या लावणी वादात अमृता खानविलकरची उडी! म्हणाली…

    बीड : अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) तिच्या अभिनय कलेसह नृत्य कलेमुळे फारच लोकप्रिय आहे. नटरंग, चंद्रमुखी अशा मराठी चित्रपटातील तिच्या ठसकेदार लावणीमुळे तिला लावणी समराधीनी म्हणूनही ओळखले जाते. मात्र अमृताच्या याच लावणीने (Lavani) सध्या वाद ओढवून घेतला आहे.

    परळीच्या नाथ प्रतिष्ठानने (Nath Pratisthan, Parali) आयोजित केलेल्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये अमृताने केलेल्या लावणी नृत्यावरून सध्या आयोजकांवर चौफेर टीका होत आहे. यावादात अमृताने उडी घेतली असून तिने याप्रकरणी तिची बाजू मांडली आहे.

    परळीच्या नाथ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये अमृता खानविलकरने परफॉर्मन्स सादर केल्यानंतर गणेशोत्सव मंडळावर टीका होऊ लागली. त्यानंतर अमृताने आपल्या महाराष्ट्राच्या कलेला बदनाम करू नका, असे आवाहन सर्व प्रेक्षकांना केले आहे.. अमृता म्हणाली, ट्रोल केल्याने केवळ व्ह्यूज मिळतात म्हणून लावणीला ट्रोल करू नका. लावणीही शृंगारिक आहे, हे खरं..मात्र, ती स्पिरिच्युअलसुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. लावणी ही महाराष्ट्राची ओळख आहे, तिला गालबोट लावू नका, असं जाहीर आवाहन तिनं केलं आहे. लावणी ही महाराष्ट्राची ओळख आहे. तिला अशा खालच्या नजरेतून बघणं पाप आहे, असंही ती म्हणाली.

    धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अध्यक्ष असलेल्या परळीच्या नाथ प्रतिष्ठान गेली सतरा वर्षे वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहे. यंदा गणेशोत्सवामध्ये लावणी.. कव्वाली..भीम गीते आणि हास्य कार्यक्रमांचे मोठे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अमृताच्या लावणीचाही कार्यक्रम होता. पहिल्याच दिवशी लावणी ठेवल्याने लोकांनी सडकून टीका केली. यावेळी धनंजय मुंडे यांनीही लोकांपुढे हात जोडले असून नाथ प्रतिष्ठानची बदनामी करू नका अशी विनंती केली आहे.