anuja sathe in ek thi begum

एमएक्स प्लेअरवर ३० सप्टेंबरला ‘एक थी बेगम’ (EkThi Begum)या वेब सीरिजचा पुढचा भाग पहायला मिळणार आहे. ‘एक थी बेगम’मध्ये अनुजा साठे-गोखलेनं साकारलेल्या अशरफचे काहीसे हटके रंग दुसऱ्या सीझनमध्ये पहायला मिळणार आहेत. ‘एक थी बेगम २’च्या निमित्तानं अनुजानं (Anuja Sathe Interview)‘नवराष्ट्र’शी केलेली विशेष बातचीत...

  मराठी आणि हिंदी चित्रपट-मालिकांनंतर डिजिटल प्लॅटफॅार्मकडे वळलेल्या अनुजानं ओटीटीवरही पदार्पणातच धमाका केला आहे. मागच्या वर्षी लॅाकडाऊनमध्ये रिलीज झालेल्या ‘एक थी बेगम’ या सचिन दरेकर आणि विशाल मोढावे दिग्दर्शित वेब थरारक सीरिजनं सर्वांचं लक्ष वेधून घेत मनोरंजन केलं. आता ‘एक थी बेगम २’च्या रूपात या वेब सीरिजचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  ‘एक थी बेगम’बाबत अनुजा म्हणाली की, सचिन मला या रोलसाठी विचारेपर्यंत मी ओटीटीवर कधी काम केलं नव्हतं. कलाकार म्हणून मला सर्व मीडियम्सद्वारे स्वत:ला सादर करायला आवडतं. त्यात खूप ग्रोथ असते. त्यामुळं नकार देण्याचा काही प्रश्नच नव्हता. इतकं स्ट्राँग कॅरेक्टर करायला मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट असते. सचिननं मला गोष्ट ऐकवली, तेव्हा होकार द्यायला एक मिनिटही घेतला नाही. त्यावेळी मी टीव्हीवर हिंदी शो करत होते, पण सचिनला म्हणाले की, कितीही ॲडजस्टमेंटस करावी लागली तरी मी ही वेब सीरिज करेन. पहिल्या सीझनला इतका प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळेल असा आम्ही विचारही केला नव्हता. कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक जेव्हा आपलं शंभर टक्के योगदान देतात, तेव्हा रिझल्टची अपेक्षा केली जात नाही. रिझल्टचा विचार करून कोणीही कलाकृती बनवत नाही. कलाकृती घडल्यावर त्याचा रिझल्ट कळतो. त्यामुळं आम्ही कसा आणि किती प्रमाणात प्रतिसाद मिळेल असा विचारही केला नव्हता. फक्त मनापासून आणि मेहनतीनं आम्हाला एक चांगली कलाकृती निर्माण करायची होती. मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं. तसंच ‘एक थी बेगम’बाबत झालं. दुसरा सीझनही खूप मेहनतीनं बनवलाय.

  चॅलेंजिंग कॅरेक्टर
  टायटल रोलमधील अशरफची व्यक्तिरेखा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. मी आतापर्यंत साकारलेल्या माझ्या भूमिकांमधलं अशरफचं कॅरेक्टर वन ऑफ द मोस्ट चॅलेंजींग आहे. कारण या कॅरेक्टरला खूप पैलू आहेत. सरळमार्गी असं हे कॅरेक्टर नाही. इमोशनली आणि फिझिकली खूप वेगवेगळी चॅलेंजेस होती. त्यामुळं फिझिकली किंवा मेंटली बेगम खूप आव्हानात्मक होती. माझ्यासाठी हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे. एक कलाकार म्हणून हा शो करताना मी खूप ग्रो झाले आहे. याच कारणामुळं ही प्रोसेस माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. यावेळी लूकवाईजही बऱ्यापैकी चेंजेस आहेत. हेअरस्टाईलपासून कपड्यांपासून बरंच काही बदललं आहे. नव्वदच्या दशकातील फॅशन या शोमध्ये पहायला मिळते.

  भाषेवर प्रभुत्व होतं पण…
  हिंदीत काम केल्यानं भाषेवर प्रभुत्व होतं. त्यामुळं भाषेवर विशेष काम करावं लागलं नाही, पण एखादा उर्दू शब्द किंवा त्याच्या उच्चारांसाठी नेहमीच थोडं मार्गदर्शन मिळालं. कोणत्याही धर्माची किंवा कास्टची प्रार्थना दाखवताना ती परफेक्ट असावी लागते. नमाज अदा करणं आणि इतर गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासाठी सेटवर ऑलवेज मदत मिळायची. क्रू मेंबर्समधील लोकंही मार्गदर्शन करायची. नमाज काय आणि ती सादर कशी करायची इथपर्यंत सर्व बारीकसारीक गोष्टी मला सांगितल्या गेल्या. त्यामुळं काही त्रुटी राहिल्या नाहीत. शेवटी व्यक्तिरेखा ही माणूसच असल्यानं ती कोणत्या धर्माची ही मॅटर करत नाही. लहानसहान मुद्दे व्यवस्थितपणे सादर केले, तर कोणतीही व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारता येते.

  बदललाय बेगमचा नूर
  दुसऱ्या सीझनमध्ये अशरफ आणखी जास्त डेंजरस बनल्याचं पहायला मिळेल. पहिल्या सीझनमध्ये आपण तिला पाहिलं की ऑलरेडी तिची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यातून ती कशी बशी वाचली आहे. आता दुसऱ्या भागात तिच्या मागं खूप जण लागल्याचं पहायला मिळेल.‘एक थी बेगम २’मध्ये अशरफसमोरील चॅलेंजेस वाढली आहेत. आपल्या हातात खूप कमी वेळ आहे हे तिला माहित आहे. चारी बाजूंनी तुम्हाला जेव्हा कुणीतरी ट्रॅप करायचा प्रयत्न करतं, तेव्हा त्यातून सुटायची जी धडपड असते ती वाढलीय. अशरफ आता लीला पासवान बनली आहे. मकसूदचं बेकायदेशीर साम्राज्य उलथवून टाकण्याचा आणि पती झहीरच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या प्रतिज्ञेचं पालन करत, ती निर्भयपणे पुरुषांच्या जगात वर्चस्व गाजवताना दिसणार आहे. अंडरवर्ल्डपासून पोलीस आणि राजकारण्यांपर्यंत सत्तेतील प्रत्येकजण तिच्या शोधात आहे. दुसऱ्या सिझनची सुरुवात लीला पासवानच्या शोधानं होते. अशरफनं घातलेला आणखी एक वेष ज्यात, ती मृत्यूला पराभूत करून दुबईच्या भयानक आणि शक्तिशाली डॉनला गुडघ्यावर आणण्याच्या तिच्या ध्येयाकडं परतते.

  छान जमलं ट्युनिंग
  पहिल्या सीझनमध्ये हिंदी भाषिक कलाकारांच्या जोडीला बरेच मराठमोळे चेहरे होते. त्यामुळं आमचं खूप छान ट्युनिंग जुळलं. पहिल्या सीझनच्या तुलनेत दुसऱ्या सीझनमध्ये जास्त हिंदी भाषिक कलाकार दिसतील. एका पॅाइंटनंतर एखाद्या कलाकृतीसाठी कलाकार कोणत्या भाषेचा आहे हे मॅटर न करता ती कला मॅटर करते. स्टोरीसाठी ते कॅरेक्टर मॅटर करतं. दोन्ही सीझनच्या वेळी सेटवर खेळीमेळीचं वातावरण होतं. मिश्र भाषिक कलाकार असूनही भाषा हे बॅरीअर कधी मध्ये आलंच नाही. आमची टीम खूप स्ट्राँग होती. यात शहाब अली, चिन्मय मांडलेकर, विजय निकम, रेशम श्रीवर्धनकर, राजेंद्र शिसटकर, नझर खान, हितेश भोजराज, सौरासेनी मैत्रा, लोकेश गुप्ते, मीर सरवर, पूर्णनंदा वाडेकर आणि रोहन गुजर हे कलाकार आहेत.

  शांतता शूटिंग सुरू आहे…
  माझी आणि सचिनची ओळख ‘लगोरी’ या मालिकेच्या वेळी झाली. सुरुवातीला ‘लगोरी’चा स्क्रीनप्ले आणि डायलॅाग्ज सचिन लिहायचा. त्यानंतर आम्ही दोन वर्षांपूर्वी ‘एक थी बेगम’च्या निमित्तानं पुन्हा भेटलो. प्रत्येक दिग्दर्शकाची एक वेगळी प्रोसेस असते तशी सचिनचीही आहे. सचिनचा डिस्कशनवर खूप भर असतो. स्क्रीप्ट वाचून, होमवर्क करून आपण बसून बोलूया, काय पटतंय, काय नाही पटत हे जाणून घेऊन काम करण्याची त्याची शैली आहे. खूप शांत स्वभावाचा दिग्दर्शक आहे. सेटवर कधीही आरडाओरड नसते. सेटवर खेळीमेळीचं वातावरण राखण्यात सचिन व विशाल या दोघांचाही दिग्दर्शक म्हणून खूप मोठा वाटा आहे. त्यामुळं आपोआप कम्फर्ट लेव्हल येते. या दोघांसोबत काम करताना पहिल्या सीझनपासून कम्फर्ट होते.

  … तेव्हा ती दुर्गा बनते
  अशरफ ही व्यक्तिरेखा थेट कोणताही सोशल मेसेज देणारी नाही. ही स्टोरी रिव्हेंजची असली तरी त्यातून काही गोष्टी शिकण्यासारख्या नक्कीच आहेत. नो नॅानसेन्स बिझनेस म्हणजे तुम्ही माझ्या वाकड्यात जाऊ नका. एखादी मुलगी जोपर्यंत शांत आहे, तोपर्यंत ती गोड आहे, पण तुम्ही जर तिला त्रास दिला, तर मग तिच्यातील दुर्गारूपाला सोमोरं जाण्यासाठीही तयार रहा. असं कुठेतरी या कॅरेक्टरचं कनेक्शन आपण नक्कीच जोडू शकतो. एका साध्या कुटुंबातील फॅमिली ओरिएंन्टेड मुलगी जेव्हा असं पाऊल उचलते, तेव्हा त्यामागं काहीतरी कारण असतं. मला वाटतं हे प्रत्येक मुलीच्या बाबतीत घडतं.