संगीताचा जादुगार A R Rahman नं AI च्या मदतीनं केली कमाल! दिवंगत गायकांचा आवाज पुन्हा घुमणार कानी, वाचा सविस्तर..

दिवंगत दिग्गजांचा आवाज पुन्हा जिवंत होण्याची इंडस्ट्रीत ही पहिलीच वेळ आहे.

    संगीत क्षेत्रातील जादुगार एआर रहमान (A R Rahman) नेहमीच संगीतात नवे नवे प्रयोग करत असतो. त्याच्या संगीताचे जगभरात चाहते आहे. आता त्याच्या चाहत्यांसाठी त्यानं नुकतीच एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. ऑस्कर विजेत्या रहमानने तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करावा हे सांगितले आहे. त्याने आगामी ‘लाल सलाम’ चित्रपटात एआयच्या मदतीने (Artificial Intteligence) दिवंगत गायकांच्या आवाजात गाणी तयार केली आहेत. या चित्रपटात बंबा बक्या आणि शाहुल हमीद या गायकांचा आवाज देण्यासाठी AI ची मदत घेण्यात आली आहे.

    याबद्दल एक्सवर माहिती शेअर करताना एआर रहमाननं लिहिलं की, ‘लाल सलाममधील थिमिरी येझुदा या गाण्यात बंबा बक्या आणि शाहुल हमीद यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज टाईमलेस व्हॉइस एक्स एआय व्हॉइस मॉडेलमुळे शक्य झाला. दिवंगत दिग्गजांचा आवाज पुन्हा जिवंत होण्याची इंडस्ट्रीत ही पहिलीच वेळ आहे.

    एआर रहमानने लिहिलं की, ‘आम्ही त्यांच्या कुटुंबीयांकडून परवानगी घेतली आणि त्यांचे व्हॉईस अल्गोरिदम वापरण्यासाठी योग्य मोबदला पाठवला… आम्ही तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास कोणताही धोका नाही,’

    रजनीकांतच्या मुलीने दिग्दर्शित केलाय चित्रपट

    रजनीकांतचा आगामी चित्रपट लाल सलाम सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट त्याची मुलगी ऐश्वर्याने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांतसह अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर रजनीकांत विस्तारित कॅमिओ भूमिकेत आहेत. लायका प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाची कथा विष्णू रंगासामी यांनी लिहिली आहे. याशिवाय त्याने ऐश्वर्या रजनीकांतसोबत त्याची स्क्रिप्टही लिहिली आहे.