अश्विनी बागलचे नवीन प्रोजेक्ट्स करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

अश्विनीनं आजवर व्हिडीओ अल्बमसोबतच चित्रपटांद्वारेही रसिकांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. लवकरच अश्विनीचे आणखी काही नवीन प्रोजेक्टस रसिकांचं मनोरंजन करणार आहेत. यासोबतच स्वनिर्मितीमध्येही काही प्रोजेक्ट्स तयार करण्याची अश्विनीची योजना आहे.

    आजघडीला मराठी सिनेसृष्टीत बरेच नवनवीन कलाकार आपले नशीब आजमावत आहेत. यापैकी लक्ष वेधून घेणारा चेहरा म्हणजे अश्विनी बागल. देखण्या चेहऱ्याला सशक्त अभिनयाची जोड देत अश्विनीनं आजवर व्हिडीओ अल्बमसोबतच चित्रपटांद्वारेही रसिकांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. लवकरच अश्विनीचे आणखी काही नवीन प्रोजेक्टस रसिकांचं मनोरंजन करणार आहेत. यासोबतच स्वनिर्मितीमध्येही काही प्रोजेक्ट्स तयार करण्याची अश्विनीची योजना आहे.

    ‘उसासून आलंय मन’ या म्युझिक अल्बमसोबतच झी मराठी वाहिनीवरील ‘टोटल हुबलक’ या मालिकेत अभिनय केलेली अश्विनी, अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘भिरकीट’ या आगामी चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तिनं एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असून, यातील आपली भूमिका नक्कीच प्रेक्षकांसोबतच समीक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी तिला आशा आहे. पहिल्या सिनेमादरम्यान आई सोडून गेली तरीही मागे न हटता ‘शो मस्ट गो ऑन’चा मंत्र जपत अश्विनीनं मोठ्या जिद्दीनं आणि चिकाटीनं आपला पहिला चित्रपट पूर्ण केला. अश्विनीला मोठ्या स्क्रीनवर पहाणं हे तिच्या आईचं स्वप्न होतं, जे तिच्या पश्चात साकार झालं आहे. यातील तिचा लुक आणि अभिनय मनोरंजन विश्वात एका नवीन अभिनेत्रीचं पदार्पण होत असल्याची चाहूल देण्यासाठी पुरेसा ठरला आहे. करियरमध्ये सुरुवातीलाच दिग्गजांसोबत स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव अश्विनीला भावी करियरसाठी उपयोगी ठरणार आहे.

    या चित्रपटाखेरीज नुकतंच अश्विनीनं एका ऐतिहासिक चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. याखेरीज लवकरच ती होम प्रोडक्शनमध्ये बनणाऱ्या सिरियलद्वारे महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचणार आहे. करियरच्या सुरुवातीच्या काळातच ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यानं अश्विनी अत्यंत आनंदी आहे. चित्रीकरण पूर्ण झालेला हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रसिक दरबारी सादर होणार आहे. यातील बऱ्याच गोष्टी अश्विनीसाठी खूप चॅलेंजींग होत्या. बोलीभाषेपासून देहबोलीपर्यंत सर्वच गोष्टींवर तिनं खूप मेहनत घेतली आहे. मालिकेचा विषयही वर्तमान काळात सुरू असलेल्या मालिकांपेक्षा भिन्न असून, एक वेगळाच जॅानर या निमित्तानं रसिकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतही अश्विनी काहीशा बदललेल्या लुकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. इतकंच नव्हे अभिनयासोबतच अश्विनी स्वत:चा एक नवीन व्यवसायही सुरू करणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.