siddharth salvi athang

‘अथांग’ (Athang Webseries) या प्लॅनेट मराठी ओटीटीवरच्या (Planet Marathi OTT) वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत लाँच करण्यात आला आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) या वेबसीरिजच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. जयंत पवार दिग्दर्शित ही वेबसीरिज २५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यानिमित्ताने या वेबसीरिजचे लेखक सिद्धार्थ साळवी (Siddharth Salvi Interview) यांची एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत खास नवराष्ट्रच्या वाचकांसाठी.

    अथांगचा प्रारंभ

    ‘अथांग’ वेबसीरिजच्या लिखाणाला सुरुवात कशी झाली याविषयी सिद्धार्थ साळवी सांगतात की, मी आणि तेजू (तेजस्विनी पंडित) खूप जुने मित्र आहोत. आम्ही एका चित्रपटावर काम करत होतो. त्यामुळे आमच्या भेटीगाठी होत होत्या. त्याच काळात एका वेबसीरिजच्या शूटींगसाठी मी बाहेर होतो. मला धैर्य घोलपचा म्हणजे जो ‘अथांग’मध्ये मुख्य भूमिका करतोय त्याचा फोन आला. तो मला म्हणाला की, सिद्धार्थ एक कथा आहे आपल्याकडे आणि त्याच्यावर आपल्याला वेबसीरिज करायची आहे. त्याआधी तेजस्विनी पंडितला धैर्यने कथा ऐकवली तेव्हा सिद्धार्थशिवाय ही कथा कुणीच लिहू शकत नाही, असं तिचं म्हणणं होतं. तो लिहिणार असेल तर आपण ही वेबसीरिज करुयात नाहीतर करायला नको, असं ती म्हणाली. धैर्यने मग वनपेजर पाठवला आणि मी तो वाचला. अथांगसाठीची मूळ कथा मनोज कोल्हटकरांची होती. मी ती वाचली. पण वेबसीरिज करायची असेल तर कथेत अनेक गोष्टींची भर घालण्यासाठी वेळ हवा होता. मात्र एक – दिड महिन्यामध्ये वेबसीरिजसाठी ती कथा तयार करायची असल्याचं मला सांगण्यात आलं. दिग्दर्शक जयंत पवार यांनी मला कथेसाठी काही मुद्दे सांगितले. त्या काळात माझं एका हिंदी चित्रपटावरही काम चालू असल्याने माझ्याकडे वेळ नव्हता. माझा एक प्रोजेक्ट थोडा लांबणीवर टाकून मग मी कथा लिहिली.

    आजीची गोष्ट, अथांग आणि अळवत

    ‘अथांग’विषयी सिद्धार्थ सांगतात की, ‘अथांग’ एक वेगळ्या पठडीची वेबसीरिज आहे. संपूर्ण फॅमिली एकत्र बसून तुम्ही ती बघू शकता.  अथांग ही दोन पिढ्यांची कथा आहे. या वेबसीरिजचा ट्रेलर बघून अनेकांना तुंबाडची आठवण झाली. मला वाटतं ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे. आपल्या मातीतली ही गोष्ट असल्याने ती लोकांना जास्त अपील होते. कलाकारांची छान भट्टी यात जमून आली आहे. अथांग लिहिताना असं वाटलं की माझ्या कोकणातली मी काहीतरी गोष्ट सांगतोय. मला लिहितानाच खूप गंमत वाटत होती.

    लेखक म्हणून भाषेच्या जडणघडण कशी झाली याविषयी सिद्धार्थ सांगतात की, माझी आई मुख्याध्यापिका होती. जेव्हा ती रिटायर झाली तेव्हा ती शिक्षणाधिकारी होती. त्यामुळे मराठीचे धडे घरातच लहानपणापासून गिरवले गेले. आम्ही मुळचे कोकणातले. माझी आजी मला कोकणातल्या काही गोष्टी सांगायची. त्या गोष्टींमधून मला अळवत म्हणजे काय हे समजलं. आता अळवत म्हणजे नक्की काय हे लोकांना ‘अथांग’ बघितल्यावरच कळेल. आजीकडून ऐकलेल्या अनेक गोष्टींचा फायदा मला ‘अथांग’ची कथा लिहिताना झाला.

    लिखाणावर माडगूळकरांचा प्रभाव
    मनोरंजन क्षेत्रातील प्रवासाविषयी सिद्धार्थ सांगतात की, मी २००६ पासून या इंडस्ट्रीमध्ये आहे. ‘अंतिम’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद मी लिहिले होते. ‘पॉवर’ सिनेमाचं लिखाणही मी केलं होतं. हे दोन्ही प्रोजेक्ट मी महेश मांजरेकरांच्या सोबत केले होते.  मी ‘हॉर्न ओके प्लीज’ नावाची वेबसीरिज लिहिली. जी झी ५ वर उपलब्ध आहे. ‘गलबत’ नावाचा सिनेमाही मी केला. ‘भाई व्यक्ती की वल्ली’साठी असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं. आत्तापर्यंत मी १६ मालिकांचं लेखन केलं आहे. मी प्रायोगिक नाटकं लिहिली आहेत. ड्रीम थिएटर मुंबई नावाची माझी संस्था आहे. मी २०१३ ला ‘सायलेंट स्क्रीम’ नावाचं नाटक केलं होतं. त्याला झी गौरव पुरस्कार मिळाला होता. पुढे २०१७ ला ‘शिकस्त-ए-इश्क’ या नाटकालाही झी गौरव पुरस्कार मिळाला.

    सिद्धार्थ पुढे सांगतात की, मराठी साहित्यामध्ये असे खूप लेखक आहेत. ज्यांच्याकडून मी शिकत आलो. मी एकलव्यासारखं त्यांना बघत बघत शिकलो आहे. मला स्वत:ला व्यंकटेश माडगुळकरांच्या लिखाणाची शैली आवडते. नात्यांची ते खूप छान गुंफण करुन लिहितात. माझ्यावर त्यांच्या लिखाणाचा खूप प्रभाव आहे असं वाटतं.

    महाविद्यालयीन काळात मनोरंजन क्षेत्राशी नाळ कशी जुळली याविषयी सिद्धार्थ म्हणाले की, मी पनवेलच्या एमपीएससी कॉलेजमध्ये सायन्सचा विद्यार्थी होतो. मला सुरुवातीला क्रिकेटमध्ये खूप रस होता. मित्र म्हणाला म्हणून २००३ मध्ये युथ फेस्टिव्हलमध्ये मी ऑडिशनला गेलो होतो. बॅकस्टेज करण्याच्या हेतूने तिकडे गेलेला मी पण त्यांनी मला अभिनय क्षेत्रामध्ये उतरवलं. नंतर २००६ पर्यंत क्रिकेटकडून माझा फोकस अभिनय क्षेत्राकडे शिफ्ट झाला. मी २००६ साली ‘नभ उतरु आलं’ ही पहिली एकांकिका लिहिली होती. ती एकांकिका माडगुळकरांच्या कथेवर आधारित होती. पुढे २००८ पर्यंत नोकरी करत करत मी सीरियल्स करत होतो. नंतर जॉब सोडून लिखाणातच मी करिअर करायचं ठरवलं. मेजवानी सीरियलसह २-३ सीरियल मी लिहत होतो. पण २०१० ला माझा अपघात झाला. त्यामुळे दीड वर्ष मला मालिकेसाठी काहीच करता आलं नाही. त्यावेळी मी ‘सायलेंट स्क्रीम’ नावाचं प्रायोगिक नाटक लिहिलं. पुण्यातल्या त्या नाटकाच्या प्रयोगाला केदार शिंदे आले होते. त्यांनी ते नाटक बघितल्यानंतर मला येऊन सांगितलं की, ‘खो-खो’ चित्रपटाचे संवाद तू लिहिणार आहेस. मी माझी पहिली फिल्म केदार शिंदेंसोबत केली. त्यानंतर मी कधी मागे वळून बघितलंच नाही.

    मी फिजिक्समध्ये ग्रॅज्युएशन केलं. पण मी एमबीए दुसऱ्या वर्षी सोडलं. कारण माझ्याकडे एकाच वेळी तीन सीरियल्सचं काम आलं होतं. मी त्यावेळी एमबीए आणि जॉब सोडून या क्षेत्रात येण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता. कारण माझं पॅशन लिखाण आहे. पुढे व्हिसलिंग वूड्सला मी ग्रॅज्यूएशन केलं. शेवटच्या वर्षी स्क्रीन रायटींगमध्ये मी स्पेशलायझेशन केलं.

    आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सिद्धार्थ सांगतात की, मी २ हिंदी चित्रपट करतोय. त्यातला एक पूर्ण झाला आहे. जयंत पवार यांच्यासोबत मी आणखी एक चित्रपट करतोय. तेजू आणि मीसुद्धा एका प्रोजेक्टवर काम करतोय. ‘छोटी खोटी लव्ह स्टोरी’ ही मी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली वेबसीरिज आहे. ज्याचा दुसरा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.