अभिनेता इमरान हाश्मीवर काश्मीरमध्ये हल्ला!

    दिल्ली : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) हा त्याच्या बोल्ड चित्रपटांमुळे तसेच त्यातील सीन्समुळे बराच चर्चेत असतो. मात्र बॉलिवूडच्या या अभिनेत्यावर काश्मीरमधील काही लोकांकडून हल्ला झाल्याची घटना घडली आहे. इमरान जम्मू-काश्मीरमध्ये ‘ग्राउंड झिरो’ (Ground Zero) या चित्रपटाच्या शूटिंगकरता गेला असताना ही धक्कादायक घटना घडली.

    अभिनेता इमरान हाश्मी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu- Kashmir) त्याच्या आगामी ‘ग्राउंड झिरो’ (Ground Zero) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पहलगाममध्ये या चित्रपटाचे शूटिंगचे काम सुरू आहे. संध्याकाळी शूटिंग संपवून, इमरान हाश्मी (Emraan Hashmi) चित्रपटाच्या उर्वरित टीमसह पहलगामच्या मुख्य बाजारपेठेकडे जात होता. त्यानंतर अचानक काही अज्ञात लोकांनी अभिनेत्यासोबत उपस्थित सर्व लोकांवर हल्ला केला आणि सर्वांनी त्याच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

    सुदैवाने यात अभिनेता इमरान हाश्मीला गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे. या हल्ले प्रकरणी पहलगाम पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कलम १४७, १४८, ३७०, ३३६, ३२३ लावण्यात आले आहेत. याप्रकरणी अनंतनाग पोलिसांनी एका व्यक्तीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. समोर आलेल्या निवेदनात पोलिसांनी म्हटले आहे की, या व्यक्तीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली आहे.

    इमरान हाश्मीचा (Emraan Hashmi ) ‘ग्राउंड झिरो’ हा चित्रपट सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानावर आधारित आहे. याआधी चित्रपटाचे शूटिंगही श्रीनगरमध्ये झाले होते. ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देऊस्कर करत आहे. या चित्रपटात इमरान शिवाय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि झोया हुसैन दिसणार आहेत.