सलमानच्या फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न, दोघां विरोधात गुन्हा दाखल

सिक्युरिटीने त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी महेश कुमार रामनिवास आणि विनोद कुमार राधेश्याम असे सांगितले. फार्म हाऊसवर येण्याचे कारण विचारले असता त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.

    पनवेल : वाजे येथील सलीम खान (सलमान खान) यांच्या अर्पिता फार्म हाऊस मध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अजेश कुमार, ओम प्रकाश गीला (राहणार अबोर, पंजाब) आणि गुरु सेवक सिंग तेजा सिंग सिख (रामपुरा, पंजाब) अशी या दोघांची नावे आहेत.

    4 जानेवारी रोजी चारच्या सुमारास दोन इसम कोणतीही परवानगी न घेता अर्पिता फार्म हाऊसचा मेन गेटच्या डाव्या बाजूने असलेल्या ताराचे व झाडाचे असलेल्या कंपाउंड मधून फार्म हाऊस मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. सिक्युरिटीने त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी महेश कुमार रामनिवास आणि विनोद कुमार राधेश्याम असे सांगितले. फार्म हाऊसवर येण्याचे कारण विचारले असता त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी त्यांची नावे अजेश कुमार, ओम प्रकाश गिला आणि गुरु सेवक सिंग तेजासिंग सिख असे असल्याचे सांगितले.

    पोलिसांनी अजेश कुमार यांच्याकडील मोबाईल तपासला असता मोबाईलमध्ये महेश कुमार रामनिवास व अजेश कुमार ओमप्रकाश गिला या दोन्ही आधार कार्डवर एकाच व्यक्तीचे फोटो असलेला आधार कार्ड व विनोद कुमार राधेशाम व गुरुसेवक सिंग सिख या दोन्ही आधार कार्डवर एकाच व्यक्तीचे फोटो असल्याचे दिसून आले. त्यांनी दोन्ही आधार कार्डवर असलेले फोटो त्यांचेच असल्याचे कबूल केले. त्यांनी अर्पिता फार्ममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तसेच मोबाईल फोन मध्ये लोकांची दिशाभूल करण्याचे उद्देशाने एकाच व्यक्तीचे दुसरे बनावट आधार कार्ड फसवणुकीच्या उद्देशाने बनवले. त्यामुळे दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.