balbharti trailer launch

‘बालभारती’मध्ये सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर, आर्यन मेंघजी मध्यवर्ती भूमिकेत तर अभिजित खांडकेकरची विशेष भूमिका

    मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘बालभारती’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्याचे तोंडभरून कौतुक केले असून या चित्रपटाला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट मराठी संस्कृती, भाषा आणि शिक्षण या आपल्यासाठी जिव्हाळ्याच्या गोष्टीना एकत्र जोडतो, असे गौरवोद्गार शिंदे यांनी काढले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या चित्रपटाचा नुकताच प्रकाशित झालेला ट्रेलर आवडीने पहिला आणि त्यावरील आपले म्हणणे व्हिडीओ चित्रित करून दिले. त्याचबरोबर चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छाही दिल्या.

    “बालभारती चित्रपटाचा ट्रेलर मी पहिला आणि मला तो खूप आवडला. हा चित्रपट मराठी संस्कृती, भाषा आणि शिक्षण या अगदी जिव्हाळ्याच्या अशा मुद्द्यांना एकत्रित जोडतो. पालकांची आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दलची कळकळ या चित्रपटात अगदी गमतीशीर पद्धतीने मांडली गेली आहे. मी ‘बालभारती’च्या संपूर्ण टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो,” असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी या संदेशात काढले आहेत.

    या ट्रेलरचे प्रकाशन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बालदिनी म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी मुंबईत झाले. त्यांनीही या चित्रपटात हाताळल्या गेलेल्या विषयासाठी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे कौतुक केले आहे. ‘बालभारती’ हा मराठी चित्रपट येत्या २ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. सर्वांच्या आवडीचा विषय हलक्या-फुलक्या पद्धतीने सादर केला असल्याने ‘बालभारती’बद्दल उत्सुकता लागून राहिली आहेच पण अनेक गाजलेल्या हिंदी मालिका देणाऱ्या निर्मात्याकडून या चित्रपटाची निर्मिती होत असल्यानेही मराठी चित्रपटसृष्टीत त्याबद्दल विशेष कुतूहल आहे.

    या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन नंदन यांनी केले असून निर्माते कोमल व संजय वाधवा हे या चित्रपटाची निर्मिती त्यांच्या ‘स्फीयरओरिजीन्स’ या कंपनीच्या माध्यमातून करत आहेत. यात सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर, आर्यन मेंघजी यांच्या प्रमुख भूमिका असून ग्लॅमरस अभिजित खांडकेकर एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. रवींद्र मंकणी, संजय मोने आणि उषा नाईक या ज्येष्ठ कलाकारांच्या विशेष भूमिका या चित्रपटात आहेत.