
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त (92nd Birthday) गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर (Padmaja Phenany Joglekar) यांनी आपल्या गत आठवणींना उजाळा देत लतादिदींप्रती व्यक्त केल्या भावना.
- आज स्वरसम्राज्ञी लतादीदींच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त अपूर्व अशा मधुर आठवणींना दिला उजाळा
पद्मजा फेणाणी जोगळेकर
मी धसमुसळी! मला संगीतकार श्रीनिवास खळेंची (Composer Shrinivas Khale) H.M.V. मधील गाण्याची माझी रिहर्सल (Rehearsal) संपल्या संपल्या पाच मिनिटं काही स्वस्थ बसवेना. तिथं दिदींचं ((Lata Mangeshkar) आगमन झाल्याची कुणकुण काही वेळापूर्वीच कानावर आली होती. खळेही आत्ताच येतो म्हणून दीदींना भेटायला शेजारच्याच रेकॉर्डिंग रूम (Recording Room) मध्ये गेले.
मध्यान्हीची वेळ. गानसम्राज्ञीच्या दर्शनास आतुरलेल्या मीही हळूच दार किलकिलं करून अगदी छोट्याश्या फटीतून आत डोकावलं. (ते वयच होतं कोवळ्या उन्हाचं) आणि पहाते तो काय? ……. शुभ्र वस्त्र परिधान केलेली, प्रसन्न चेहऱ्यावर झगझगणाऱ्या हिऱ्यांची प्रभा पसरलेली, साक्षात सरस्वतीच! मी देहभान विसरून क्षणभर हे पाहते न् पाहते तोच — दिदींच्या शोधक डोळ्यांनी हे टिपलं अन् “या ना आत” असं म्हणून दीदींनी मला मधुर साद घातली.
मी हळूच चोरपावली आत शिरले. मला त्यांनी जवळ बसवलं. दिदी म्हणाल्या, “परवाच तुमचा ‘झरझर झरे श्रावण डोळा’ हा टी.व्ही.वरचा कार्यक्रम पाहिला. फार सुंदर गाता हो तुम्ही! ….” दिदी गातातही गोड आणि बोलतातही गोड! – जणू आवाज चांदण्याचे…
माझे कान आनंदाने बधीर झाले. हातपाय थंडगार पडले. अनपेक्षितपणे लतादिदी भेटाव्यात आणि पहिल्याच भेटीत माझ्या गाण्याचं त्यांनी मनापासून कौतुक करावं, मला कोण परमानंद झाला होता. माझा माझ्यावर विश्वासच बसेना. मी म्हटलं, “ छे हो दिदी, तुम्ही हे असं कौतुक करावं?” त्यावर त्या हसून म्हणाल्या, “मग काय झालं? एका कलाकारानं दुसऱ्या कलाकाराचं कौतुक करू नये, असं थोडंच आहे?”
खरोखरीच छप्पर फाडून देवानं माला मझ्या गानजीवनाच्या सुरुवातीलाच भक्कम, खंबीर आधार आणि प्रेमळ आशीर्वाद दिला. कधी एकदा हे घरी जाउन सगळ्यांना सांगते असं झालं होतं. हे ऐकून आईनं माझी दृष्ट काढली आणि म्हणाली, “ जीवनात ही घडी अशीच राहू दे….!”