कान्स (मारशे डू) चित्रपट महोत्सवात ‘भारत माझा देश आहे’, ८ जुलैला होणार प्रीमियर!

सैनिकी परंपरा असलेल्या गावाच्या पार्श्वभूमीवरील एक हृदयस्पर्शी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. पांंडुरंग कृष्णा जाधव यांनी आतापर्यंत केलेल्या चित्रपटांतून स्वतःचा ठसा उमटवला आहे.

    जगप्रसिद्ध कान्स (मारशे डू) चित्रपट महोत्सवात ‘भारत माझा देश आहे’ हा मराठी चित्रपट दाखवला जाणार आहे. पांडुरंग कृष्णा जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा प्रीमियर ८ जुलै रोजी महोत्सवात होणार आहे. 
    डॉ. आशिष अग्रवाल यांनी “भारत माझा देश आहे” या चित्रपटाची निर्मिती केली आहे,  तर एबीसी क्रिएशन्स चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटात शशांक शेंडे, मंगेश देसाई, छाया कदम, हेमांगी कवी, राजरवीसिंहराजे गायकवाड, देवांशी सामंत, नम्रता साळोखे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. 
    सैनिकी परंपरा असलेल्या गावाच्या पार्श्वभूमीवरील एक हृदयस्पर्शी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. पांंडुरंग कृष्णा जाधव यांनी आतापर्यंत केलेल्या चित्रपटांतून स्वतःचा ठसा उमटवला आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या “मनातल्या उन्हात”, “ड्राय डे” या चित्रपटांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसन्मान प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या अनुभवी दिग्दर्शकानं आता अतिशय हळुवार आणि भावनिक कथेची मांडणी “भारत माझा देश आहे” या चित्रपटातून केली आहे.
    दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणाले, की आतापर्यंत विविध महोत्सवांमध्ये या चित्रपटाची निवड झाली आहे. आता “कान्स”(मारशे डू) चित्रपट महोत्सवासारख्या प्रतिष्ठेच्या महोत्सवातील प्रदर्शनामुळे या चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
    निशांत धापसे यांनी पटकथा संवादलेखन , नागराज दिवाकर यांनी छायांकन, निलेश गावंड यांनी संकलन,  समीर सामंत यांनी गीतलेखन, आश्विन श्रीनिवासन यांनी संगीत, गंगाधर सिनगारे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे, तर बाबासाहेब पाटील, विशाल चव्हाण कार्यकारी निर्माता आहेत.